लेणी

आंध्रप्रदेशात इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील बौद्ध लेणी सापडली

आंध्रप्रदेशातील पुरातत्वशास्त्रज्ञ आणि सांस्कृतिक केंद्र (सीसीव्हीए) विजयवाडा आणि अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई.शिवनागी रेड्डी हे ४ ऑगस्ट रोजी रविवारी हेरिटेज जनजागृती मोहिमेच्या अंतर्गत सर्वेक्षण करत होते. विजयवाडापासून जवळच असलेल्या मोगलराजपूरम येथे सर्वेक्षण करत असताना धानमकोंडा टेकडीवर त्यांना कठीण खडकात कोरलेली इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील बौद्ध लेणी आढळली.

सध्या सीसीव्हीए अंतर्गत आंध्रप्रदेशात पुरातन वारसा जतन जागरूकता मोहीम सुरु आहे. डॉ. रेड्डी यांच्यासह बौद्ध वारसा जतन करणारे कार्यकर्ते आणि एपी सोसायटी फॉर प्रिजर्व्हन ऑफ बौद्ध हेरिटेजचे अध्यक्ष सुभाकर मेदसानी यांनी जमिनीपासून २०० फूट उंचीवर असलेल्या डोंगरावर चढून ही बौद्ध लेणी शोधून काढली. लेणीचे मोजमाप केले असता १५ फूट लांबी, उंची १६ फूट आणि खोली ८ फूट आहे.

या लेणी बद्दल माहिती सांगताना डॉ. रेड्डी म्हणाले की, ही लेणी एका कठीण खडकात दोन मजल्यांमध्ये कोरलेली असून खालचा भाग बौद्ध भिक्खु वर्षावास मध्ये वापर करत असत. तर वरच्या मजल्यावर ५ फुटाचा स्तूप कोरला आहे.

आंध्रप्रदेशातील पुरातत्वशास्त्रज्ञ आणि सांस्कृतिक केंद्र (सीसीव्हीए) विजयवाडा आणि अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई.शिवनागी रेड्डी

या बौद्ध लेणीपर्यंत पोहचण्यासाठी शहरातील मोगलराजपुरममधील बायपती माधवराव रस्त्याच्या समोरील उतारापासून लेणीकडे जाता येईल. कोणतीही कलात्मक सजावट नसलेली लेणी आणि स्तूप असलेली लेणी विशाखापट्टणम जिल्ह्यातील अनाकापल्लीजवळील बोज्ननकोंडा (शंकरन) येथेही अशीच सातवाहना काळात कोरली गेली होती, असे डॉ. रेड्डी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की ही लेणी थेरवाद भिक्खु यांची आहे, या लेणीचा वापर फक्त पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी वापर करण्यात येत होता. बौद्ध लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन डॉ. रेड्डी आणि सुभाकर मेदसानी यांनी एपी पर्यटन प्राधिकरणाला विजयवाडा बौद्ध सर्किटमध्ये समाविष्ट करण्याचे आवाहन केले आहे.

या लेणी पासून पूर्वेकडे एक नैसर्गिक गुहा सुद्धा सापडली आहे. या गुहेचा वापर सुद्धा बौद्ध भिक्खु करत होते असा अंदाज पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. रेड्डी यांनी केला आहे.