बातम्या

सिक्कीम राज्यात भारतातील पहिलेच स्वतंत्र बौद्ध विद्यापीठ होणार

दीड हजार वर्षापूर्वी भारतात देवालये आणि तिर्थक्षेत्रापेक्षा शिक्षण संस्कृतीला जास्त महत्त्व होते. म्हणूनच विक्रमशिला विद्यापीठ (मगध- बिहार राज्य ), नालंदा विद्यापीठ (बिहार राज्य ), तक्षशिला विद्यापीठ ( रावळपिंडी-पाकिस्तान), उदांतपुरी विद्यापीठ ( बिहार राज्य -पाल राजवट), सोंमपुरा विद्यापीठ ( बांग्लादेश ), जगद्दाला विद्यापीठ ( बांग्लादेश ), वल्लभी विद्यापीठ ( गुजरात राज्य ), कान्हेरी विद्यापीठ ( महाराष्ट्र राज्य ) अशी नावाजलेली विद्यापीठे एकेकाळी भारत खंडात होती. दक्षिण भारतात तर अनेक बौद्ध विहारे ही छोटी शैक्षणिक केंद्रेच होती. शेकडो शिक्षक या विद्यापीठात आणि विहारात ज्ञानार्जनाचे काम करीत होते.

आशिया खंडातील अनेक देशांतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी इथे येत होते. या बौद्ध शिक्षण संस्था सर्वांसाठी खुल्या होत्या. कोणताही भेदभाव न ठेवता या बौद्ध शिक्षण संस्थांत प्रवेश मिळत असे. ब्राह्मणी गुरुकुल पद्धती प्रमाणे एकाच गुरुचे वर्चस्व इथे नसल्याने या शिक्षण संस्थांचा प्रचंड विस्तार झाला. त्रिपिटका शिवाय येथे तर्कशास्त्र (हेतूविद्या ), व्याकरण आणि तत्वज्ञान (शब्दविद्या ), औषधोपचाराचे शिक्षण ( चिकित्सा विद्या) असे अनेक विषय शिकवले जात होते. प्रज्ञा विकसित करणे हा बौद्ध शिक्षण पद्धतीचा मूळ गाभा होता. त्यामुळे अनेक भारतीय बौद्धांनी सर्वात जास्त विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिले आहेत हे सत्य आहे.

तीच परंपरा पाळून भारतातील ईशान्य भागातील सिक्कीम राज्य बौद्ध विद्यापीठ उभारणार आहे. त्यासंबंधीचा ठराव नुकताच तेथील विधानसभेत २१ सप्टेंबर २०२० रोजी मंजूर झाला. या विद्यापीठाचे नाव ‘खांगचेनझोन्गा बौद्ध विद्यापीठ’ (Khangchendzonga Buddhist University म्हणजेच KBU ) असे असून सिक्कीम सरकारने स्थापन केलेले भारतातील पहिलेच स्वतंत्र बौद्ध विद्यापीठ असणार आहे. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग यांनी सांगितले की बऱ्याच दिवसापासून सिक्कीम जनतेची ही मागणी यानिमित्ताने पूर्ण होत आहे. जागतिक दर्जाच्या या विद्यापीठात सर्व थरातील लोकांना प्रवेश असेल. तसेच धम्माच्या शिक्षणपद्धती बरोबर अनेक आधुनिक विज्ञान विषय येथे शिकवण्यात येतील. हे विद्यापीठ UGC शी संलग्न राहणार आहे. वज्रयान बुद्धीझमचा सिक्कीममध्ये मोठा प्रभाव आहे. त्यामुळे इतर धर्मीयसुद्धा येथील बौद्ध विहारात जात असतात. त्यामुळे या बौद्ध विद्यापीठाला मोठा पाठिंबा मिळाला आहे.

खरेतर बौद्ध संस्कृतीचा, विद्यापीठाचा वारसा ज्या ज्या राज्यात आहे, त्या त्या राज्यांनी भारताच्या एकेकाळच्या या संपन्न शिक्षण पद्धतीचा वारसा म्हणून शासकीय बौद्ध विद्यापीठ आतापर्यंत उभारले पाहिजे होते. कारण नुसते शिक्षण कामाचे नाही. त्याबरोबर मानवी मूल्ये, सदाचार, शील, नीतिमत्ता, ध्यानधारणा आणि प्रज्ञा विकास यांची सुद्धा आताच्या काळात नव्या पिढीला नितांत गरज आहे. बोरीवलीला कान्हेरी लेणी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्या जवळ असे एखादे विद्यापीठ उभे राहील काय ?

-संजय सावंत, नवी मुंबई (ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)