इतिहास

सम्राट अशोकाने तक्षशिला येथे बांधलेल्या महान ‘धर्मराजिका’ स्तूपाचा इतिहास

धर्मराजिका स्तूप ज्याला तक्षशिलाचा महान स्तूप देखील म्हटले जाते, इ.स.पू. ३ ऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या अस्थींचे जतन करण्यासाठी हा स्तूप बांधला होता. पुढील शतकांमध्ये या स्तूपाला आणखी मजबूती देण्यात आली आणि त्यासाठी मूळ बांधकामाच्या भोवताली लहान लहान गोलाकार स्तूप बांधले गेले आणि इतरही काही बांधकामे केली गेली.

इंडो-ग्रीक राजा दुसरा झॉयलस यांच्या काळातली अनेक नाणी, ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात बांधलेल्या स्तूपांच्या पायामध्ये सापडलेली होती. 1980 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून धर्मराजिका स्तूपाचा समावेश केला. धर्मराजिका स्तूप तक्षशिला प्रदेशातील सर्व स्तूपांपैकी सर्वात मोठा स्तूप आहे, स्तूपाच्या मुख्य टीलाभोवती प्रदक्षिणेचा एक रस्ता आहे. बौद्ध स्तूपाच्या पवित्र जागेवर प्रदक्षिणेची प्राचीन पद्धत होती.

सध्या असलेला स्तूप हा पूर्वीच्या स्तूपातून भगवान बुद्धांच्या अस्थींवर पुन्हा कुषाण काळात इ.स. दुसऱ्या शतकात स्थापित केला गेला असे मानले जाते. इसवीसन ४५० च्या सुमारास गांधार देशावर हूणांनी आक्रमण केले आणि तिथे आपली सत्ता स्थापन केली होती. हुन राजा मिहिरिकुलासारख्या राज्यकर्त्यांनी या प्रदेशातील बौद्धांचा छळ केला होता. असे म्हटले जाते की त्यांच्या कारकिर्दीत गांधारात एक हजाराहून अधिक बौद्ध मठ नष्ट झाले होते. श्वेत हूणांनी केवळ तक्षशीलाच नष्ट केली नाहीत तर जवळील पेशावरही उद्ध्वस्त केले होते.

1913 मध्ये सर जॉन मार्शल यांनी धर्मराजिका स्तूप खोदले होते. मार्शलच्या शोधाच्या अगोदर धर्मराजिका स्तूप अनेकदा खोदून नष्ट करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे स्तूप खराब झाला होता. मार्शलने नोंदी केल्या आहेत की या स्तूपातील मौल्यवान अवशेष लुटण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले गेले होते. धर्मराजिका स्तुपाच्या दक्षिणेस मोकळ्या जागेत मानवी सांगाडे सापडले असून कदाचित ते श्वेत हूणांच्या हल्ल्यात ठार झालेल्या भिक्खूंचे अवशेष असू शकतात.