इतिहास

धर्मानंद कोसंबी – विसाव्या शतकातील बौद्ध धर्माचे स्कॉलर

आचार्य धर्मानंद कोसंबी हे पाली भाषा आणि साहित्य यांचे अभ्यासक होते. त्यांचा पाली भाषेचा व्यासंग प्रचंड होता. ते बुद्ध धर्माचे गाढे अभ्यासक आणि विद्वान होते. गोव्यातील आपले वडिलोपार्जित घर त्यांनी बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी वयाच्या तेविसाव्या वर्षी (सन १८९९) सोडले आणि नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेश अशा देशांत धम्माचा अभ्यास केला. त्यांनी विपुल असे बौद्ध साहित्य जमा केले. विसुद्धीमग्ग ग्रंथ, जातक कथासंग्रह, बौद्ध संघाचा परिचय, समाधिमार्ग, बुद्ध, धर्म आणि संघ, हिन्दी संस्कृति आणि अहिंसा, बुद्धलिलासारसंग्रह, बोधीचार्यावतार, अभिधर्म, धम्मपद, निवेदन, भगवान बुद्ध आणि बोधिसत्व नाटक असे विपुल साहित्य त्यांनी त्यांच्या जीवन काळात लिहिले.

त्यांचा जन्म ९ ऑक्टोबर १८७६ रोजी साखवळ गाव, गोवा येथे झाला. सर एडविन अरनॉल्डच्या ‘लाईट ऑफ एशिया’ या ग्रंथाचे मराठी भाषांतर ‘जगद्गुरु गौतम बुद्धाचे चरित्र’ या गोविंद काणे लिखित पुस्तकाचा त्यांच्यावर तरुणपणी पगडा बसला. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच १३० वर्षापूर्वी भारतात बौद्ध धर्म लोकांना माहीत नव्हता अशा काळात धर्मानंद कोसंबी यांना बौद्ध धर्मच मनुष्यमात्राच्या उन्नतीचा खरा मार्ग आहे असे वाटत होते.

पुण्याच्या भांडारकरांच्या प्रार्थना समाजाकडे पाठ फिरवून धम्माच्या अभ्यासाकरिता ते काशी वरून नेपाळकडे गेले. परंतु नेपाळमध्ये बुद्ध धम्माची खेदजनक अवस्था होती. तिथून ते बोधगयेला सन १९०२ मध्ये आले. परंतू तेथील महंतांचे व त्यांच्या शिष्यांचे हुक्का पिणे पाहून ते निराश झाले. त्यानंतर मित्रांनी सुचविल्यानुसार सिलोनला गेले. तेथे पालि भाषा शिकले.

अठ्ठकथेचे सिहंलीमधून मराठीत भाषांतर केले. मग बर्माला गेले. धम्माचा अभ्यास केला. ध्यानधारणा केली. कलकत्ता व बडोदा विद्यापीठ येथेही त्यांनी काम केले. त्यांच्यामुळेच मुंबई प्रांतांतील कॉलेजमध्ये पालि भाषा शिकविण्यास सुरवात झाली. सन १९१२ मध्ये फर्गुसन कॉलेज, पुणे येथे पालिचे वर्ग धर्मानंद कोसंबी यांच्यामुळे सुरू झाले. हावर्ड विद्यापीठ येथे असताना रशियन भाषा शिकले व पुढे रशियाला १९२९ मध्ये जाऊन लेनिनग्राड युनिव्हर्सिटीमध्ये पालि भाषा शिकविली.

कलकत्ता विद्यापीठ येथे रीडर म्हणून काहीकाळ होते.

१९३५ च्या अखेरीस त्यांनी ‘हिंदी संस्कृती आणि अहिंसा’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. भारतात बौद्ध धर्म निस्तेज करण्यास कोणकोण कारणीभूत झाले याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. हिंदू संस्कृतीची चिरफाड केली. या पुस्तकामुळे त्यांचे अनेक स्नेही नाराज झाले. मुंबईतला पहिला बौद्ध विहार ( बहुजन विहार ) परेल येथे एका वर्षात बांधला. त्याचे २६ जानेवारी १९३७ रोजी त्यांनी उदघाटन केले. येथे ते पालि भाषा व बौद्ध तत्वज्ञान शिकवीत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी धर्मानंद कोसंबी यांनी केलेल्या धम्माच्या प्रसारामुळे बौद्ध धर्माची तोंड ओळख जनमानसात झाली तसेच अनुकूल वातावरण तयार झाले.

डॉ. भांडारकर, कुंटे, तेलंग, वैद्य, राजवाडे या संकुचित संशोधकांपेक्षा मूळ पालि ग्रंथांचे संशोधन करून बुद्ध चरित्राचा आणि त्याच्या तत्वज्ञानाचा खराखुरा परिचय कोसंबी यांनी भारतीय जनतेस दिला. कोसंबी यांनी सर्व लिखाण मराठी व गुजराती मधून केले. तेच जर इंग्रजीतून झाले असते तर शंभर वर्षांपूर्वी ते जागतिक किर्तीचे बौद्ध अभ्यासक झाले असते.

त्यांच्या मुलाचे नाव दामोदर कोसम्बी व ते मोठे गणितज्ञ होते. तसेच त्यांची नात मीरा कोसम्बी या SNDT विद्यापीठात महिला शिक्षण संशोधन केंद्राच्या संचालिका होत्या. त्यांचे ही फेब्रुवारी २०१५ मध्ये निधन झाले. कोसंबी यांचे १४ ग्रंथ गुजराती भाषेत प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या ‘भगवान बुद्ध’ या चरित्रग्रंथाचे १४ प्रमुख भारतीय भाषांमध्ये भाषांतर प्रकाशित झालेले असून त्यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी, इंग्रजी, उर्दू, सिंधी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड आणि सिंहली भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.

धर्मानंद कोसंबी यांचे अखेरपर्यंत बौद्धधर्म आणि पालि भाषा यांचे संशोधन, संवर्धन आणि प्रसार हेच जीवितकार्य राहिले. २४ जून १९४७ रोजी सेवाग्राम, वर्धा येथे त्यांचे निधन झाले. त्यांचा आज ७३ वा स्मृतिदिन. पण त्यांच्या अनेक पुस्तकातून बौद्ध साहित्याचा सुगंध अजून ही दरवळत आहे.

धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे.
https://dharmanandkosambi.com

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)