ब्लॉग

माणूस मोठा नसला तरी बाबासाहेबांच्या विचारांनी त्याचे मन मोठे

हातात काठी. डोक्यावर लाल पगडी. फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर! दीक्षाभूमीवर थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करून बुद्ध व्हा, शुद्ध व्हा! असे बाबासाहेबांचे विचार सांगणारा ६१ वर्षीय वृद्ध. वयाने थकलेला; मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृद्धाचा हा प्रवास २५ वर्षांपासूनचा आहे. सयाजी गायकवाड त्या व्यक्तीचे नाव.

लातूर जिल्ह्यातील निलंगा या गावातून ते आले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, दरवर्षी दीक्षाभूमीवर येतोय. वय झाल्यामुळे घरची मंडळी जाऊ देत नाही. गुपचुप आलो. राहावतच नाही. येथे येऊन आपल्या लोकांची गाठभेट होते. त्यांची विचारपूस करतो. बाबासाहेबांच्या कार्याची माहिती सांगतो.

अशिक्षित असलो तरी जे काही चार गोष्टी माहीत आहे ते सांगतो. शाळा शिकणं म्हणजे बाबासाहेबांची भक्ती करण्यासारखं आहे. लेकरांना शिकवा. त्यांना मोठं करा. त्यांना बाबासाहेब सांगा. बाबासाहेबानं त्याग केला म्हणून आपण सुखी आहोत.

दीक्षाभूमीवरून घरी जाताना परिसरात भोजन वाटणार्‍यांना पाच किलो तांदूळ देऊन जातो आणि पुढच्या वर्षी कुणाले उपासी ठेवू नका, अशी कळकळीची विनंतीही करतो. सयाजी मोठा माणूस नाही. माणूस मोठा नसला तरी बाबासाहेबांच्या विचारांनी त्याचे मन मोठे झाल्याची प्रचिती आल्यावाचून राहात नाही.

– एस.जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *