इतिहास

बनारस – बौद्ध संस्कृतीचे एक मूळ शहर

हे वाचल्यावर चकित होऊ नका. पण हेच सत्य आहे. कारण बनारस म्हणजे काशी. आणि काशी म्हणजेच अनेक देव आणि त्यांची देवळे, पुरातन वाडे, हवेल्या, नदीवरील असंख्य घाट, यात्रेकरूंची आणि भाविकांची वर्दळ, अंतिम संस्कारांची भाऊगर्दी असे चित्र डोळ्यासमोर येते. पण दीड हजार वर्षापूर्वी काशी म्हणजे वाराणसी होते. आणि वाराणसी म्हणजे बौद्ध संस्कृतीची मोठी नगरी होती.

भगवान बुद्धांच्या कालखंडा अगोदर पासून ही नगरी अस्तित्वात असल्याचे दिसून येते.बौद्ध साहित्यात उल्लेख आहे की वाराणसी हे बारा योजने लांब म्हणजे ८४ मैल पसरलेले आहे.जातक कथेमध्ये वाराणसीचा सुखंधना, सुदाशना, ब्रम्हवदना, पुष्पावती, रम्मा, मोलिनी अशा अनेक नावांचा उल्लेख आढळतो. जातक कथेतील या ऐश्वर्यसंपन्न नगरीमधील लोक हुशार आहेत. दानधर्म करणारे आहेत. गरिबांना रोजगार देणारे आहेत. न्यायप्रिय आहेत आणि दयाळू आहेत.

अशा या काशीचे दोन हजार कि.मी. दूर असलेल्या तक्षशिला या विद्यापीठाशी घनिष्ट संबंध होते. काशी येथून अनेक विद्यार्थी तक्षशिला येथे वैद्यकीय ज्ञान, धनुर्विद्या शिकण्यासाठी जात असत. तसेच या दोन शहरांमध्ये व्यापार चालत असे. ‘वाराणसेयका’ नावाचे वस्त्रही येथे तयार होत होते असा उल्लेख मज्जिम निकाय मध्ये आढळतो. अंगुत्तर निकाय मध्ये काशी १६ महाजनपद पैकी एक असल्याचे म्हटले आहे.जगप्रसिद्ध जातक कथेतील अनेक कथा ‘फार पूर्वी वाराणशी नगरात ब्रम्हदत्त नावाचा राजा राज्य करीत होता’ या ओळीने चालू होतात.

हे पण वाचा : बनारस – मूळ बौद्ध संस्कृतीचे एक शहर : भाग 2

काशीच्या उत्तरेला कोसला आहे. पूर्वेला मगध आहे आणि पश्चिमेला वत्स होते. महावग्गमध्ये काशी मोठी नगरी असल्याचा उल्लेख आहे. बौद्ध कालखंडात काशीप्रांत कोसल राज्याचा भाग होता. बुद्धाच्या वेळी पसेनदीने काशीचा ताबा मिळविला. बुद्धांच्या आयुष्यात काशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. काशीजवळील सारनाथ येथे बुद्धांचे पहिले प्रवचन झाले. अशा या काशी शहरात भगवान बुद्ध अनेक वेळा भिक्षाटणास गेले होते. अनेकांना तेथे धम्म उपदेश केला. असंख्य विहार तेथे बांधले गेले.

बनारस मधील बकरिया कुंड येथील एका बौद्धस्थळ छत्रीखालील कबरीचा फोटो १८६३-६४ दरम्यान एच. एल. फ्रेझर यांनी घेतला आहे.

दहाव्या शतकानंतर धम्म कलुषित करण्यात आला. व त्याची पीछेहाट होत गेली. बाराव्या शतकात तुर्कीश मुस्लिम आक्रमणामुळे अजून खिळखिळा झाला. त्यानंतर तुलसीदास यांनी इथेच रामचरित्रमानस लिहिले. संत कबीर आणि रविदास यांची भक्ती इथूनच चालू झाली. गुरुनानक हे १५०७ मध्ये महाशिवरात्र दिनी येथे आले होते. सोळाव्या शतकापासून अकबर बादशहाच्या काळात काशीचा विकास होत गेला.

मात्र मुस्लिम आक्रमक रजिया सुलतान, सिकंदर लोधी, अकबर आणि औरंगजेब यांनी अनेक पडझड झालेल्या बौद्ध स्थळांवरील दगडी वापरून तेथे त्यांची प्रार्थना स्थळे व कबरी बांधल्या. ब्रिटिश पुरातत्ववेत्ते जेव्हा बौद्धस्थळे हुडकून काढीत होते, तेव्हा त्यांच्या हे सर्व लक्षात आले. काशी व आजूबाजूच्या परिसरात जेवढी टेकडीवरील मंदिरे आहेत ती स्तुपांच्या व विहाराच्या जागी उभी केलेली आहेत. त्यांनी अशा स्थळांच्या शिलामुद्रण प्लेट तयार केल्या. डब्बा कॅमेऱ्याने फोटो काढले. रिपोर्ट्स लिहिले. म्हणून हा खरा इतिहास आज सर्वांना ज्ञात होत आहे.
(क्रमशः)

-संजय सावंत, नवी मुंबई, (लेखक- बौद्ध इतिहास अभ्यासक)

2 Replies to “बनारस – बौद्ध संस्कृतीचे एक मूळ शहर

Comments are closed.