ब्लॉग

पितृत्व त्यागणारा पिता : ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे

महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे साहेबांची संपादक पत्रकार रवी आंबेकर जी यांनी मॅक्स महाराष्ट्र यांवर घेतलेली मुलाखत पाहीली आणि क्षणभर मन अस्वस्थ झाले. स्वतः जळत अंधाराला नाकारून उजेडाची प्रकाशकिरणे दाखवणाऱ्या दिव्या प्रमाणे डॉ कांबळे व त्यांच्या थायलंड या बुद्ध राष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या पत्नी रोजना व्हॅनीच यांची भूमिका जाणवली.

कोरोनाच्या या भितीदायक वातावरणात ही आपले शासकीय काम करून राहीलेल्या वेळात महाराष्ट्रात १५ ते २० हजार गरीब कुटुबांना कसलाही गाजावाजा न करता अन्नधान्य पुरवणारे राज्यातील जेष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे यांनी खाजगी आयुष्यात घेतलेला मोठा निर्णय ऐकून मन स्तंभीत झाले.

देशातील उच्चतम अशा प्रतिष्ठित पदावर असलेल्या, जिल्हाधिकारी यवतमाळ, मनपा आयुक्त औरंगाबाद ,एफडीए आयुक्त मुंबई, उद्योग आयुक्त मुंबई , अशी महत्वाचे पदे भुषवणारे उत्कृष्ट प्रशासक म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे; अशा डॉ हर्षदीप कांबळे या आदरणीय व्यक्तिमत्वाने आपल्या पितृत्वाचा तर थायलंड येथील मोठ्या व्यवसायिक रोजना व्हॅनीच कांबळे या वंदनीय भगीनीने आपल्या मातृत्वाचा नैसर्गिक हक्क; समाजातल्या इतर गरजवंत मुलांच्या संगोपनासाठी त्यागला ही बाब प्रचंड आश्चर्यकारक , अविश्वासनिय पण तितकीच सत्य व वस्तुनिष्ठ वाटली. क्षणभर आपण जे ऐकतोय ते सत्यच आहे ना याची खातरजमा करून घेतली.

साहेब, तुम्ही मुंबई सारख्या अतिशय मोठ्या शहरात 2000 तरुण मुलांना मुलींना एकत्र करत ‘राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मोहोत्सव समिती ‘ स्थापन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 125 जयंती जगातील सर्वात मोठी जयंती साजरी केली. यावेळी आपण जो सातत्याने महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे सांगत होता, त्याचा अर्थ त्यावेळी तर मला समजला नाही; पण, आता मात्र त्या विचारांच्या वारसदारांची ओळख पटू लागली आहे.तुम्हा पती पत्नी विषयी मनात आदराची एक प्रचंड मोठी भावना जागली आहे.

औरंगाबाद येथील भिक्खु ट्रेनिंग सेंटर येथे डॉ.हर्षदीप कांबळे सर, रोजना व्हॅनीच कांबळे मॅडम आणि धम्मसेवक

आजच्या या प्रचंड स्वार्थी जगात बहुतांश लोक स्वतःच्या परिवारापलीकडे कोणासाठीच जगताना दिसत नाहीत.जो तो आपली पत्नी आणि मुलं यांच्या पलीकडे आपले जगात कोणी नाही आणि इतर कोणाला आपले समजायचे नसते याच आपमतलबी भावनेतून जगताना, वावरताना दिसत आहेत. प्रत्येक जण आज जमेल त्या मार्गाने जमेल ते धन जमा करून आपली मुलं आणि परिवाराला कसे सुखासीन आयुष्य जगवता येईल याच धडपडीत असल्याचे पाहायला मिळते! एका धर्मपरंपरेनुसार तर आपला वंश बुडू नये म्हणजे मुलगा जन्माला यावा असा आग्रह कर्मकांडात धरला ,मुलगी नको म्हणत अनेकांनी अनेक मुलांनाच फक्त जन्माला घातले व कित्येक सावित्रिच्या लेकींचा गर्भातच खून केला . इथे मात्र आजच्या काळातील राजेशाही पद्धतीचे जीवन असणाऱ्या प्रशासकिय सेवेतील अधिकाऱ्याने व त्यांच्या सुविद्य पत्नीने मानव जीवनातील सर्वोच्च आनंद, नैसर्गिक हक्क नाकारला व समाजातल्या नाही रे वर्गातील मुलांना आपलंसं करण्यासाठी, त्यांच्या सर्वार्थाने संगोपनासाठी ,आपलं स्वतःच मुलंच नको, त्याची जबाबदारीच नको असा दुरदृष्टीचा निर्णय घेऊन एका अर्थाने समाजातील गरीब होतकरू व गरजवंत मुलामुलींना फार मोठी मायेची ऊब दिली आहे.

या शिवाय समाजात आजही इतिहासाच्या पानात असलेली ‘फुले,शाहू आंबेडकर ‘ यांची विचारधारा कोणीतरी कांबळे व्हॅनीच यांच्या सारखी मायाळू , प्रचंड त्यागी , दानी व इतरांना प्रकाशमान करणारी माणसं हृदयात बुद्धाच्या प्रज्ञेचा,करुणेचा, मैत्रीचा झरा घेऊन जगाला , आपल्या सभोवतालच्या सर्वांना सुखावण्यासाठी,आपल्या सुखांचा त्याग करून या विश्वाला समृद्ध करत असतात. ती आपल्या विवेकी जगण्याने माणसांच्या जगण्याला ,माणुस असण्याला अर्थ आणि प्रतिष्ठा मिळवून देत असतात.आपल्या वंशाचा दिवा पेटवण्याऐवजी ते वंशाला दिवा नसणाऱ्या पण 200 वर्षांपासून जीवंत असणाऱ्या ,नुसत्याच जीवंत असणाऱ्या नव्हे तर साऱ्या जगावर आपल्या प्रज्ञेचा उजेड पाडणाऱ्या महात्मा फुल्यांच्या हमरसत्यावर चालत चालत, अनेकांचे कल्याण करत करत, अनेकांना शिक्षित करत करत आपल्या असण्याच्या पाऊल खुणा इतिहासाच्या काळजावर नोंदवत असतात. हे दाम्पत्य त्यांचेच तर “विचारवारस “ असावेत असा अशावाद मनाच्या खोलवर असलेल्या करूणारूपी झऱ्याच्या ओलाव्यावर जगताना दिसतोय.

हे पण वाचा : कोरोना आणि डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस

उभयंतांनी प्रचंड मोक्याच्या आणि महत्वाच्या पदावर राहुनही तसेच जगातले सर्व सुख उपभोगता येते याची कल्पना असुनही, आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या आहेत. आपण समाजाचे काही देने लागतो या भावनेतून आपले सर्वस्व समाजाला अर्पण करायचे, आपली मुलं जन्माला न घालता इतरांची मुलं आपलीच स्वतःची मुलं आहेत. त्या मुलांचे जगणे, वाढणे,त्यांचे पुढे जाणे, आकाशाला गवसणी घालणे, हेच आपले जीवनध्येय मानणाऱ्या,स्वतःची मुलं नाकारून इतरांना आपल्या छातीशी कवटाळणाऱ्या, त्यांच्यात आपले सर्वस्व पाहणाऱ्या, बुद्ध,फुले,शाहू,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महान विचारधारेचा इतिहास सांगणाऱ्या, तो जगणाऱ्या,ते आत्मभान ठेवणाऱ्या , त्यांच्या स्वप्नातला समाज आणि देश घडवू पाहणाऱ्या, प्रज्ञा, शील , करुणा या सर्वोच्चमूल्यांनी विभूषित असलेल्या,सम्राट अशोकाच्या प्रियदर्शी प्रशासकाची आठवण करून देणाऱ्या, इतिहासातील सर्वश्रेष्ठ दानी असलेल्या आधुनिक अनाथपिंडकासम असलेल्या स्वःताचं मुल नाकारणाऱ्या पालकास आम्हां गरिबांचे, वंचितांचे, सर्वसाधारण जीवनात वशिला नसलेल्यांचे, कोणत्याही प्रकारची व्ही.आय.पी. पार्श्वभूमी नसलेल्यांचे, कोणीच वाली नसलेल्यांचे,कुटुंबात आपलं कोणी मोठं होतं किंवा आहे हे सांगता न येणाऱ्यांचे आदरणीय डॉ हर्षदीप कांबळे सर आणि वंदनीय रोजना व्हॅनीच कांबळे मॅडम , आपण दोघांनी आमचे पालकत्व घेतल्या बद्दल,आपल्या विशाल हृदयात जागा दिल्याबद्दल, आम्हाला स्वाभिमानी, स्वावलंबी, उद्योगी,उच्चशिक्षित बनवण्यासाठी आई वडील बनण्याची भूमिका स्वीकारल्याबद्दल तुम्हा दाम्पत्याचे आभारी आहोत.

बोधगया येथील बोधीवृक्षाच्या छायेत आणि नागपूर येथील दीक्षाभूमी येथे डॉ हर्षदीप कांबळे सर आणि रोजना व्हॅनीच मॅडम

खरंतर बाप हा दोन अक्षरीच पण प्रचंड जबाबदारीने ओथंबुन भरलेला शब्द आहे.तो नुसता शब्दच नाही तर तो इतिहास पण आहे. या बाप नावाच्या इतिहासानेच तर सारे जग समृद्ध केले आहे. इथे बुद्ध ,सम्राट अशोक, फुले,शाहू आणि भारताचे राष्ट्रनिर्माते असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना घडवले आहे; आणि त्यांनी या देशाला घडवले आहे.तुम्ही त्यांच्यामुळेच घडल्याचे सांगत आहात, तुम्ही त्यांच्याच विचारांनी उभे आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहात.

आजच्या काळात लोक स्वतःला रक्ताचा वारसदार असावा यालाच विशेष महत्त्व देतात, म्हणूनच ते टेस्ट ट्युब बेबी पण जन्माला घालतात, तुम्ही मात्र बुद्ध, फुले, शाहू,आंबेडकर या युगंधरांच्या विचारांचा वारसा स्वीकारून विचारांना विचारांचाच वारसा देण्यासाठी आणि विचारांच्या नात्याला स्वीकारण्याचा आधुनिक काळात उभा केलेला आदर्श आम्हा तरुणांसाठी दीपस्तंभा सारखा प्रेरणादायी आहे. तुम्ही ज्या प्रमाणे समाजात आणि प्रशासनात वागता बोलता ते पाहता संत तुकाराम महाराजांच्या “बोले तैसा चाले !त्यांची वंदावी पाऊले!” या अभांगाला साजेस जीवनवृत स्वीकारल्याचे जाणवते.

मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री रोजगार योजनेचे जनक डॉ.हर्षदीप कांबळे सर आणि व्हॉलेंटीअर्स

तुम्ही सर्वार्थाने परिवर्तनवादी महापुरुषांना तुमच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनवले आहे.म्हणूनच तर आमच्या सारख्या तरुणांचे पालकत्व स्वीकारले आहे.याबद्दल आभारच मानले पाहीजेत!!! आदरणीय रोचना व्हॅनीच कांबळे आणि डॉ हर्षदीप कांबळे तुम्हा दोघांच्या या अतिउच्च त्यागाने विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या निर्धाराला कोटी कोटी वंदन करतो. तुमच्यासारख्या त्यागी आईवडिलांना आम्ही हृदयाच्या खोल अंतःकरणापासुन अनंत धन्यवाद देतो.मुलं म्हणून आम्ही वचनबद्ध राहू.

इतिहासात डोकावल्यावर जसे डॉ यशवंत फुले वागले तसेच राहण्याचा जगण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आमचे आईवडील म्हणून कायम ऋणी राहू,स्मरणात ठेऊ आणि वचनबद्ध राहू…. आपण दोघांनी जो विचारांचा वारसा दिला हा विचारांचा वारसा असाच पुढे घेऊन जाऊ…!!!

तुम्हा दोघांना शतशः वंदन!!!

डॉ विजय कदम
(प्रख्यात डेंटिस्ट, समाजसेवक)
मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *