बुद्ध तत्वज्ञान

श्रेष्ठ भिक्खू ‘राष्ट्रपाल’ याची निस्पृहणीयता

भगवान बुद्ध कुरूराष्ट्रात प्रवास करीत असताना ‘थुल्लकोठीत’ नावाच्या शहरापाशी आले. तेथील रहिवासी त्यांची कीर्ती ऐकून ते सर्व त्यांच्या दर्शनाला गेले. नमस्कार करून, कुशल प्रश्न विचारून ते मुकाट्याने एका बाजूस बसले. त्यावेळी थुल्लकोठीतवासीयांना भगवान बुद्धांनी धर्मोपदेश केला. तेव्हा तरुण राष्ट्रपाल तिथे होता. त्याच्या मनावर त्या उपदेशांचा एकदम परिणाम झाला.

बुद्धांप्रती अपार श्रद्धा दाटून आली. तेंव्हा त्याने प्रव्रज्या घेण्याचा आपला विचार त्याने भगवंतांना कळविला. परंतु आई बापाची परवानगी नसल्यामुळे त्याला प्रव्रज्या देण्याचे भगवंतांनी नाकारले. तेव्हा घरी जाऊन प्रव्रज्जा घेण्यास परवानगी देण्याबाबत त्याने आईबापांकडे हट्ट धरला. त्यांनी त्याची पुष्कळ प्रकारे समजूत घातली व परवानगी देता येणे शक्य नाही असे त्यांनी सांगितले. तेव्हा एकतर परवानगी द्या, नाहीतर मी अन्नग्रहण करणार नाही असे सांगून राष्ट्रपाल तिथेच जमिनीवर पडला.

त्याच्या सख्यासोयऱ्यानीं त्याची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. परंतु राष्ट्रपाल याच्या निश्चयापुढे त्यांचे काही चालले नाही. दोन-तीन दिवस गेले. राष्ट्रपाल क्षीण झाला. शेवटी आईबापांनी परवानगी देऊन त्याचे समाधान केले. मात्र त्यास अट घातली की प्रव्रज्या घेतल्यावर आईबापाच्या भेटीस यावे. मग खाऊन थोडे बळ आल्यावर दुसऱ्या दिवशी राष्ट्रपालने भगवंतापाशी जाऊन प्रव्रज्या घेतली.

दोन आठवड्यांनी भगवान त्याला बरोबर घेऊन भिक्षु संघासह श्रावस्तीला आले. तेथे एकांतात राहून राष्ट्रपाल याने मोठ्या प्रयत्नाने थोड्याच अवधीत अहर्त पद मिळविले. पुढे काही दिवसांनी त्याने आईबापाला भेटण्याची परवानगी मागितली. ध्यानसाधनेत त्याने केलेली उन्नती पाहून भगवंतांनी त्याला स्वदेशी जाण्याची परवानगी दिली. भिक्षाटनासाठी राष्ट्रपाल आपल्या शहरात परत आला.

ज्यावेळी तो त्याच्या घरासमोर आला, तेव्हा त्याचे वडील दिवाणखान्यात बसले होते. मुंडण केलेला राष्ट्रपाल दरवाजात उभा राहिला. तेव्हा त्याला पाहून त्याचे वडील म्हणाले ‘या श्रमणानीं आमच्या एकुलत्या एका मुलाला भिक्षुक केले’ असे बोलून ते त्यांना दोष देऊ लागले. अर्थात राष्ट्रपालाला आपल्या पित्याच्या घरी शिव्या शिवाय दुसरे काहीही मिळाले नाही. परंतु त्याने आपली ओळख अजिबात सांगितली नाही.

तो परत जायला निघाला तेव्हा त्याच्या घरची एक दासी शिळे अन्न फेकण्यासाठी बाहेर आली. तिला पाहून राष्ट्रपाल म्हणाला ‘भगिनी फेकायचे असेल तर माझ्या पात्रातच घाल’. तिने त्याच्या भिक्षापात्रात शिळे अन्न घातले. पण इतक्यात तिची खात्री पटली की हाच आपल्या मालकाचा पुत्र आहे. ताबडतोब तिने हे वर्तमान यजमान बाईंना सांगितले.

राष्ट्रपालच्या पित्यास हे कळताच तो हळहळला. दारात आलेल्या पुत्रास ओळखू न शकल्याने त्यास खंत वाटली. त्याच बरोबर पुत्राने आपली ओळख सुद्धा न सांगितल्याने त्याच्या निस्पृहणीयतेचा त्यास अभिमान वाटला. व तो तात्काळ त्यास शोधण्यासाठी बाहेर पडला. बुद्धांनी देखील श्रद्धेने प्रव्रज्या घेतलेल्या भिक्खूंत राष्ट्रपाल अग्रस्थानी असल्याचे सांगितले आहे.

अशीच सिरिलंकेतील कोरंडक भिक्खूच्या निरपेक्षतेची एक सुंदर गोष्ट विशुद्धिमार्गात आहे. व आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी त्यांच्या पुस्तकात कथन केली आहे. या कोरंडक भिक्खूचा एका वर्षावासात आपल्या मूळ गावाजवळील विहारात मुक्काम होता. गावकरी अनेकदा भोजनासाठी निमंत्रण देत. तेव्हा तो भिक्षापात्र घेऊन गावात जात असे. एकदा स्वतःच्या घरातून भोजनाचे निमंत्रण आले असता तो घरी आला. परंतू आईने सुद्धा त्यास ओळखले नाही. व कोरंडक याने सुद्धा ओळख सांगितली नाही.

वर्षावास संपल्यावर कोरंडक दुसरीकडे निघून गेला. जेव्हा दुसऱ्या भिक्खूकडून तिला समजले की आपला मुलगा तीन महिने इथे भिक्षाटनासाठी येत होता, तेव्हा न ओळखल्याबद्दल तीला तीव्र दुःख झाले. तसेच घरी भोजनासाठी येऊन सुद्धा ओळख न सांगितल्याबद्दल त्याच्या स्पृहणीयतेचा तिला अभिमान वाटला.

अशी निरपेक्षता, निस्पृहणीयता आजकाल कुठेच पाहण्यास मिळत नाही. अनेकजण धम्मकार्य करतात पण त्याचा डंका ही वाजवितात. भरपूर दान देतात पण दानशूर असल्याचा ढोल ही बडवितात. समाजकार्य, धम्मकार्य करतात पण स्वतःची पाठही थोपटून घेतात. सर्वांना खूप मदत करतात पण नेत्यांबरोबर स्वतःचे फोटो ही छापतात. स्व-गौरव करण्यात काहीजण जास्त जागरूक असतात. मात्र धम्माला खऱ्या अर्थाने जो धारण करतो तो या सर्व दोषांपासून अलिप्तपणे वावरतो. व उथळ पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे खळखळाट करीत नाही.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *