जगभरातील बुद्ध धम्म

रोमन साम्राज्यात बौद्ध भिक्खू

रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट ऑगस्टस सीझर हा इ. स.पूर्व २७ ते इ. स. १४ पर्यंत गादीवर होता. ज्युलियस सीझरचा हा पुतण्या ज्युलियसच्या हत्येनंतर गादीवर आला. त्याच्या काळात सर्व राजकीय विरोधकांचा त्याने नायनाट केला. संपूर्ण रोमन साम्राज्याचा बादशहा झाल्यावर त्याने स्वतःला ऑगस्टस ( पवित्र ) ही पदवी लावली. अशा ह्या रोमन साम्राज्याच्या दरबारात दोन हजार वर्षापूर्वी गुजरातच्या भडोच मधील एका बौद्ध भिक्खूने येऊन भगवान बुद्ध यांचे तत्वज्ञान सांगितले, ही अचंबित करणारी गोष्ट होती. त्याकाळात स्ट्राबो हा ग्रीक तत्वज्ञानी, इतिहासकार आणि भूगोलवेत्ता होऊन गेला. त्याने ऑगस्टस सिझर याच्या दरबारात आलेल्या राजदूत आणि बौद्ध भिक्खूबद्दलची नोंद निकोलस दमास्कस यांचेकडून घेतली होती. त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे.

पोरस म्हणजेच पुरूराजा. ज्याचे सिकंदर ( अलेक्झांडर ) बरोबर युद्ध झाले. त्याचे साम्राज्य आताच्या पाकिस्तानातील झेलम नदीपासून पंजाबमधील चिनाब नदीपर्यंत पसरलेले होते. त्यावेळी त्याने रोमच्या दरबारात एक ग्रीक राजदूत भाडोचमार्गे पाठवीला. या राजदूताने स्वतःच्या अंगावर पत्राचा मजकूर लिहुन घेतला होता. तसेच त्याच्या बरोबर भरूकच्छ इथले एक बौद्ध भिक्खू होते. धम्मप्रसार करण्यासाठी ते त्याच्या बरोबर निघाले असावेत. भरूच त्यावेळी मोठे व्यापारी बंदर होते. जहाजाने समुद्रातून प्रवास करीत व पुढे पायी चालत अथेन्समध्ये ते पोहोचले. तेव्हा तेथील लोक चिवर परिधान केलेली व्यक्ती पाहून चकित झाले.

ऑगस्टस सिझरने सुद्धा राजदूता बरोबर आलेल्या या भिक्खूची चौकशी केली. अनेकांनी त्यांना बुद्धांबाबत प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी भगवान बुद्धांची माहिती दिली तसेच त्यांच्या उपदेशांचे सार कथन केले. मात्र काही दिवसांनी अथेन्स येथील वास्तव्यात त्यांनी आत्मदहन करून घेतले असा उल्लेख आहे. आणि मग ऑगस्टस सिझरने त्या भिक्खूचे समाधी स्थळ तेथे उभारले. त्यांच्या समाधीस्थळावर खालील वाक्य होते. ‘The Shramana Master, an Indian, a native of Bargosa, having immortalized himself according to the custom of his country, lies here’.

हा काळ येशू ख्रिस्ताच्या उदयाचा होता. त्यांच्या जन्मापूर्वी बौद्ध भिक्खू रोमन साम्राज्यात पोहोचले होते हे सत्य होते. विल डूरंट या विद्वानाने १९३० मध्ये म्हटले आहे की सम्राट अशोकाने धम्म प्रसारासाठी बौद्ध भिक्खूंना नुसते भारतातच नाही तर सीरिया, इजिप्त आणि ग्रीस मध्येही पाठविले आणि धम्माचा तेथे प्रसार केला. त्यामुळे पुढे ख्रिस्ती शिकवणूकीत पंचशिलाचे प्रतिबिंब पडत गेले. जीवनातील ती पवित्र बंधने ( Sanctity of Life) खालील प्रमाणे होती.

Rejection of violence,Compassion for others, Emphasis of charity, Confession and Practice of virtue.

स्ट्राबो या भूगोलवेत्त्याने केलेल्या नोंदीमुळे बौद्ध भिक्खूं भारताबाहेर पार रोमपर्यंत गेल्याचे उघडकीस आले. प्रसिद्ध दिवंगत लेखक मा.श.मोरे यांनीसुद्धा त्यांच्या पुस्तकात स्ट्राबोच्या नोंदीचा उल्लेख केलेला आहे. परंतु त्यांनी पोरस राजा ऐवजी मिलींद राजाने ( ग्रीक राजा मिनांडर ) राजदूत पाठवल्याचे म्हटले आहे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ट बौद्ध इतिहास अभ्यासक)

One Reply to “रोमन साम्राज्यात बौद्ध भिक्खू

Comments are closed.