इतिहास

बुद्धिझम – बंगालचा सुवर्णमय वारसा

भारतामध्ये बंगाल राज्य पूर्वेकडे आहे तरी त्याला पश्चिम बंगाल असे म्हणतात. कारण ब्रिटिश व्हाईसराय लॉर्ड कर्झन यांनी जुलै १९०५ मध्ये बिहार, झारखंड पासून आसाम, मेघालय पर्यंत पसरलेला बंगाल प्रांत सुलभ राज्य करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम या दोन प्रांतात विभागला.

पूर्वेकडील बंगाल भागात मुस्लिमांचे अधिपत्य आहे तर पश्चिम भागातील बंगाल प्रांतात हिंदू व इतरांचे प्राबल्य आहे. यास्तव भारतात असलेल्या बंगाल प्रांतास पश्चिम बंगाल असे संबोधले जाते. मात्र पूर्वेकडील बंगाल प्रांत हा १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर बांगलादेश झाला.

असा हा सर्व बंगाल प्रांत एकेकाळी बौद्ध संस्कृतीने दुमदुमला होता. आजही असंख्य स्तूप, विहार बांगलादेशात आणि पश्चिम बंगाल मध्ये आढळून येतात. मुळात बंगाल हे नाव बौद्ध संस्कृती वरून आले आहे. बंगालच्या संस्कृतीचा मूळ पाया हा बुद्धिझम आहे.

बंगाली भाषेतील सर्वात जुने साहित्य ९ व्या शतकातील ‘चर्यापाद’ हे वज्र्ययानी बौद्ध पंथाचे काव्य आहे. आणि ताडपत्रावरील ते हस्तलिखित १९०७ साली हरिप्रसाद शास्त्री यांनी नेपाळमधील रॉयल कोर्ट लायब्ररीमधून शोधून काढले. वंगीय साहित्य परिषदेतर्फे ते पुन्हा छापले गेले. त्यास ‘बुद्धगाण ओ दोहा’ असे सुद्धा म्हटले जाते.

प्राचीन स्थानिक अभअत्त आणि पालि भाषेतून आजची आसामी,बंगाली, भोजपुरी, उडिया, माघाही, मैथिली भाषा तयार झाली आहे. बंगालमध्ये धर्म म्हणजे बुद्धधर्म असे ओळखले जाते.

प्राचीन बौद्ध संस्कृतीचा ठेवा अनेक ठिकाणी नामनेष झाला असला तरी प्राचीन बंगाली साहित्यातून बौद्ध संस्कृतीचा सुगंध दरवळत आहे. बंगाली कवी, तत्वज्ञ, लेखक, चित्रकार, नाटककार, धार्मिक चिंतनशील रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यातून सुद्धा धम्माचा प्रभाव दिसून येतो.

सम्राट अशोक राजा पासून ते पाल राजवटीपर्यंत (इ.स.पू २६८ ते इ.स. ११७४) बौद्धधर्म तेथे बहरला होता. १२ व्या शतकानंतर मुस्लिम आक्रमणामुळे तो बंगाल प्रांतातून नाहीसा होत गेला. मात्र आजही बांगलादेशात महास्थानगढ, सोंमपुरा विहार, मैनामती जवळील सालबन विहार (शालवन विहार), जगद्दाला महाविहार, वारी-बातेश्वर इत्यादी प्रसिद्ध बौद्ध स्थळे आहेत.

पश्चिम बंगालमध्ये ताम्रलिप्ति, रक्तमृत्तिका महाविहार, जग्जीबनपूर, चंद्रकेतूगढ, मूगलमारी, डम डम जवळील उत्खनन अशी अनेक बौद्धस्थळे आहेत. तसेच येथे अनेक भागात पुरातन स्थळासबंधी न ऐकलेल्या लोककथांचा भरणा आहे.

त्यामुळे तिथल्या मूळ बौद्ध संस्कृतीवर प्रकाश पाडून पुन्हा इतिहासाचे लेखन झाले पाहिजे असे सर्वांना वाटते. आणि म्हणूनच तेथील नवीन स्मार्ट पिढी उत्खननातून आढळलेल्या बौद्ध संस्कृतीच्या ठेव्याची लोकांना माहिती व्हावी यासाठी तेथे बुद्धिस्ट हेरिटेज फेस्टिव्हल आयोजित करीत आहे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)