बुद्ध तत्वज्ञान

या गोष्टीवर ताबा मिळवला तरच तुमची दुःखातून मुक्ती होईल

तथागत जेतवनात असताना तेथे पाच भिक्खू असे होते. प्रत्येकाने पंचेद्रियापैकी एक इंद्रियावर नियंत्रण केले होते. ते इंद्रिय त्यांच्या ताब्यात होते. कोणी डोळ्यावर ताबा मिळविला होता, तर कोणी कानावर, तर कोणी जिभेवर वर्चस्व स्थापन केले होते. तर कोणी नाकावर. त्या पांच भिक्खूत वाद होता की श्रेष्ठ कोण?

प्रत्येकाला वाटत होते आपण श्रेष्ठ आहोत. या वादाचा सोक्षमोक्ष लावण्याकरिता ते पांच भिक्खू भगवंताकडे आले. चरण स्पर्श करून म्हणाले, ‘भंते! पाच वेगवेगळ्या इंद्रियांमध्ये वर्चस्व असणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ कोण आहे?कोणाचा संयम थोर आहे?’

तथागत बुद्ध हसून म्हणाले, ‘हे भिक्खूनो, इंद्रियावर संयम थोर आहे, श्रेष्ठ आहे, याचा संयम श्रेष्ठ की त्याचा संयम श्रेष्ठ हा प्रश्नच उत्पन्न होत नाही. या व्यर्थ वादात पडू नका. कारण तुमच्या या वादात तुमचा अंहकार दडला आहे. तुम्ही अंहकारी झाला आहात. वाद- विवादाने काही निष्पन्न होणार नाही. तुमची सर्व शक्ती एकवटून समग्र पंचइंद्रियाना ताब्यात ठेवा. त्यावर विजय मिळवा.’ ‘तसेच प्रत्येकाने पंचइंद्रियावर ताबा मिळवला तरच तुमची दुःखातून मुक्ती होईल अन्यथा नाही.’