बातम्या

बौद्ध शिल्प गहाळ झाल्यास येथे नोंद करा

बिहारमध्ये ठिकठिकाणी गावोगावी बुद्धांची अगणित शिल्पे सापडत आहेत. मागे म्हटल्याप्रमाणे अनेक शिल्पांची नोंद नसल्यामुळे त्यांच्या चोऱ्या होत आहेत. अशा बुद्धमूर्तींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे या टोळ्या स्थानिक चोरांना हाताशी धरून मूर्त्यांची चोरी करतात. आणि यामध्ये काही देशद्रोही गावकरी सुद्धा सामील असतात.

बिहारमध्ये डिसेंबर २०१४ मध्ये नालंदाजवळ दिपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रणबिघा गावांमध्ये एकेदिवशी सकाळी गावकरी उठून बघतात तर गावदेवीच्या देवळाजवळील काळ्या ग्रॅनाईट दगडातील बुद्धमूर्ती गायब झाली होती. गावकऱ्यांनी लगेच त्या दिवशी दिपनगर पोलीसस्टेशनला मूर्ती चोरीची तक्रार नोंदवली.त्यांनी सांगितले की दोन वर्षांपूर्वी तिथल्या नदीत वाळू गोळा करण्याचे काम चालू होते. तेव्हा ही मूर्ती सापडली. गावकऱ्यांनी ती मुर्ती उचलुन तिची स्थापना गावदेवी देवळाजवळ केली व भक्तिभावाने दोन वर्षे गावकरी मूर्तीची पूजा करत होते.आंतरराष्ट्रीय टोळ्यांसाठी तिची चोरी करण्यात आली असावी असा पोलिसांचा कयास आहे.

त्या अनुषंगाने तपास करण्यात येत असून अद्यापही ती मूर्ती सापडली नाही. नालंदा जिल्ह्यात २००९ पासून २०१४ पर्यंत खेडेगावातील १२ बुद्धमुर्त्या चोरीस गेल्या आहेत. त्याअनुषंगाने स्थानिक प्रशासनास हातात धरून नव नालंदा महाविहार विद्यापीठ लोकांमध्ये जागृती करीत आहे की कुठेही उत्खनन करताना बुद्धमूर्ती सापडल्यास स्थानिक प्रशासनास कळवून त्याची नोंद करून घ्यावी. जेणेकरून भविष्यकाळात जर मूर्ती गहाळ झाल्यास तिचा छडा लावला जाऊ शकतो.

तसेच Art Loss Register नावाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे.( www.artloss.com) तेथे पुरातन मूर्तीचोरीची तक्रार नोंदविता येते. ही संस्था चोरीला गेलेल्या पुरातन मूर्तींचा छडा लावण्यात पटाईत आहे. त्यामुळे जेव्हा पुरातन बुद्धमूर्ती बाजारपेठेत विक्रीला येते तेव्हा ALR संस्थेमध्ये तिची तक्रार तर दाखल नाहीना याची खातरजमा खाजगी संग्रहालये करतात. माहेर व लोहाजरा येथील गायब झालेल्या बुद्धमूर्ती ALR मुळे पुन्हा प्राप्त झाल्या आहेत.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)