बुद्ध तत्वज्ञान

धम्म धर्मापासून (Religion) वेगळा कसा?

भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितो तो धर्मापासून मूलतः भिन्न आहे. भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतो तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला धर्म (Religion) म्हणून संबोधितात त्याच्याशी काही अंशी समान आहे. परंतु या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही. त्या दोहोंमधील भेदही थोर आहेत. याच कारणास्तव युरोपियन धर्मवेत्ते बुद्धाच्या धर्माला (Religion) म्हणून मानायला तयार नाहीत.

या गोष्टीबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही. धम्माला धर्म(Religion) म्हणून मानण्यात तोटा त्यांचाच आहे. त्यामुळे त्यांच्या धर्मा (Religion) मधील वैगुण्य स्पष्ट होते. या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो धर्मा (Religion) पासून वेगळा कसा आहे हे दाखविणे अधिक श्रेयस्कर ठरेल. असे म्हणतात की, धर्म (Religion) हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वत: पुरताच मर्यादित ठेवावा. सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये. याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे. मूलत: व तत्वत: तो सामाजिक आहे.

धम्म म्हणजे सदाचरण, म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रांत माणसामाणसांतील व्यवहार उचित असणे. यावरून स्पष्ट होते की, मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही. परंतु ज्या वेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात . तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा पाहिजेच. त्यापासून सुटका व्हावयाची नाही.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असून शकत नाही. समाजाला खालीलपैकी कोणता तरी एक पर्याय पसंत करावा लागतोच. १४. समाज वाटेल तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाही. कारण धम्म हे तर शासनाच्या साधनाहून वेगळे नाही. असा समाज (जो धम्माचा शासनासाठी स्वीकार करणार नाही तो) अराजकाचा मार्ग स्वीकारील.

दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलिस, म्हणजेच हकूमशाही, याचीच शासनासाठी निवड करू शकेल. तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल. अराजक आणि हुकूमशाही या दोन पर्यायांत स्वातंत्र्याचा नाश होतो

फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते. ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे. धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय? प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्कता का असावी? प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी, खुळ्या समजुतीला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धाने प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन कोनशिलांपैकी एका कोनशिलेइतके महत्व दिले.करुणा म्हणजे काय? आणि करुणेची आवश्यकता काय? करुणा म्हणजे प्रेम. करुणेशिवाय समाज जग शकत नाही किवा त्याची उन्नती होऊ शकत नाही. म्हणूनच बद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोनशिले इतके महत्व दिले आहे.

ही झाली बुद्धाच्या धम्माची व्याख्या. धर्माच्या (Religion) व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे. ती जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे. ती कोणापासून उसनी घेतलेली नाही, आणि ती किती सत्य आहे. प्रज्ञा आणि करुणचे अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान बद्धाचा धम्मः होय.

संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *