इतिहास

कांचीपुरम येथे शाळेच्या मैदानात बुद्ध मूर्ती सापडली; थायलंड देशाकडून मदत

तामिळनाडू येथील कांचीपुरम (दुसरे नाव कांजीवरम) हे दुसऱ्या शतकापासून विकसित झालेले शहर चेन्नई-बंगलोर दरम्यान पलार नदीच्याकाठी वसलेले आहे. एकेकाळी येथे बौद्ध धर्माची भरभराट होती. पण आज स्थिती अशी आहे की एकही बौद्धविहार कांचीपुरम येथे नाही.

हिंदूं देवळांचे प्राबल्य असलेल्या कांचीपुरम येथे चाळीस वर्षांपूर्वी एका शाळेच्या मैदानात साडेचार फूट उंचीची बुद्ध मूर्ती सापडली होती. गेली अनेक वर्षे ती शाळेच्या आवारात पडून होती. परंतु आता तिची स्थापना सुब्रमण्यम स्वामी देवळाच्या मंडपम मध्ये करण्यात आली आहे. असे तामिळनाडू बुद्धिस्ट असोसिएशन यांनी सांगितले. आणि यासाठी आपल्या भारत देशातून नाही तर थायलंड देशांकडून मदत झाली आहे. खरोखर हे खेदजनक आहे, की ज्या देशात बौद्धधम्म जन्मला, रुजला, वाढला त्याची जाण इथल्या सरकारला नाही. पण एक समुद्रापलीकडील देश भारतातील कांचीपुरम येथे बौद्ध धर्माचे क्षेत्र पुन्हा व्हावे यासाठी प्रयत्न करतो, हे खरंच कौतुकास्पद आहे. भारताचा खरा इतिहास हा पूर्वेकडील देशांना जास्त माहिती आहे.

पाचव्या शतकातले एक भिक्खू ‘बोधिधर्मा’ हे त्यावेळी कांचीपुरम मधील राजाचे धाकटे पुत्र होते. परंतु त्यांनी समाधी मार्ग स्वीकारून चीन व जपान येथे जाऊन तेथील शाओलिन विहारात धम्माची शिकवण दिली. याच कांचीपुरम मध्ये सात फूट उंचीची एक उभी बुद्धमूर्ती शंभर वर्षांपूर्वी सापडली होती आणि आज ती चेन्नई मधील म्युझियम मध्ये उभी आहे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)