इतिहास

अंदमान बेटावर तीन मोठे बौद्धविहार आहेत हे कुणालाच ज्ञात नाही

भारतातून अनेक पर्यटक अंदमान-निकोबार या बेटावर पर्यटनासाठी जातात. महाराष्ट्रातून सुद्धा अनेक सहली अंदमान-निकोबार येथे जातात. या सहली दरम्यान सुंदर असंख्य समुद्र किनारे, संग्रहालय, पार्क, गुहा, तेथील संस्कृती, विविध बेटे, तीवर जंगल रस्ते आणि सेल्युलर तुरुंग यांचे दर्शन केले जाते. निसर्गाची मुक्त उधळण या बेटांवर पहावयास मिळते. परंतु या बेटावरच तीन मोठे बौद्धविहार आहेत हे कुणालाच ज्ञात नाही. तिथल्या पर्यटन विभागाने पर्यटन स्थळांच्या यादीत त्याचा समावेश केलेला नाही. त्यामुळे आयोजित केलेल्या सहलीच्या कार्यक्रमात सुद्धा त्या स्थळांचा अंतर्भाव केला जात नाही.

पोर्ट ब्लेअर मधील या बौद्ध विहारांचे बांधकाम सन १९३६ मध्ये करण्यात आले होते. त्यावेळी अंदमान-निकोबार बेटावर बर्मी आणि थायी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर होती. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यातील बरेचजण आपल्या मायदेशी निघून गेल्यामुळे त्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे या बौद्ध विहारांची देखभाल दुरुस्ती करणे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

हे पण वाचा : व्हिएतनाम देश आणि तेथील बुद्धिझम

पावसाळ्यात येथील दगडी भिंतीवर शेवाळ साचते. रस्ता निसरडा होतो. विहारांचे छत सुद्धा बदलणे आवश्यक झाले आहे. विहाराची कंपाऊंड भिंत पडण्याच्या मार्गावर आहे. या विहारांची देखभाल व दुरुस्ती करणारे ‘बर्मीज बुद्धीष्ट मिशन’ या संस्थेचे तेथील मुख्य सचिव रवींद्रन असून त्यांनी सांगितले की पुरेसा निधी नसल्यामुळे या विहारांची अशी अवस्था झाली आहे. शिवाय पर्यटक विभाग सुद्धा या पुरातन बौद्ध विहारांकडे दुर्लक्ष करीत आहे.

इथे वंदूर बीचकडे जाताना टेकडीजवळ मेमियो नावाचे ठिकाण लागते. तेथील बुद्ध विहार स्थानिक थायी समाजाने दुरुस्त केले आहे. तेथे आता साधनेसाठी मोठा हॉल बांधण्यात येणार आहे. जेणेकरून परदेशी पर्यटक तेथे येऊ शकतील. तसेच मध्य अंदमानात ‘मायाबंदर’ नावाचे मोठे बंदर आहे. सिद्धार्थ यांची माता ‘महामाया’ यावरून हे नाम इथल्या बंदराला पडले असावे.

हे पण वाचा : धर्मानंद कोसंबी – विसाव्या शतकातील बौद्ध धर्माचे स्कॉलर

प्राचीन काळी कलिंग बंदरातून सुवर्णभूमीला जहाजातून जाताना अंदमान-निकोबार बेटे लागत होती. परंतू त्यावेळच्या रानटी लोकांमुळे कुठलीच संस्कृती तेथे टिकली नाही. सन १८५० नंतर ब्रिटिशामुळे तेथे विकास होऊ लागला. व अनेक लोक स्थायिक होऊ लागले. तेथील एका जुन्या बुद्ध विहारात ‘मेशन म्यांत’ नावाच्या ७३ वर्षाच्या आजी बर्मामधून दरवर्षी बुद्धपोर्णिमेला येऊन पूजा करतात आणि भोजनदान देतात. बंगालच्या उपसागरात असलेली ही बेटे थायलंडच्या ‘फुकेत’ स्थानापासून जवळ आहेत. परंतू ही बेटे भारताच्या ताब्यात असल्याने थाई देशाला विहारांच्या दुरुस्तीचे काम करता येत नाही. शिवाय भारत सरकारचा लाल फितीचा कारभार त्यांना माहीत आहे.

पोर्ट ब्लेअर येथील बुद्धमूर्ती उद्यान

सचिव रविंद्रन यांनी पुढे सांगितले की एक बौद्ध देश येथील विहाराच्या देखभाल दुरुस्तीसाठी नियमित निधी इथल्या प्रशासनास पाठवितो. परंतु अंदमान-निकोबार येथील निगरगट्ट प्रशासन हा निधी बर्मी बुद्धिस्ट मिशनला दुरुस्तीसाठी देतच नाहीत व स्वतःही देखभाल-दुरुस्ती करीत नाहीत. तो निधी मधल्यामधे सगळा गिळंकृत केला जातो किंवा दुसऱ्या कामासाठी वळविला जातो.

तरी या बाबत आवाज उठविणे आवश्यक असून बौद्ध बांधवानी अंदमान-निकोबारच्या प्रशासनास व पर्यटन विभागास पत्र लिहून किंवा ईमेल पाठवून बौद्ध विहारांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेणे बाबत तगादा लावला पाहिजे. तसेच तेथे भरत असलेल्या द्वीप महोत्सवात बौद्ध विहारांचा देखील समावेश व्हावा या बाबत पाठपुरावा केला पाहिजे. तरच अंदमान-निकोबार मध्ये सुद्धा बौद्ध विहार आहेत हे जगास कळेल. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर जावे.

https://www.andamansheekha.com/17509
https://www.andamansheekha.com/24085

पत्ता :-
Directorate of Tourism
Andaman & Nicobar Administration
Kamraj Road, Port Blair
744101
Email – thedirectortourism@gmail.com

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)