बुद्ध तत्वज्ञान

एका उडाणटप्पूची धम्मदीक्षा!

प्राचीनकाळी राजगृहात एक गुंड राहात होता. तो आईवडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्य, चन्द्र व अग्नी यांची पूजा करी आणि मगरमस्त राही. परंतु, पूजा आणि बलिदान यांसारखे शारीरीक कष्टाचे विधी कितीही केले तरी, सतत तीन वर्षे दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना.

शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची चौकशी करण्याचे त्याने ठरविले. तेथे पोहोचल्यावर बुद्धाचे तेजस्वी व्यक्तीमत्त्व पाहून त्याने त्यांच्या पायांवर लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झाला आहे, हे सांगितले.

नंतर भगवंतांनी त्याला पशूना बळी देण्यातील मुर्खपणा आणि ज्या विधीचा हदयावर काहीही परिणाम होत नाही, आणि ते ज्यांच्यासाठी करावयाचे त्यांच्याविषयी कसलाही आदरभाव किवा कर्तव्यबुद्धी यांची जाणीव होत नाही, अशा विधींचा निरुपयोगीपणा समजावून सांगितला. आणि शेवटी भगवंतांनी अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या की, त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झाले.

तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः मुलाचे आईबाप त्यांची पूजा करण्यासाठी तेथे आले. मुलाच्या त्या मातापित्यांना पाहून आणि आपल्या मुलाच्याविषयी त्यांनी मगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटल्या.

“थोर पुरुष हा संपूर्णपणे निरिच्छ असतो. तो स्वतः स्वयंप्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच राहतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दु:खाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही. निर्भयपणे तो आपली बद्धिमत्ता व्यक्त करतो.”

“शहाणा मनुष्य (भद्र) ऐहिक व्यवहाराशी आपला संबंध ठेवीत नाही, संपत्ती, संतती, जमीनजुमला यांची त्याला इच्छा नसते. नेहमी शीलाचे सावधानतेने पालन केल्यामुळे आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरल्यामुळे तो भलत्याच सिद्धान्ताच्या (संपत्तीच्या किंवा मानाच्या) नादी लागत नाही.”

“अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते. हे ओळखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रतेतून मद्गुणाकडे (पावित्र्याकडे) त्याला वळविण्याचा प्रयत्न करीत असतो.”

संदर्भ: भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
लेखक:डॉ.भीमराव रामजी आंबेडकर