बुद्ध तत्वज्ञान

स्वतःच्या कर्मामुळे शारीरिक तशीच मानसिक सुख-दुखे निर्माण होतात

मनुष्याने स्वतः केलेल्या कर्माची फळे त्यास या जन्मामध्येच (म्हणजे शरीरात प्राण असेल तोवर) भोगावी लागतात. तथापि मनुष्याने स्वतः केलेल्या कर्माशिवाय सृष्टीमधील नियमानुसार ज्या घडामोडी होतात (जसे-भूकंप होणे, पूर येणे, दुष्काळ पडणे, ऊन, वारा, पाऊस, थंडी, इत्यादी) त्यामुळे देखील मानवाच्या वाट्यास सुखदुखे येत असतात. ती शारीरिक सुखदुःखे होत. परंतु मानवाच्या स्वतःच्या कर्मामुळे शारीरिक तशीच मानसिक सुख दुखे निर्माण होतात.

मानवाच्या स्वतःच्या कुशल कर्मामुळे त्याच्या सभोवतालच्या लोकांवर व पुढील येणा-या पिढ्यांवरदेखील कर्माचा परिणाम होतो. भगवंतांनी विशद केलेल्या सुधम्माची फळे आपल्यास आजही २५०० वर्षांनंतरही मिळत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जे महत्कार्य केले, त्याची फळे या देशातील दीनदुबळ्या लोकांना आजही मिळत आहेत. भूतकाळातील ज्या ज्या सत्पुरुषांनी कुशल कर्मे केलीत, त्यांची फळेही आपण उपभोगत आहोत, मातापित्यांनी चांगले लालनपालन केले म्हणजे त्यांच्या सत्कर्माची फळे आपत्यांना मिळतातच. येणेप्रमाणे इतरजनांच्या कर्माच्या फळांचा परिणाम आपल्यावर होत असतो.

तथापि मनुष्याला स्वत:च्या उन्नतीकरिता स्वतःचे कर्म करावी लागतात. मातापित्यांनी कितीही मदत केली, तरी विद्यार्थ्याने स्वतःच जर अभ्यास केला नाही व त्यात मन घातले नाही, तर त्यास चांगले फळ मिळूच शकत नाही. म्हणून भगवंतांनी म्हटले आहे – तुम्हे हि किच्चं आतप्पं अक्खातारो तथागता ।
तुम्हाला स्वतःचे (कुशल) कर्मे करावयास पाहिजेत (त्याची फळे तुम्हास मिळतील म्हणजेच निर्वानाची प्राप्ती होऊ शकेल.) तथागत केवळ मार्गदाता आहेत.

One Reply to “स्वतःच्या कर्मामुळे शारीरिक तशीच मानसिक सुख-दुखे निर्माण होतात

Comments are closed.