ब्लॉग

यावर्षीची ‘भीमजयंती’ कशी साजरी करायची?

कालच्या ‘जनता कर्फ्यू’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या ७६ वरुन १०० पर्यंत पोहचली आहे. पुढील एक महिना अतिशय क्रिटीकल आहे. आत्मघाताकडे जाणारा हा झुंडशाहीचा देश स्वत:ची कबर खोदण्यात लागलेला आहे. त्यासाठी रक्तपुरवठा, आरोग्य सेवांच्या बाबतीत आतापासून सतर्क राहून काम करणे अत्यावश्यक झाले आहे.

पुढच्याच महिन्यात, १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. दरवर्षी आपण भीमजयंती धूमधडाक्यात साजरी करतो. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या मंगलमयी भीमोत्सवाच्या दरम्यान आपण विविध प्रकारच्या पुस्तक प्रदर्शन, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांचा आस्वाद घेऊन समृध्द होत असतो. त्यापैकी सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे भीमजयंतीची रॅली. या रॅलीमध्ये आपण लाखोंच्या संख्येने एकत्र जमतो आणि जल्लोष साजरा करतो.

समस्त विश्वावर कोरोनारुपी संकट कोसळले असताना, त्यात देशभरातील ‘जनता कर्फ्यू’चे अनुभव पाहता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या समस्त अनुयायांची जबाबदारी ही लाखपटींनी वाढली आहे असं मला व्यक्तिश: वाटते. जयंतीच्या काळात आपण स्टेज -२ मध्ये असू की स्टेज – ३ मध्ये असू याबाबत माझ्या मनात भीती आणि शंकांनी घर केले आहे. कारण भीमजयंतीच्या काळात आपण लाखोंच्या संख्येने एकत्र जमून जल्लोष केला तर आपण इतरांच्या दु:खाला चालना देण्याच्या गुन्ह्याचे भागीदार होऊ. कोरोनाला थेट मेजवानीसाठी आमंत्रण देण्याइतपत ते भयंकर आहे असे वाटते.

तसेच सर्व जग एका नव्याच संकटाला तोंड देत असताना आपण त्यांच्या दु:खाशी एकरुप होणे जास्त गरजेचे आहे. जगातील प्रत्येक दु:खी, वंचित, निराधार, पीडित, शोषित व कमजोरांचा मित्र होऊन त्यांच्या मुक्तीसाठी संघर्ष करण्याची शिकवण बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून या वर्षीची भीमजयंती पर्यायी पध्दतीने साजरी करणे आपल्यासाठी फार महत्वाचे ठरते. त्याकरिता ‘फेस ॲाफ आंबेडकराईट मूव्हमेंट’ ‘जागल्या’ ‘धम्मचक्र’ ‘राऊंडटेबल इंडिया’ तसेच आंबेडकरवादी समूहातील अभ्यासू कृतीशील विचारवंत, व्यक्ती, संस्था, संघटना, समूह यांच्याशी प्राथमिक चर्चेस सुरुवात झाली आहे. सर्वांनी या प्रक्रियेत सामील होऊन सम्यक विचारमंथन घडवून आणण्याचा संकल्प करावा.

भारतातील सरकारी आणि खाजगी आरोग्य सेवेची व्याप्ती पाहता दर हजार व्यक्तीमागे ०.०१३ डाॅक्टर्स/आरोग्य सेवा उपलब्ध आहे. अमेरिका व चीनमध्ये हेच प्रमाण प्रति हजारी ११ ते १४ असूनही तिथे हजारो लोक मृत्यू पावले आहेत. तर भारतातील आरोग्य सेवा, सरकारांकडून दहा दिवसात हाॅस्पीटल्स उभे करण्याची अपेक्षा करु शकत नाही. जे काही करायचे आहे ते आपल्यालाच करायचे आहे.

म्हणूनच यावर्षीची भीमजयंतीची थीम ही कोरोना व्हायरसचे निर्मूलन करण्यास हातभार लावणारी असावी असे मला व्यक्तिश: वाटते. भीमजयंती उत्सव समितीच्या बैठकींमध्ये आतापासूनच भीमजयंती साजरी करण्यासंबंधीच्या निविध पर्यायी मार्गावर चर्चा होणे गरजेचे आहे. या जयंतीला आपण सगळे मिळून कोरोनाला हरवू शकतो इतकी आपल्यामध्ये बुध्दी, बळ आणि इच्छाशक्ती आहे.

आपल्या स्थायी असलेली सम्यक पारमिता, सांस्कृतिक मन, करणामय हदय, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांच्या नसनसात भिनलेली प्रज्ञासूर्याची आक्रमकता ही विश्वातून कोरोनारुपी मनुला हद्दपार करण्यासाठी आंदोलित करावयाची आहे. आपण यावर गांभीर्यपूर्वक विचार कराल असा संकल्प बाळगतो. जयभीम ! जयभारत !!

विश्वदिप करंजीकर, औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *