बातम्या

कोरोना व्हायरस आणि बौद्ध जगत

कोरोना व्हायरसमुळे बौद्ध जगतात काय काय घडामोडी गेल्या दहा दिवसात झाल्या त्याची ही माहिती.

१) मे महिन्यात थायलंडमध्ये होणारा संयुक्त राष्ट्र परिषदेचा १७ वा वैशाख दिवस समारंभ रद्द करण्यात आला आहे. थाई संघ वरिष्ठ परिषदेने याबाबत पत्रक जारी केले आहे. या अगोदर ११ वेळा हा समारंभ थायलंडमध्ये झाला होता व मागच्या वर्षी तो व्हिएतनाम मध्ये साजरा केला होता.

२) भूतानमध्ये एकमेव कोरोनाग्रस्त असलेला अमेरिकन नागरिक आता बरा झाला असल्याने त्याची रवानगी अमेरिकेत करण्यात आली असून भूतानमध्ये आता एकही कोरोनाग्रस्त व्यक्ती नाही. भूतान हे कोरोना मुक्त राष्ट्र झाले आहे. भूतानमधील मेडिकल एक्सपर्ट आणि सिंगापूर मधील विशेष रोग तज्ञ यांनी त्याची काळजी घेतली होती.

३) थाई देशात लोपबूरी या शहरात माकडांचा धुडगूस चालला आहे. या शहरात प्राचीन बौद्ध विहारे आहेत. दररोज तेथे असंख्य पर्यटक येतात आणि स्थळदर्शन करताना तेथील माकडांना सुद्धा खायला देतात. पण कोरोना व्हायरसमुळे एकही पर्यटक तेथे सध्या फिरकत नसल्याने माकडांची उपासमार होत आहे. त्यामुळे त्यांनी शहरात खाण्यासाठी धाव घेतली आहे.

४) श्रीलंका, तिबेट, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया येथील अनेक प्रसिद्ध बौद्ध विहारे बंद करण्यात आली असून होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत.

५) काही विद्यापीठांनी बुद्धिस्ट स्टडीचे ऑनलाईन कोर्सेस चालू केले आहेत. यामध्ये ड्युक विद्यापीठ देखील आहे. व्हायरसमुळे विद्यापिठात जाण्यास बंदी असल्याने विद्यार्थ्यांनी घरी बसून अभ्यास करावा यासाठी ते कोर्सेस चालू करण्यात आलेले आहेत. ‘कोर्सेरा’ हा अमेरिकन ऑनलाइन शिकण्याचा प्लॅटफॉर्म असून २०१२ मध्ये स्टॅनफोर्डचे प्राध्यापक यांनी तो स्थापन केला. येथेही जगातील असंख्य विद्यार्थी ऑनलाइन ऍडमिशन घेऊन पदव्या मिळवितात.

६) श्रीलंकेची सतत चालू असलेली भारतातील बौद्ध स्थळांची यात्रा व्हायरसमुळे रद्द करण्यात आली आहे.

७) बर्कबे येथील वज्रपाणी कंदम्प बौद्ध केंद्राद्वारे ऑनलाईन ध्यानवर्ग चालू करण्यात आले आहेत. व्हायरसला घाबरून न जाता त्याला धौर्याने तोंड कसे द्यावे हे ध्यानमार्गाने शिकविले जाते. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याचे बल प्राप्त होते.

८) तैवानमध्ये ‘धर्मा ड्रम माऊंटन’ तर्फे ऑनलाइन बुद्ध प्रार्थना म्हटली जात आहे. बुद्ध वंदना श्रद्धापूर्वक व सदभावनेने म्हटल्याने सुखद शांतीचा अनुभव येतो. असा दावा त्या संस्थेच्या प्रमुखांनी केला आहे.

आपण भारतीय बौद्धांनी देखील संपूर्ण बुद्ध वंदना, महामंगल सुत्त, करणीयमेत्त सुत्त, रतन सुत्त, परित्राण पाठ, जयमंगल अष्टगाथा घरी दररोज म्हटल्यास त्याची प्रचिती अनुभवता येईल. मुलांना देखील पालि भाषेतील सर्व वंदना पाठ होतील. सुखशांतता प्राप्त होईल. मनोबल वाढेल आणि मंगलमय वातावरण निर्माण होईल.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)