इतिहास

तामिळनाडूतील प्राचीन ‘कांची’ भूमीचा इतिहास – भाग २

पहिल्या भागात आपण कांची भूमीचा इतिहास वाचला असेल… या दुसऱ्या भागात आज कांची म्हणजेच कांचीपुरम मध्ये बौद्ध अवशेषांची काय अवस्था आहे. हे पाहू…

सध्या कांचीची ओळख काय आहे? सध्या कांचीची ओळख शिव कांची आणि विष्णू कांची म्हणून आहे. जे की शिव आणि भगवान विष्णूच्या अनेक मंदिरांमुळे ओळखले जाते. पण या परिसरात आजही बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या मुर्त्या आढळतात आणि सापडतात.

कामाक्षी मंदिरातील दोन बुद्ध मूर्ती

कांची मध्ये सापडलेली सर्वात प्राचीन बुद्धमूर्ती ५ व्या शतकातील आहे. 

कांचीपुरम मध्ये सापडलेली सर्वात प्राचीन बुद्धमूर्ती ही ५ व्या शतकातील आहे, तिची उंची ५ फूट असून ही बुद्धमूर्ती अमरावती आणि गांधाराच्या मूर्तींसारखी आहे. ही मूर्ती आता चेन्नई संग्रहालयात ठेवली आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ गोपीनाथ राव यांच्या मते, (गोपीनाथ राव ब्रिटीशांच्या काळात पुरातत्वशास्त्रज्ञ होते.) त्यांच्या काळात ही मूर्ती शिव कांची येथील कांची कामाक्षी मंदिराच्या आतील भागामध्ये होती. मंदिराच्या बाहेरील भागामध्ये मध्ये मोडलेल्या अवस्थेत आणखी एक बुद्ध मूर्ती सापडली.

गोपीनाथ राव यांनी असे अनुमान लावले की कांची कामाक्षी मंदिर हे मूलतः ताराचे मंदिर होते. जेव्हा आपण या मंदिराशी बुद्ध धम्माशी सहसंबंध जोडले तर या मंदिराचा संबंध वज्रयान बौद्ध धम्माशी जोडला जाऊ शकतो. या मंदिराचे मुख्य दैवत म्हणजे कामाक्षी देवी आहे. कामाक्षीचे स्वरूप आणि हाताचे चिन्ह वज्रयान बौद्ध संस्कृतीतील कुरुकुल (लाल तारा) सारखेच आहेत. आम्ही २०१२ मध्ये भेट दिली होती त्यावेळी पहिले की, मंदिराच्या दगडी स्तंभावर दोन सूक्ष्म बुद्धमूर्तीचे कोरीव काम होते.

शाळेच्या परिसरात असलेली बुद्धमूर्ती

ही बुद्धमूर्ती ५ व्या ते ६ व्या शतकातील असून ५ फूट ६ इंच उंचीची आहे. 

कांचीच्या मंदिराच्या परिसरात सापडलेल्या दोन बुद्ध मूर्तींपैकी दुसरी बुद्धमूर्ती पुरातत्व विभागाने कामाक्षी मंदिराशेजारी असलेल्या सी. एम. सुब्बाराय मुदलीयार उच्च माध्यमिक विद्यालय परिसरात ठेवली आहे. ही बुद्धमूर्ती ५ व्या ते ६ व्या शतकातील असून ५ फूट ६ इंच उंचीची आहे.

पुरातत्वशास्त्रज्ञ गोपीनाथ राव यांच्या मते, ही मूर्ती कांची कामाक्षी मंदिरालगतच्या बागेत होती. कदाचित शाळा नंतर बागेच्या परिसरात तयार केली आहे. या बुद्ध मूर्तीचे आधीचे फोटो पहिले असता डोळे बंद होते. अलीकडेच कुणीतरी बुद्धमूर्तीचे डोळ्यात छिद्र करून उघडे करण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसते. गोपीनाथ राव यांच्या म्हणण्यानुसार, तेथे मातीखाली आणखी दोन बुद्ध मूर्ती आहेत ज्यांचे उत्खनन अद्याप झाले नाही. जरी या माहितीला 100 वर्षांहून अधिक वर्षे उलटून गेली असली तरीही त्या जागेचे उत्खनन केलेले नाही,अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.

करुकुनिल अमरंतववल अम्मान मंदिरात बुद्ध मुर्त्या

करुकुनिल अमरंतववल अम्मान मंदिरात बुद्ध मुर्त्या… 

या मंदिराच्या परिसरातून मिळालेल्या दोन बुद्ध मूर्ती तिथे सुरक्षित ठेवण्यासाठी ठेवल्या आहेत. एक बुद्धमूर्ती भूमिस्पर्श मुद्रा तर दुसरी मूर्ती ध्यान मुद्रामध्ये आहे. १२ व्या शतकातील या दोन्ही मूर्ती आहेत. त्यातील एक ३ फूट ९ इंच उंची तर दुसरी २ फूट ६ इंच उंचीची आहे.

Credits : Yogi Prabodha Jnana & Yogini Abhaya Devi