ब्लॉग

भूतान देशाचे बौद्ध राजाराणी

इंग्लंडच्या राजाराणीचे कौतुक आजपर्यंत सगळ्यांनी केले. जगभर त्यांच्या राजघराण्याला मिडीयाने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्याचे विवाह सोहळे, नवीन बालकाचे आगमन, त्यांची वर्तणूक याबाबत अफाट स्तुति केली. ब्रिटिश राजघराण्यांनी त्यांची रूढी, परंपरा सोडून कसेही वागले तरी त्याची बातमी होते. त्यामुळे भारतातील सामान्य नागरिकाला सुद्धा डायना कोण होती आणि राजपुत्र कोण आहे हे माहित आहे. पण त्याला भूतान देशाचे राजाराणी कोण आहेत, हे विचारले तर सांगता येणार नाही.

ज्या देशाच्या हॅपिनेस इंडेक्सने आज सर्व जग अचंबित झाले आहे तो भूतान देश आणि तेथील राजघराण्यातील राजे ‘जिगमें केसार नामग्याल वांगचूक’ आणि राणी ‘आशी जेतसन पेमा’ यांचे खरोखर कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या देशाची लोकसंख्या अवघी ७.७० लाख आहे. जगातील हे छोटे आणि कमीत कमी उद्योगधंदे असलेले राष्ट्र आहे. आणि तरीही त्यांनी हैड्रोपॉवरच्या मदतीने व जंगल आणि शेती व्यावसायाने आपली आर्थिक बाजू भक्कम केलेली आहे. त्यांचा एकूण राष्ट्रीय सुखाचा निर्देशांक हा त्यांच्या एकूण आर्थिक निर्देशांकाच्या वरचढ असल्याने आज ते जगातील सुखी आणि आनंदी राष्ट्र आहे. आणि याचे श्रेय त्यांच्या बौद्ध संस्कृतीत आहे. या देशातील ७५% टक्के लोक वज्रयानी बौद्ध परंपरेचे असून उरलेले इतर धर्मीय आहेत. पण सर्व एकमेकांचे हातात हात घेऊन प्रगती करीत आहेत. निसर्गाचे रक्षण करीत आहेत.

भूतानच्या या राजाराणीला ‘ड्रॅगन किंग’ आणि ‘ड्रॅगन क्वीन’ असे सुद्धा आदराने आणि अभिमानाने म्हटले जाते. सध्या या हिमालयातील देशाच्या राजा-राणीला दुसरे मूल होणार असून नुकतीच त्याची घोषणा राष्ट्रीय दिवस सोहळ्यात राजे जीगमें केसर नामग्याल वांगचूक यांनी केली. जेव्हा ही बातमी तेथील लोकांना कळली तेव्हा अनेकांनी देशाच्या राजाला अभिनंदनपर संदेश पाठविले. राणीची आणि बाळाची प्रकृती चांगली राहावी यासाठी ठिकठिकाणी बौद्ध प्रार्थना म्हटल्या गेल्या. बुद्ध उपदेश आणि बौद्ध परंपरा काटेकोरपणे पाळणारा हा देश त्यांच्या राजालाही खूप मानतो. तसेच तेथील पुरातन मॉनेस्ट्रीज, डोंगरदऱ्यातील स्तुप यांची काळजी घेतो.

अशा या शांतताप्रिय देशातील राजराणी उच्चशिक्षित असून हे जोडपे सन २०११ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांना ५ फेब्रुवारी २०१६ रोजी एक पुत्र झाला. त्याच्या जन्म प्रित्यर्थ मार्च २०१६ मध्ये १.०८ लाख झाडे लावण्यात आली. खरोखर ज्या राष्ट्रातील जनतेला वृक्ष संवर्धनाचे महत्व समजले त्या राष्ट्रावर निसर्गाची नेहमीच कृपादृष्टी राहील. आज निसर्गरम्य भूतान देश पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत आहेत. म्हणूनच इंग्लंडच्या राजघराण्यापेक्षा भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या मार्गावर चालणारे भूतानचे राजघराणे मला अधिक प्रिय वाटते. आणि त्यांचे कौतुक करणे मी योग्य समजतो.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)