ब्लॉग

बाबासाहेबांची जिवंत स्मारके आता तरी जपणार की नाही?

आजच्या (२५ मे) औरंगाबाद ‘सकाळ’ मध्ये एक वृत्त वाचले. 23 ऑगस्ट १९५८ रोजी औरंगाबाद येथील नागसेन परिसरात उभारावयाच्या मिलिंद रंगमंदिराच्या पायाभरणी समारंभास भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांनी पायाभरणी करतांना जी करनी(थापी) वापरली, ज्यावर त्या घटनेची माहिती कोरली आहे, ही थापी म्हणे जुन्या कचऱ्यात होती. जुना कचरा काढतांना ती सापडली म्हणे. ती करनी सापडली हे चांगले पण ती कचऱ्यात सापडावी याची लाज वाटली. ती करनी जपून ठेवण्याऐवजी कचऱ्यात गेलीच कशी? हा प्रश्न छळतो आहे. ती थापी प्राचार्य एम. ए. वाहुळ यांच्या सारख्या दृष्टी असलेल्या प्राचार्याला सापडावी ही एका परीने चांगलीच गोष्ट घडली. वाहुळ सरांना ती गोष्ट जपावी वाटली या साठी त्यांचे अभिनंदन करायलाच हवे.

पण महाविद्यालयाच्या स्टोअर रुममधील कचऱ्यातील वस्तू कोणाची? ती महाविद्यालयाची की प्राचार्यांच्या वैयक्तिक मालकीची? ती जरी डॉ. वाहुळ यांना सापडली असली तरी ती करनी महाविद्यालयाची आहे. ही बाब स्पष्टच आहे. ती थापी नुसतीच वस्तू नाही तर नागसेन वन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक वारशातील ती एक ऐतिहासिक आठवण आहे. तिचे जतन महाविद्यालयाने करायला हवे. संस्थेने करायला हवे व्यक्तीने नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या औरंगाबादेतील वास्तव्यात असतानाच्या वापरातील वस्तू रूप आठवणी जतन करणारे नामधारी का असेना एक संग्रहालय मिलिंद सायन्स कॉलेज मध्ये आहे. अशा वेळी ती करनी देखील स्वाभाविकपणे त्या वस्तू संग्रहालयात असायला हवी. यात कुणाचे दुमत असणार!

आपल्या कार्यकाळात सापडली म्हणून आपली असे म्हणत वस्तू घरी नेणे, आणि आपल्या संग्रही ठेवणे , ही बाब मनाला पटत नाही. नि प्राचार्य , संस्थेचे पदाधिकारी अशा प्रत्येकाने एकेक वस्तू घेऊन घरी नेऊन ठेवायची असेल तर संग्रहालयाच्या नावावर जी काही एक खोली आहे, ती तरी कशाला हवी आहे? जा घेऊन वस्तू , ठेवा आपापल्या त्या वस्तू घरी सजवून. घ्या स्वतःचे कौतुक करून. घ्या पाठ थोपटून. आता ज्या काही वस्तू उरलेल्या आहेत त्या ही घेऊन जा म्हणावं. नाही म्हणायला काही नतद्रष्ट लोकांनी हे काम आधीच केले आहे. बघा माझ्याकडे काय आहे, असं म्हणत, कुणी बाबासाहेबांचा अती महागडा फाउंटन पेन दाखवतो, कुणी बाबासाहेबांनी वापरलेली हॅट आणि टाय दाखवितो, कुणी बाबासाहेबांच्या डायनिंग टेबलावरील क्रॉकरी दाखवितो, कुणी बाबासाहेबांनी वाचतांना पुस्तकावर केलेल्या खुणा , नोंदी असणारे पुस्तक दाखवितो, कुणी काय कुणी काय? जमेल तसं हे सारं प्रत्येकाने (लुटून)नेलं आहे. आणि त्या वस्तूंवर स्वतःचा अहंकार कुरवाळला आहे. हे खूप क्लेशदायक आहे.

डॉ. बाबासाहेबांनी स्वतःच्या अभिजात सौंदर्यशास्त्रातून साकारलेल्या इमारती, वास्तू . त्यातून दिसणारी त्यांची आधुनिक दृष्टी ही खरे तर बाबासाहेबांची जिवंत स्मारके आहेत. ही जिवंत स्मारकांना माती मोल करायचे आणि शासन दरबारी नवी स्मारके उभी करा म्हणून भांडत बसायचे यात असा कोणता शहाणपणा आहे?

औरंगाबाद येथील नागसेन वन परिसर, मिलिंद आणि इतर शाळा महाविद्यालये ही आमची सगळ्याची आस्था केंद्र आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेल्या या परिसराला भेट देण्यासाठी आजही दूर दुरून लोक श्रद्धेने येतात. त्यांना हे सारे पाहता यावे, नव्या पिढीला हा उज्वल वारसा कळावा यासाठी नागसेन वन परिसरात एक आधुनिक आणि देखणे वस्तुसंग्रहालय उभारले जावे, या माध्यमातून बाबासाहेबांचा जिवंत वारसा जपला जावा, असे मनापासून वाटते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्राचार्य यांनी याकडे लक्ष द्यावे, असे एक चळवळीचा एक नम्र उपासक म्हणून वाटते.

जयभीम।

-डॉ. राजेंद्र गोणारकर, ज्येष्ठ कवी/साहित्यिक, नांदेड