जगभरातील बुद्ध धम्म

आंब्याची झाडे लावण्यासाठी खोदकाम करताना प्राचीन बौद्ध विहार सापडले

कोरोना रोगाच्या साथीचा जगात प्रादुर्भाव वाढत असतानाच बांगलादेशात नुकतेच एक प्राचीन बौद्धविहार संकुल सापडल्याची बातमी वाचावयास मिळाली. गौरीधोना या प्रांतातील जेसोर जिल्ह्यात ढिभी येथे ९ व्या ते ११व्या शतकातील असलेले हे बौद्धविहार संकुल नुकतेच सापडल्याचे बांगलादेशी पुरातत्व खात्याने जाहीर केले आहे.

याबाबतीत २२ जानेवारी २०२० पासून कलिजहारा ढिभी या गावी उत्खनन चालू करण्यात आले होते. तेथे दोन विहार आणि अठरा भिक्खूंची छोटी निवासस्थाने उत्खननात सापडली. पुरातत्व विभागाचे प्रांतिक अधीक्षक आफ्रोज खान मीता यांनी सांगितले की बांगलादेशात नैऋत्य भागात प्रथमच बौद्ध विहारांचे अवशेष मिळाले आहेत. याअगोदर बांगलादेशातील दक्षिण भागात भारत बयाना येथे बौद्ध विहाराचे अवशेष सापडले होते.

येथे पुरातन अवशेष यांचे बरोबर नक्षीकाम केलेल्या विटा आणि लालसर रंगाची मातीची भांडी सापडली. आश्चर्य म्हणजे या भांड्यावर सुरेख कमळे कोरलेली आहेत. तसेच वाळू व चुना यांनी गिलावा केलेल्या भिंतीही निदर्शनास आल्या. त्यावर कमळ फुलांचे नक्षीकाम कोरलेले आढळते. तसेच हजारो वर्षांपूर्वीची विशिष्ट आकाराची भांडी सुद्धा येथे सापडली.

ही जागा मूळ आंब्याची बाग होती. १९८८ च्या वादळात तेथील अनेक झाडे पडली. त्यामुळे तेथील माळ्याने केळीच्या बागा लावण्यासाठी उत्खनन केले. तेव्हा त्याला काही विटांचे अवशेष दिसून आले. परंतु घाबरून त्याबाबत त्याने कुठे कळविले नाही. आणि ही बातमी काही गावकऱ्यांमध्ये ३० वर्षे गुप्त राहिली. परंतु मागील वर्षी त्या जागेच्या नवीन मालकीण रजिया सुलताना आणि तिचा नवरा मुस्तफा सोडल यांनी तेथे आंब्याची झाडे लावण्याचे ठरविले आणि मोठे खोदकाम केले तेव्हा जमिनीत लालसर विटांचे बांधकाम सापडले.

ही बातमी पुरातत्व खात्याला कळली तेव्हा त्यांच्या टीमने तेथे उत्खनन जानेवारीत चालू केले. त्यानुसार तेथे बौद्धविहार असल्याचे मार्चमध्ये निष्पन्न झाले. भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ.अरुण नाग म्हणाले की या शोधामुळे बांगलादेशातील दडलेला बौद्धधर्मीय पुरातत्त्वीय इतिहास उजेडात येत आहे. या साईटचे ड्रोनद्वारे चित्रण केले असून बांगलादेशीय पुरातत्व विभागातील महिला संशोधकांचा देखील उत्खननात सहभाग असल्याचे दिसून येते.

-संजय सावंत,नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

One Reply to “आंब्याची झाडे लावण्यासाठी खोदकाम करताना प्राचीन बौद्ध विहार सापडले

  1. आपण लेखात दिलेली माहिती अभ्यास पुर्ण आणि वस्तूंनिष्ठ असते.. जी कधीही उपलब्ध नव्हती ती माहिती आता इंटरनेटच्या माध्यमातून अपण उपलब्ध करून देत आहात. त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. मला बुधम्माच्या खूप उत्सुकता आहे. , आशीच माहितिची आपलीकडू अपेक्षा व्यक्त करतो.
    Vijay pawar
    Graphics designer
    7767041206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *