इतिहास

महाराष्ट्र दिन : सातव्या शतकात महाराष्ट्र कसा होता?

चिनी प्रवाशी आणि बौद्ध भिक्षु ह्यू-एन-त्संग महाराष्ट्रात इ. स.६४१-४२ मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या प्रवास वर्णन केलेल्या पुस्तकात महाराष्ट्राबद्दल लिहून ठेवले आहे. या प्रवास वर्णनाचे मराठी मध्ये मा.श. मोरे यांच्या तीन चिनी प्रवासी पुस्तकात ह्यू-एन-त्संगने महाराष्ट्राबद्दल केलेल्या प्रवासाचे वर्णन लिहले आहे.

ह्यू-एन-त्संग महाराष्ट्र्र प्रवेश करतानाचे वर्णन लिहतो. येथून वायव्य दिशेला गेले असता खूप मोठे जंगल लागते. तेथील हिंस्र प्राणी आणि डाकू लोकांच्या टोळ्यांपासून प्रवासी लोकांना भय असते. ह्याप्रमाणे २४०० ते २५०० ली प्रवास केल्यावर आपण महाराष्ट्र ( मो – हो – ला – छिया ) देशात येतो ( इ. स. ६४१ ). ह्या देशाचा परिघ अंदाजे ५,००० ली आहे. राजधानीचे शहर एका मोठ्या नदीच्या पश्चिमेला आहे. ते साधारणपणे ३० ली परिघाचे आहे.

जमीन कसदार असून सुपीक आहे. तिची मशागत वेळेवर केली जाते आणि तिच्यातून भरपूर पीक निघते. हवामान उष्ण आहे. लोक इमानदार आणि सरळ स्वभावाचे आहेत. ते शरीराने उंच असून वागायला कडक आणि खुनशी वृत्तीचे आहेत. त्यांना मदत करणाऱ्यांबद्दल ते कृतज्ञता दाखवितात. त्यांच्या शत्रूशी ते कठोर असतात. त्यांचा कोणी अपमान केला तर जीव पणाला लावून ते बदला घेतात. संकटात असलेल्या कोणी त्यांची मदत मागितली तर मदत करण्याच्या तत्परतेत ते स्वतःला विसरतात. जर त्यांना सूड घ्यावयाचा असला तर ते त्यांच्या शत्रूना पहिल्यांदा ताकीद देतात. दोघांनी हातात शस्त्रे घेतल्यावर ते एकमेकांवर भाल्याने हल्ला करतात. ( पराभव पावल्यामुळे ) जेव्हा त्यातील एक पळून जाण्याच्या तयारीत असतो, तेव्हा दुसरा त्याचा पाठलाग करू लागतो. पण शरण आलेल्यांना ते मारत नाहीत.

युद्धात सेनापती हरला तर त्याला ते शिक्षा करीत नाहीत. पण त्याला चोळीबांगडी घालावयास देतात आणि अशा तऱ्हेने ( लांछनामुळे ) तो स्वतःचा जीव घेण्यास प्रवृत्त होतो. ह्या देशात शेकडो योद्धे निर्माण होतात. जेव्हा त्यांना युद्धावर जावयाचे असते, तेव्हा ते दारू पिऊन स्वतःला झिंगवून घेतात आणि नंतर एक भालाधारी योद्धा दहा हजार माणसांना युद्धासाठी आव्हान देतो. एखाद्या योद्धयाने कोणाला मारले तर येथील कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा होत नाही. जेव्हा जेव्हा ते लढाईला जातात; तेव्हा तेव्हा ते पुढे ढोल वाजवितात. शिवाय ते हत्तींना दारू पाजून झिंगवितात. लढाईसाठी त्यांना बाहेर काढल्यावर ते स्वतः त्यांची दारू पितात आणि नंतर एका मोर्चाने तुफानी हल्ला करून शत्रूची धूळधाण करतात. यामुळे कोणताच शत्रू त्यांच्यासमोर टिकत नाही.

या योद्धयांमुळे आणि हत्तींमुळे येथील राजा शेजारपाजारच्या राजांना मान देत नाही. तो क्षत्रिय कुळातला आहे. त्याचे नाव पुलकेशी आहे. त्याच्या योजना आणि कार्यक्षेत्र विशाल आहेत. त्याच्या सत्कृत्यांची जाणीव दूरदूरच्या लोकांना झाली आहे. त्याची प्रजा त्याच्या आज्ञेचे संपूर्ण शरणागतीने पालन करते. हल्ली शीलादित्य राजाने पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचे देश जिंकून घेतले आहेत. पण फक्त ह्या देशाचे लोक त्याला अजून शरण गेलेले नाहीत. त्याने भारतातल्या पाच देशांचे सैन्य गोळा केले आहे आणि सर्व देशांतील सेनापतींना बोलावले आहे. या देशातील लोकांना शिक्षा करून त्यांना शरण आणण्यासाठी त्याने सर्व सूत्रे स्वतः आपल्या हाती घेतली आहेत. पण अजून त्याने ( शीलादित्यान ) त्यांच्या ( महाराष्ट्राच्या ) सैन्याला जिंकले नाही.

हे इतके त्यांच्या सवयीबद्दल. येथील माणसे शिक्षणप्रेमी असून बुद्धधम्माच्या ग्रंथांचा अभ्यास करतात. येथे अंदाजे १०० संघाराम असन १००० च्या आसपास भिक्खू आहेत. असे ह्यू-एन-त्संगने महाराष्ट्राबद्दल केलेल्या प्रवासाचे वर्णन लिहले आहे.