बातम्या

तुमची लेणी बघायला कुत्र पण येत नाही…माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

जुन्नर : जुन्नर तालुक्यात भारतातील सर्वात जास्त लेणी असून हा वैभवशाली ऐतिहासिक वारसा जुन्नरला लाभला आहे. अनेक देश विदेशातील अभ्यासक,पर्यटक लेणी पाहण्यासाठी येत असतात.लेणीवर जाण्यासाठी योग्य मार्ग नसतानाही ते येथे येतात. मात्र माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘तुमची लेणी बघायला कुत्रही येत नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य करून बौद्ध लेणी अभ्यासक, संशोधक आणि लेणी प्रेमींचा अपमान केला आहे.

लेण्याद्री लेणी अभ्यासण्यासाठी अनेक अभ्यासक, थायलंड, जपान,चीन, कोरिया, म्यानमार आदी बौद्ध देशातील बौद्ध भीखु,भाविक मुंबई वरून नाणेघाट मार्गे पायी जुन्नर येथील लेणी पाहण्यासाठी येतात. तसेच पुरातत्व विभागाचे विद्यार्थी, बौद्ध बांधव असे अनेक लोक या लेणी पाहण्यासाठी येत असतात.

माजी खासदार आढळराव लेण्याद्री येथे बोलताना म्हणाले की लेण्याद्री गणपतीला दर्शनाला येणाऱ्या भाविकांकडून पुरातत्व विभाग तिकीट घेत आहे. ते बंद करण्यासाठी आम्ही अनेक वर्षे पाठपुरावा करत आलोय. तुमची लेणी बघायला कुत्र पण येत नाही.पैसे घेऊन दर्शन घ्यायचे असे भारतात कुठेच नाही. लेणीला जायला वेगळा रस्ता व मंदिराकडे जायला वेगळा रस्ता करावा. जेणेकरून ज्यांना लेणी पहायची ते पैसे देऊन जातील व ज्यांना दर्शनाला जायचं ते फुकट जातील.

इथे प्रश्न हा आहे की लेण्याद्री हि मुळ बुद्ध लेणी असून या गणपतीची स्थापना अलीकडच्या काळात चैत्यगृहाच्या बाजुच्या विहारात दोन ध्यानगृहे तोडुन ते एकत्र करून केली आहे. लेणीतच गणपती असताना वेगळे मार्ग कसे करणार? ज्या लेणी मुळे जगातील पर्यटक हे जुन्नर मध्ये येत असतात त्या लेणी पहायला कुत्रही येत नाही असे म्हणुन देश विदेशातील लोकांच्या भावना दुखवणाऱ्या शिवाजी आढळरावांचा निषेध सोशल मीडियावर लेणी प्रेमी करत आहेत.