इतिहास

केरळात सापडल्या प्राचीन बुद्धमूर्ती

केरळ राज्यात अनेकजण पर्यटनासाठी जातात. कुणी तिथे देवालयांच्या दर्शनासाठी जातात तर कुणी केरळातील निसर्गसौंदर्याचा अविष्कार पाहण्यास जातात. कुणी संस्कृतीचा अभ्यास करण्यास तर कुणी कामानिमित्त भेट देतात. पण केरळाला जाऊन कुणी बुद्धमूर्ती पाहून आल्याचे आजपर्यंत सांगितले काय ? कारण केरळ म्हणजे सगळीकडे मोठं मोठी मंदिरे. बुद्धमूर्ती तिथे कशा असतील हा अनेकांना प्रश्न पडतो. पण आता अनेक ठिकाणी पुरातन बुद्धमूर्ती प्राप्त झाल्याने केरळाची मूळ संस्कृती उजेडात येत आहे.

एकेकाळी भरभराट असलेली बौद्ध संस्कृती या प्रदेशातून विस्मरणात कशी काय गेली या बाबत संशोधन होत आहे. ४५ वर्षांपूर्वी शाळेत असताना केरळला भेट दिली होती. वडील त्यावेळी केंद्र सरकारच्या सेवेत त्रिचूर येथे Regional Director म्हणून कार्यरत होते. त्यामुळे तेथील देवालयांची माहिती ज्ञात होती. पण त्यांचा खरा इतिहास आता कळत आहे.

इथे जेवढ्या बुद्धमूर्ती सापडल्या आहेत त्या सर्व तेथील देवळाजवळील तलावातून बाहेर काढल्या आहेत. एकेकाळी अनेक शतकांपूर्वी तिथल्याच विहारात, देवळात या मूर्ती तेथे स्थानापन्न होत्या. बुद्धिझमचा राजाश्रय जसजसा कमी होत गेला तसतसा पुरोहित लोकांनी त्याचा फायदा उचलला. तेथील राजाला अंकित करून घेतल्यावर बुद्धमूर्ती देवळाच्या तलावातच ढकलून दिल्या आणि त्याबाबत कल्पित कथा रचल्या. राजाच पुरोहित वर्गाचा बाहुला झाल्यावर लोकांनी सुद्धा राजाचे अनुकरण केले. इतिहासात सांगितले जाते की शंकराचार्याने वाद-विवादात बौद्ध भिक्खूंना हरविले. त्यांचा पाडाव केला. त्यामुळे बौद्धधर्म तिथून नाहीसा झाला. पण हा इतिहास लिहिला कोणी ? प्रत्यक्ष केरळच्या इतिहासात कुठेच वाद-विवाद आणि तात्विक चर्चा झाल्याचा पुरावा नाही. शंकराचार्यांची ही कथा बनावट असून संतांच्या अनेक बोगस दंतकथा प्रमाणे ती एका विशिष्ट वर्गाला अनुकूल होईल अशा पद्धतीने तयार केली आहे.

प्रत्यक्षात केरळात अकराव्या शतकापर्यंत बौद्धधर्म भरभराटीला होता. १२-१४ व्या शतकात आये, येजिमला आणि कुलशेखरा या बौद्ध राजांची राजवट संपुष्टात आल्यावर बौद्ध धम्माला कुणी वाली उरला नाही. धम्माचा उरलासुरला प्रभाव कमी झाला. तलावांना मल्याळी भाषेत ‘अनपलंम’ म्हणतात. ‘अनप’ म्हणजे प्रेम, दया, शांती आणि ‘अलम’ म्हणजे जागा. म्हणून ‘अनपलंम’ म्हणजे शांतीची, प्रेमाची जागा असा होतो. देवळातील बुद्धमूर्ती तलावात टाकल्यावर लोक तलावांना ‘अनपलंम’ म्हणु लागले. हा मोठा पुरावा पिढ्यानपिढ्या टिकून राहिला. धम्म विस्मरणात गेल्यावर हळूहळू उच्चनीचता आणि वर्णद्वेष यांचे विष सर्व केरळ आणि आजूबाजूच्या प्रदेशात पसरले. आणि हळूहळू पिढ्यानपिढ्या खोलवर रुजत गेले.

केरळात तलावाचे क्षेत्र हे ‘अनपलंम’ क्षेत्र झाले. महायान बौद्ध साहित्यात क्षेत्र म्हणजे जमीन, पूजनीय जागा असा अर्थ आहे. बुद्धक्षेत्र, पुण्यक्षेत्र, कुरुक्षेत्र हे शब्द मूळ महायानी बौद्ध पंथाची देण आहे. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे केरळातील प्राचीन राजा ओनाटूक्कारा याची राजधानी ‘मावेलिक्करा’ याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात अनेक बुद्धमूर्ती प्राप्त होत आहेत. ओनम आणि त्याचा प्रांत हा राजा मावेली याच्याबरोबर जोडला गेला आहे. ज्याचे राज्य समानता, सत्यता आणि गुणात्मकता यांचे द्योतक होते. ओनाटूक्कारा आणि ओनम या अशा पवित्र जागा आहेत जिथे धम्माची ज्योत शेवटपर्यंत फडफडत होती. केरळात प्राप्त झालेल्या बुद्धमूर्तीची ठिकाणे खालील प्रमाणे आहेत.

१) कायाकुलम बुद्ध :- कोलम जिल्ह्यात मुरुतूरकूलगारा येथील पल्लिकल तलावात ही बुद्ध मूर्ती सापडली.
२) नेपियर बुद्ध :- कोलम जिल्ह्यात अडूर येथून ११ कि.मी. दूर असलेल्या तलावात ही बुद्ध मूर्ती सापडली.
३) मन्नाडी बुद्ध :- पथनामिथीटा जिल्ह्यात इजाथुलक्काढा येथे ही बुद्धमूर्ती सापडली.
४) भरनिक्कावू बुध्द :- अलपूझा जिल्ह्यात कायमकुलम येथून ५.५ कि.मी. दूर असलेल्या तलावात सापडलेली बुद्धमूर्ती.
५) मावेलिक्करा बुद्ध :- अलपूझा जिल्ह्यात कंडीयूर देवळाच्या तलावात आढळलेली बुद्धमूर्ती.
६) करूमाडी बुद्ध :- अलपूझा जिल्ह्यात अंबालापूझा पासून पूर्वेकडे ४.७ कि.मी. अंतरावर सापडलेली बुद्धमूर्ती.

याव्यतिरिक्त अर्नाकुलम जिल्ह्यात ३, इडुक्की जिल्ह्यात १, अलपूझा जिल्ह्यात १ आणि थ्रिसूर जिल्ह्यात १ अशा बुद्धमूर्ती सापडलेल्या आहेत. त्यातील काही क्षतिग्रस्त आहेत. केरळातील बौद्ध संस्कृतीचा पगडा अरबी समुद्रात कोचीन पासून २०० ते ४०० कि.मी. दूर असलेल्या लक्षद्वीप बेटांवर सुद्धा पडला होता. ६-७ व्या शतकात तेथे बौद्ध संस्कृती होती आणि अनेक स्तूप होते.( त्याबाबतची पोष्ट पुढे कधीतरी ) थोडक्यात इतिहासातील अनेक धागेदोरे आता सापडत असून केरळ राज्याचा मूळ इतिहास उजेडात येत चालला आहे.

मूळ लेख (https://www.wayofbodhi.org/ancient-buddha-statues-of-kerala)

– संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)