इतिहास

बिहारमधील पार्वती टेकडीवरील गुहा

बिहारमध्ये नावाडा जिल्ह्यात इंद्रशैल नावाची गुहा असलेली टेकडी पार्वती गावाजवळ आहे. बौद्ध साहित्यात लिहिले आहे की या टेकडीवरील गुहेत भगवान बुद्धांनी एकदा वर्षावास केला होता. तेव्हा तेथे इंद्रशैल हा आकाशदेव आला. व त्याने धम्मासंबंधी ४२ शंका बुद्धांना विचारल्या. तेव्हा बुद्धांनी त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले. ही टेकडी जवळजवळ दीडशे फूट उंच असून अडीच हजार वर्षांपूर्वी इथे जंगल होते. त्याकाळी त्याला वेदिय पर्वत असेही म्हणत. काळाच्या ओघात पर्वताचे ‘पार्वती’ झाले. चिनी बौद्ध भिक्खू हुएनसॅगं यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात इथे भेट दिल्याचे नमूद केले आहे. दुसरे चिनी प्रवासी भिक्खू फाहियान यांनी सुद्धा पार्वती जवळची इंद्रशैल गुहा बघितल्याचे नमूद केले आहे.

या टेकडी जवळ ‘नव नालंदा महाविहार’ या विद्यापीठाची एक तुकडी २००६ मध्ये संशोधनार्थ आली होती. त्यांनी त्या बाबतचा अहवाल तयार करून त्यावेळचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सादर केला. त्यांनी तात्काळ हे स्थळ पुरातत्व खात्याच्या आधिपत्याखाली आणले आणि २२ जानेवारी २०१० रोजी प्रत्यक्ष तेथे भेट दिली. तेथील गुहा व आजूबाजूचा परिसर पाहून ते प्रभावित झाले व त्यांनी ते स्थळ विकसित करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून दिला. आता तेथील टेकडीवर बुद्ध विहार बांधले असून सुंदर बुद्धमूर्ती स्थापित केली आहे. तसेच पायऱ्या आणि संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. व गुहेपर्यंत जाण्यासाठी रस्ता बांधला.

तेथील शाळेचे मुख्याध्यापक प्रसादजी यांनी देखील गावातील लोकांना टेकडीचे महत्व सांगून तिचे पावित्र्य जपले. आता तेथे परदेशी पर्यटकांची सुद्धा ये-जा चालू झाली आहे. खरोखर ‘नवं नालंदा महाविहार विद्यापीठ’ बिहार यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या या कार्यास माझा सलाम.

– संजय सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *