जगभरातील बुद्ध धम्म

अबब…’या’ देशात एकाचवेळी ३० हजार भिक्खूंना दिले दान

दहा पारमितांमध्ये दान पारमिता महत्वाची आहे. प्रमुख आहे. तिला सर्व पारमितांचा राजा मानले गेले आहे. दान पारमिता इतर सर्व पारमिता यांची पूर्वतयारी असते. जो दान पारमिता पुर्ण करू शकत नाही त्याला इतर पारमिता पुर्ण करता येत नाहीत.

थोडक्यात दान पारमिता सर्व पारमिता यांचा मूळ आधार आहे. मूळ पाया आहे. दानावरून त्या व्यक्तीच्या सद्गुणांचे व त्यागाचे मोजमाप केले जाते. कारण स्वसाहित्य, संपत्ती व जमीन यांचा छोटा तुकडा देखील दान करणे हे लोभामध्ये बुडालेल्या माणसांस कठीण जाते. खरेतर त्याबद्दलची असलेली आसक्ती माणसास अधोगतीस नेत असते. आणि विशेषतः ध्यान साधना करणाऱ्यांनी दानवृत्तीची जोपासना केली पाहिजे.

नुकताच म्यानमारमध्ये मंडाले शहरात ८ डिसेंबरला (गेल्या रविवारी) ३० हजार भिख्खूंना तांदूळ आणि रोख रकमेचे दान करण्याचा मोठा समारंभ पार पडला. यासाठी खास मंडाले येथील प्रांत सरकारने हा समारंभ आयोजित केला होता. त्याला सहाय्य धम्मकाया फाउंडेशन, थायलंड यांनी तसेच इतर खाजगी संस्थांनी केले. आणि या दान करण्याच्या प्राप्त झालेल्या संधीचे अनेकांनी सोने केले. कारण मोठ्याप्रमाणावर भिक्खूसंघाला दान करण्याची संधी आयुष्यात क्वचितच प्राप्त होत असते.

तसेच आताच्या आधुनिक युगात आणि समाजात बौद्ध परंपरेची माहिती या दान समारंभामुळे नवीन पिढीला व्हावी आणि दानाचे महत्व लोकांना कळावे हा या समारंभाचा उद्देश होता. ‘चान म्या थरसी’ या तेथील विमानतळाजवळील भव्य जागेत हा समारंभ पार पडला.

धममकाया फाउंडेशन यांनी यावेळी ९०० मिलियन ‘क्यात’ (बर्मी चलन) दान दिले. याप्रमाणे प्रत्येक भिक्खूंना ३०,००० क्यात मिळाले. म्हणजेच $२० मिळाले. तसेच त्यांना फळे आणि इतर वस्तू यांचेही दान देण्यात आले. यासाठी १००० भिक्खू एका रांगेत उभे होते व अशा तीस रांगा तयार करण्यात आल्या होत्या. या समारंभात दान देण्यासाठी लोकांनी मागील दोन महिन्यापासून आपले नाव नोंदविले होते.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)