ब्लॉग

प्रतिक्रांतीच्या विळख्यात भगवान बुद्ध

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये धम्मचक्र प्रवर्तन करून, भारतीय विचार परंपरेच्या ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ संस्कृतीचा परीघ पूर्ण केला. त्यांच्या या कार्याला प्रतिसाद देऊन भारतीय जनतेनेभारतीय विचार परंपरा व संस्कृतीवर बसलेली वैदिक धूळ झाडून काढायला सुरूवात केली. बहुजन संस्कृतीच्या पुनर्रचनेचे हे कार्य अद्यापही सुरू आहे. भारतीय राज्यघटनेच्या स्वीकाराने ही प्रक्रिया अधिकच गतिमान झाली.’बहुजन हिताय बहुजन सुखाय’ संस्कृतीची प्रतिष्ठापणा करण्याचा हा प्रयत्न होय.

बहुजन संस्कृतीच्या पुनर्रचनेचे हे कार्य ऐतिहासिक व महत्त्वाचेच आहे, पण हे कार्य ज्याकाळात, ज्या सांस्कृतिक पर्यावरणामध्ये आणि ज्या सत्ताकांक्षी उन्मादाच्या काळामध्ये चालले आहे त्याचेहीभान आपण पाळले पाहिजे. भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांतीचे वास्तव तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणासमोर ठेवलेच आहे. या वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या प्रतिक्रांतीची बीजं जशी बाहेर आहेत तशीच ती आपणावर झालेल्या संस्कारामध्येही आहेत. आपल्यावर असणाऱ्या संस्कारातील ही प्रतिक्रांतीची बीजं अधून मधून आपले रूप दाखवत असतात.

आंबेडकरी समाजातील या मनोवृत्तीचेच वर्णन काही विचारवंत घाईने व स्वतःचे क्रांतीकारकत्व सिद्ध करण्यासाठी या समाजाचा ‘दुभंगलेला समाज’ असा उल्लेख करीत असतात. प्रतिगामी सत्ताकांक्षी उन्मादाचा काळ आणि संस्कारातील प्रतिक्रांतीची बीजं यांचे भान राखून फुले-आंबेडकरी समाजाने जागरूक राहणे आवश्यक आहे. ही जागरूकता एवढ्यासाठी आवश्यक आहे की हा संभ्रमाचा काळ आहे.

कधी-काळी वैदिक संस्कृती जीला आज आपण सरधोपटपणे हिन्दू संस्कृती म्हणत आहोत ती आणि बहुजनसंस्कृती अशी वेगवेगळी करून विचार केला जात होता. या दोन संस्कृतीची सीमारेषाही स्पष्ट होती. पण एकोणिसाव्या शतकात सुरू झालेल्या ऐतदेशीय संस्कृतीचा शोध घेण्याच्या परंपरेने सर्वच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय व्यवस्थांचे पूनर्मूल्यांकन होऊ लागले व बहुजन संस्कृतीवर बसलेली वैदिक धूळ झाडून काढण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. २६ जानेवारी १९५० मध्ये स्वीकारलेल्या भारतीय राज्यघटनेने तर ऐतदेशीय, बहुजन संस्कृतीला आदेशात्मक तत्वज्ञानच दिले.

एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातील या दोन घटनांनी जसजशी जनजागृती व्हायला लागली तसतसे बहुजन संस्कृतीचे स्वरूप उजागर, स्पष्ट होऊ लागले.इथल्या तमाम बहुजनांना भगवान बुद्धाचा नव्याने परिचय होऊ लागला. एकीकडे प्रतिक्रांतीच्या बीजांचा संस्कारतर दुसरीकडे हे नवे वास्तव स्वीकारण्याची ओढ यामध्ये ओढाताण होणे साहाजिक आहे. अशा काळात काहीबाबी स्पष्ट रूपात समाजासमोर ठेवल्या नाहीत तर अनर्थ होण्याची शक्यता असते. यात ज्या बाबी स्पष्टपणे समाजासमोर ठेवण्याची आवश्यकता आहे त्यामध्ये एका बाबीचा उल्लेख इथे करणे गरजेचे आहे.

ही बाब म्हणजे ‘आज भगवान बुद्धांच्या कपाळावर दिसू लागलेला टीळा होय’ आज अनेक पत्रके, निमंत्रण तसेच लग्न-पत्रिका, कॅलेंडर यामध्ये छापल्या जाणाऱ्या भगवान बुद्धाच्या कपाळावर टीळा दिसू लागला आहे. एवढेच नव्हे तर अनेक विहारांमध्ये ठेवलेल्या मुर्त्यांच्या कपाळावरही हा टीळा अगदी ठळकपणे दिसू लागला आहे. याटोळ्याच्या संदर्भात जेव्हा काही जाणकारांना विचारले तेव्हा विविध ठिकाणी विविध उत्तरे मिळाली. यातील एकउत्तर असे होते की, भगवान बुद्धाच्या कपाळावर एक लांब केस होता. भगवान बुद्ध तो केस टीळ्यासारखा गोलाकारकरून कपाळावर बसवायचे. दुसरे उत्तर असे होते की, भगवान बुद्धाच्या कपाळावर गाठ होती. ती गाठच टोळ्यासारखी दिसत आहे. तिसरे उत्तर असे होते की, भगवान बुद्ध हे ‘बुद्ध’ होते. मानवाची चिंतनप्रक्रिया ही बुद्धीद्वारे चालते मानवाच्या या बुद्धीचे निदर्शक म्हणून भगवान बुद्धाच्या कपाळावर टीळा आला आहे.

या सर्वच उत्तराबद्दलची एक प्रतिक्रिया अशी की ही कोणतीही उत्तरे आपले समाधान करीत नाहीत. दुसरी बाब अशी की, बौद्ध लेण्या या आपल्याकडे बुद्धाच्या प्रतिमांचा अतिशय प्राचीन आणि भक्कम पुरावा आहे. या चित्रांमध्ये व मूर्त्यांवर कुठेही हा टीळा आढळत नाही. इतका प्राचीन व भक्कम पुरावा सोडून इतर कोणतीही समर्थनं मान्य करावीत हे योग्य नाही. या प्रकारच्या म्हणजे टीळा असणाऱ्या मूर्त्याबद्दलचे एक सत्य इथे नोंदवले पाहिजे आणि ते असे की, या मूर्त्या बहुतेक करून बाहेरच्या देशाकडून आलेल्या आहेत. या बाहेरच्या देशाकडून आलेल्या मूर्त्यांच्या प्रभावातूनच मग त्यांची चित्रं पत्रके, निमंत्रण व लग्न पत्रिका यावरही आली आहेत. आणखी विचार करण्यासारखी बाब ही की, या मूर्त्या मोफत, दान, भेट या स्वरूपात आल्या आहेत. मोफत, दान आणि भेट आलेल्या याच मूर्त्यांची विहारांमध्ये सर्रास ठेवण्यात येत आहेत. या मूर्त्या व चित्रांबद्दल चिंता वाटावी इतके याचे प्रमाण वाढले आहे.

भगवान बुद्धाच्या कपाळावर टीळा किंवा टोळ्यासारखे दिसणारे एखादे चिन्ह येणे याबद्दलबाहेरच्या बौद्धधर्मीय देशांना काही माहिती नसणे हे आपण समजू शकतो, पण भारतामध्ये त्याला वेगळा अर्थ आहे. त्यामुळे भारतीयांसाठी ही चिंतेची बाब आहे. यातही दुसरी चिंतेची बाब म्हणजे त्या मूर्त्या भेट म्हणून, दान म्हणून म्हणजे पर्यायाने मोफत मिळतात म्हणून स्वीकारल्या जाणे ही होय. यात आणखी विचार करण्यासारखी बाब अशी की, भगवान बुद्धाचे कोणते रूप भारतात जावे यासाठी कोणीतरी प्रयत्न करीत असले पाहिजे किंवा असेही म्हणता येईल की, बुद्धाबद्दलची चुकीची माहिती उदा. अवतार वगैरे असल्याची बाहेरच्यांना दिली जात असली पाहिजे. किंवा भारतीय देवदेवतांचे चित्र पाहून त्या परंपरेत बुद्धांना समजणे असेही घडत असले पाहिजे. काहीही असले तरी, बुद्धाच्या मूर्तीवर टीळा येणे ही बाब चिंता करायला लावणारी समजली पाहिजे.

मुळात ‘टीळा’ हा भारतीयांसाठी नवीन नाही. आज हा टीळा भारतीय जीवनात इतका मिसळून गेला आहे की, भारतीय समाज म्हणजे टीळा लावणारा समाज असे भारतीयांचे वर्णन व्हावे. पण आपणास हे ही माहिती आहे की, टीळा ही वैदिकीकरणाची, म्हणजेच आजच्या हिंदुत्विकरणाची साधी, सोपी पद्धत आहे. अर्थात या टोळ्यातही ही सूप्त संघर्ष दडला आहे पण आजतरी तो वैदिकीकरणाचा एक संस्कार आहे. हे सगळ्यांना माहित आहे. या टोळ्यामध्ये असणारा संघर्ष हा गोल टीळा, उभा टीळा, इंग्रजी U आकराचा टीळा, आडवे पट्टे, तिन बोटाने लावला जाणारा आडवा गुलाल, चंद्रकोर, चंदन आणि बुक्का याचे दोन टीळे, हाताचे मधले बोट व त्याच्या शेजारच्या खालच्या बोटाने लावले जाणारे दोन टीळे, अंगठ्याने लावला जाणारा टीळा असे अनेक टीळे भारतात पहावयास मिळतात. या सर्वच टीळ्याची परंपरा, विचार वेगवेगळे करूनही पाहता येईल.

ही सर्व परिस्थिती विचारात घेऊनच भारतात टीळा हा सर्वत्र झाला आहे. अलिकडे टीळा लावणारा व टीळा न लावणारा अशी समाजात विभागणीही होताना दिसते. भारतीय हिंदूना मुसलीमांपासून वेगळे काढून मतपेढी करण्यासाठी या टीळ्याचा मोठाच उपयोग झाला आहे. याचा परिणाम ‘हिन्दू म्हणजे टीळा लावलेला’ व टीळा न लावलेला म्हणजे मुसलमान अशी सरळ सरळ विभागणी होताना दिसत आहे. तणावाच्या वातावरणत जीव वाचवण्यासाठी अनेक महिला पर्समध्ये टीकल्यांचे पॉकीट ठेवत आहेत किंवा लावलेली टीकली काढूनही फिरत आहे. हे सगळे एवढ्या विस्ताराने एवढ्यासाठी विचारात घेतले आहे की, आज ‘टीळा’ ही नेमकी कशाची ओळख होत चालला आहे याची कल्पना यावी. असाच टीळा जर बुद्धाच्या कपाळावर यायला लागला असेल तर बुद्धाचा प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे याची कल्पना येते.

याच टीळ्याचा आणखी एक संदर्भ लक्षात घेतला पाहिजे तो असा की ‘टीळा’ हा वैदिकांनी इतरांचे शुद्धीकरण करून घेण्याच्या प्रक्रियेचा, संस्काराचा एक भाग म्हणून उपयोगात आणला आहे. वैदिकांमार्फत कोणताही धार्मिक विधी करून घ्यायचा असेल तर तो विधी करून घेण्याची पात्रता इतरांमध्ये तेव्हाच येते जेव्हा त्यांना शुद्ध पवित्र करून घेतले जाते. त्यासाठी टीळा लावून त्यांचे शुद्धीकरण केले जाते. हे शुद्धीकरण झाल्यानंतरच त्यांच्यावर धार्मिक संस्कार केला जातो. ही शुद्धीकरणाची प्रक्रिया माणसांपासून तर अगदी प्राण्यांपर्यन्त आणि काम्यूटर पासून तर झाडू पर्यन्त कशाचेही केले जाऊ शकते.

यात विशेष लक्षात घेण्यासारखी बाब ही की, हा संस्कार घेण्यापूर्वी आपण अपवित्र, अशुद्ध व शुद्र असतो. आणि हा संस्कार घेतला की, आपण पवित्र, शुद्ध वगैरे होतो. म्हणजे पर्यायाने हा टीळा शुद्रातीशुद्रांना व त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना शुद्ध व पवित्र करण्याचा संस्कार आहे. यात स्त्रीयांचे व कुंकवाचे काय नाते आहे याची कल्पना येते. कुंकवाचा कार्यक्रम, टीळ्याचा कार्यक्रम याला नेमका कोणता संदर्भ आहे याचीही कल्पना येते.

पर्यायाने हे इथे लक्षात येते की, ‘टीळा’ हा शुद्धीकरणाचा, वैदिकीकरणाचा व आजच्या भाषेत हिन्दूत्वीकरणाचा प्रकार आहे. प्रतिक्रांती करण्याच्या ज्या साध्या-सोप्या पद्धती आहेत त्यातही ही एक पद्धत आहे. असा ‘टीळा’ आज बुद्धाच्या कपाळी येऊ लागला आहे. भगवान बुद्धाच्या मुर्तीवर शेंदूर थोपून त्याचे देवस्थान करणे या प्रकारचेच हे कार्य होय. या प्रकारांना आजच थांबवले पाहिजे अन्यथा प्रतिक्रांती फार लांब नाही. या प्रकारांना थांबवण्यासाठी खालील प्रकारची कृती जाणीवपूर्वक केली पाहिजे.

1) ‘टीळा’ किंवा टीळ्यासारखी कोणतीही चिन्ह असणारी बुद्धमूर्ती मोफत, दान, भेट मिळत असली तरी त्याचा स्वीकार करू नये. तसेच का स्वीकारत नाही याची कारणे सांगून ती नम्रपणे नाकारावी.
2)’टीळा’ असणारी मूर्ती विकत घेऊ नये. अशा प्रकारच्या मुर्ती आमच्या समाजात विकत घेतल्या जात नाहीत असे आवर्जून विकणारांना सांगा.
3) अशा प्रकारच्या मूर्त्यांची विहारात प्रतिष्ठापणा करू नये.
4) पत्रके, निमंत्रण व लग्न-पत्रिका यावर बुद्धाची प्रतिमा छापतांना काळजी घ्या.
5)अशा प्रकारच्या पत्रक, पत्रिकांना नम्रपणे प्रतिक्रिया द्यावी.

– डॉ. संजय मून
उर्जा, ३५ अ, वसुंधरा कॉलनी,
भावसिंगपूरा रोड, औरंगाबाद
(९४२३७०५७६७)