ब्लॉग

दुःखं आमचं, संघर्ष आमचा आणि जीव पण आमचाच जातोय…मग स्टेजवर सवर्ण ब्राह्मण का आहेत?

आपण चुकतोय कुठं माहित्ये? आपल्या सर्वात मोठ्या प्रॉब्लेमला अड्रेस करत नाहीय आपण. जे आजच्या सर्व समस्यांचं मूळ आहे. जातीमुळं फेस करावं लागणारं सिस्टमॅटिक ऑप्रेशन. मग ते मीडिया, कॉर्पोरेट, अकॅडमीक्स, पॉलीटीक्स, कॅम्पसेस पासून ते प्रत्येक पब्लिक स्पेस मध्ये सहन करावं लागतं. रिसोर्ससाठी झगडावं लागतं. सवर्ण पुरोगामी आणी सवर्ण प्रतीगामी ह्यांच्यातल्या रस्सीखेच स्पर्धेत आपण आपल्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करतोय.

रोहित गेला. तो दलित होता, म्हणून व्यवस्थेनं त्याचा बळी घेतला. तो जर सवर्ण जातीतला असता तर ‘आझादी’च्या घोषणा देत चहुबाजूंनी लिबरल गालगुच्चे मिळवत तो पण हिरो राहिला असता, आपलं शिक्षण संपवून कुठंतरी फॉरेन युनिव्हर्सिटीत नौकरी करत ‘कास्ट्स इन इंडिया’ वर पेपर पण लिहू शकला असता. पण दलितांना ते प्रिव्हलेज नाहीय. ते फक्त आणी फक्त सवर्ण पुरोगाम्यांसाठी रखीव आहे. दलितांनी फक्त सब्जेक्ट बनून रहायचं कधी युटोपीयन क्रांतीचा तर कधी ह्यांच्या डिस्कोर्सचा. लिबरल प्रयोगशाळातला फक्त एक सब्जेक्ट. आमच्या सफरिंगवर, स्ट्रगलवर, अनुभवांवर मग पेपर लिहले जाऊन पदप्रतिष्ठा, रग्गड पैसा मिळवला जाते.

आज सगळी मीडिया रोहित बद्दल लिहतेय त्यांच्या साठी तर एक मृत दलित म्हणजे सगळ्यात प्रॉफिटेबल एंटिटी असते. सेम जसा एखादा कॉम्रेड भट्टाचार्य बस्तर मधले आदिवासींवर आपला प्रबंध संपवून सेंट्रल युनिव्हर्सिटीत गलेलठ्ठ पगाराची नौकरी काबीज करतो. रोहित जिवंत असताना एकही मीडियाने त्या बातमीला कव्हरेज नव्हतं दिलं. आन आज आलेयत सगळी मूव्हमेंट हायजॅक करून स्ट्रगलला अप्रोप्रीएट करायला. दांभिक जमात सगळी.

रोहित सोबत सस्पेंड झालेले चौघे. सुंकान्ना, प्रशांत, शेषया आणी विजय. हैद्राबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीत आंबेडकरी डिस्कोर्स उभा करून एक नवा राजकारण उभं करणारी ही तरुण पोरं. किती क्रूरपणे चिरडून टाकलं ना ह्या सगळ्यांना ह्याच सिस्टमॅटिक ऑप्रेशननं? रोहितला जीव गमवावा लागला. जेनएयू मधले समस्त सवर्ण कॉम्रेडस हिरो झाले. पण रोहित सोबतच्या बाकीच्या चौघांसोबत काय झालं? ते काय करतायत आज? रोहितच्या न्यायाचा लढा उभारून त्यात आपलं सगळं करियर दावणीला बांधून ही पोरं लढली. आपण आज त्यांचा बोलण्यातून नैराश्य आणी हार दिसतेय फक्त.

1. सुंकान्ना पीएचडी संपवून, आयआयटी बॉम्बेतनं त्यानं पोस्ट डॉक्टरेट केलीय. आजवर वीस हुन अधिक युनिव्हर्सिटीत नौकरी साठी अर्ज केलाय पण ‘दलित राजकारणातला सहभाग’ ह्या कारणासाठी त्याला नाकारलं. तुमच्या माझ्या सारखचं तो पण त्याचा घरातला पहिला शिकणारा होता. पण प्रत्येक ठिकाणी नाकारल्या गेलंय. शेवटी सुंकान्ना आपल्या गावी जाऊन शेतमजूर बापासोबत शेती करतोय.

2. विजय ज्याने जस्टिस फॉर रोहित ही मुव्हेंमट चालवली. त्यानं गेल्या विधानसभेला पण त्यानं निवडणूक पण लढवली होती. आज सगळं आयुष्य दिशाहीन झालंय म्हणतो. रोहित च्या जाण्यानं सगळी स्वप्न, आकांक्षा काळवंडून गेल्यात. नक्की काय करतोय आम्ही आयुष्यात माहिती नाही. पुढं काहीच दिसत नाहीय.

3. शेषया अजूनही पीएचडीवर काम करतोय हैद्राबाद युनिव्हर्सिटीत. पण त्याच्यातला कार्यकर्ता मेलाय आज. व्होकल, असर्टिव्ह दलित असल्याने किती पातळ्यांवर लढावं लागतं, प्रसंगी जीव गमवावा लागतो हे त्यानं जवळून पाहिलंय. आज तो सगळं बंद करून फक्त एकटं राहत अभ्यास करतोय.

4. प्रशांत. रोहित इतकाच आक्रमक. प्रचंड अभ्यास आणी उत्कृष्ठ भाषण कौशल्यावर विद्यार्थी निवडणूक जिंकून झालेला प्रेसिडेंट. पण रोहितच्या नंतर सगळं आयुष्य पालटलं त्याचं. आज त्यानं फोन वापरणं बंद केलंय. स्वतःला फक्त आपली खोली आणी पुस्तकं इतक्या पुरतचं मर्यादित ठेवलंय.

ही चारही जण एकमेकांना दर महिन्याला कोर्टात भेटतात.

काही मित्र म्हणत होते की अँटी सीएए प्रोटेस्ट मध्ये आंबेडकरी विद्यार्थी कुठं आहेत? जामिया पासून शाहीनबागेच्या पहिल्या दिवसा पासून ते तिथंच उभे आहेत. लढतायत. लाठ्या खात लढतायत. ती कधीच आपल्याला दिसणार नाहीत ह्याची पुरेपूर काळजी इथली व्यवस्था घेत असते. गल्ली ते दिल्ली पर्यंत, ग्रामपंचायत ते कॅबिनेट, मीडिया ते अकॅडमीक्स ह्या तमाम स्पेसेस मध्ये दलित शोषित येणार नाही ह्याची काळजी व्यवस्था घेत असते. टोकनाजेशन ला लाथ हाणत, हजार पातळ्यावरचा संघर्ष करून जर एखादा दलित आला पण ह्या स्पेसेस मध्ये एकतर त्याचं चारित्र्यहणन केलं जातं, नक्षलवादी लेबल लावल्या जातं, जेल मध्ये डांबल्या जातं नाहीतर मग थेट मारून टाकल्या जातं.

हे क्रूर वास्तव आहे ह्या व्यवस्थेचं. जोवर हे आयडेंटिफाय करत नाही तोवर ह्या विरुद्ध नक्की कसला लढा उभारणार आहोत आपण? पँथर, नामांतरात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांनी हे वास्तव अधोरेखित करण्यासाठी जान कुर्बाण केलेली. नंतरच्या सुशिक्षित पिढीचं काम होत त्यातलं रिव्होलुश्नरी कंटेंट घेऊन नवीन मांडणी आखणं. आपण नालायक आहोत. हे काम झालं नाही आपल्याकडून.

इग्नोरन्स ही सवर्ण सुप्रीमसीचं सर्वात मोठं हत्यार आहे. त्यामूळ ह्यांच्या नॅरेटीव्हला बळी पडू नका. जी ही चार पोरं फेस करतायत त्याचा काही अंश देखील जेएनयुतल्या कुठल्याही ‘गरीब ब्राह्मण कॉम्रेड’च्या वाट्याला येणार नाही. त्यामुळं त्यांच्या आझादीच्या हास्यस्पद घोषणावरं क्रांतीचा आव आणणं इथल्या दलित शोषितांना शक्य नाही. त्यांच्यासाठी सगळं सोपं असतं. सगळं काही. आपल्यासाठी नसतं. का नसतं तर ह्याच उत्तर आहे सिस्टमॅटिक ऑप्रेशन. ह्यावरचं सवर्ण पुरोगामी मूग गिळून गप्प बसतात.

रोहितची फेबुवॉल आणी त्याच्या बद्दल मित्रांनी लिहिलेलं वाचलं की समजत रोहित पण ह्याच स्पेसेस विषयी बोलायचा. संसाधनं, प्रिव्हीलेजस ह्यावरचं बोलायचा.

जर दुःख आमचं आहे, संघर्ष आमचा आहे, सफरिंग आमचं आहे, जीव आमचा जातोय, बहिष्कृत आम्ही होतोय तर मग स्टेज वर सवर्ण ब्राह्मण का आहेत?? तुमचे नॅरेटिव्ह का ऐकतोय आम्ही? स्पेसेस मध्ये, इक्विटी मध्ये आम्हाला का वाटा नाही? हे प्रश्न जोवर इथल्या दलित शोषित तरुणांना पडणार नाहीत तोवर अजून किती रोहित मरणार माहिती नाहीत..

सॉरी रोहित. वी फेल्ड यू.

गुणवंत सरपाते, चेन्नई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *