जगभरातील बुद्ध धम्म

श्रीलंकेमध्ये दीड हजार वर्षांपासून बुद्ध दंतअस्थींची मिरवणूक काढण्यात येते

बुद्ध दंतअस्थींची मिरवणूक श्रीलंकेमध्ये सध्या चालू असून आज दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी त्याचा शेवटचा दिवस आहे. या दहा दिवस चालणाऱ्या सणाला ‘कँडी एसला पेरहेरा’ म्हणजेच बुद्ध दंत अस्थींचा सोहळा म्हणतात. बुद्ध दंतअस्थींची ही शोभायात्रा श्रीलंकेमध्ये दिड हजार वर्षांपासून दरवर्षी भरली जाते.

पुरी येथील राजा गृहाशिव याच्या घराण्यात या बुद्ध दंतअस्थींची ४थ्या शतकापर्यंत पूजा होत होती. मात्र त्यावेळचा पाखंडी मगध सम्राट समुद्रगुप्त याची त्यावर नजर गेल्याने राजाने या दंतअस्थी आपली मुलगी हेममाला व जावई दंतकुमार यांच्याकडे सुपूर्द करून श्रीलंकेस सुखरूप पाठविल्या.

तेव्हापासून श्रीलंकेत या बुद्ध दंतअस्थीची जपणूक करण्यात येत असून कँडी शहरात त्यासाठी ‘दालदा मालीगवा’ नावाचे मोठे विहार उभारले आहे. येथील सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक असून दरवर्षी या दंत अस्थीची जुलै-ऑगस्टमध्ये वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. यासाठी सुळेधारक गजराजांना सुशोभित करून त्यांच्या पाठीवर अस्थी करंडक ठेवला जातो.

यावेळी पारंपरिक वेशभूषा करून नृत्य व वाद्यांची रेलचेल या शोभायात्रेत केली जाते. या बुद्ध दंतअस्थीमुळे श्रीलंकेत कधीही दुष्काळ पडत नाही असे तेथील जनता मानते. भगवान बुद्धांच्या या पवित्र दंत अस्थीस माझा प्रणाम.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)