आंबेडकर Live

माऊलीची माया होता माझा भीमराया…!

१९४६ निवडणूक दौरा – ब.ह वराळेंनी डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकात सांगितलेला प्रसंग

मिरजेला जेवणखाण झाल्यानंतर मला मुंबईला येण्याचा आदेश बाबासाहेबांनी दिला. मिरजेहून पुढे मला मुंबईस जावे लागेल याची मला कल्पना नव्हती. शिवाय दिवसभर मी प्रवासातच होतो. त्यामुळे अंथरुण-पांघरुण, कपडे वगैरे काहीच घेतले नव्हते. आमचा मुंबईचा प्रवास रेल्वेने सुरु झाला होता.

वेळ रात्रीची होती, थंडीचेच दिवस होते. झोपण्याच्यावेळी पांघरण्यासाठी काहीतरी द्या म्हणून मी बाबासाहेबांना विनंती केली. बाबासाहेब आपल्या केबिनमध्ये गेले व त्यांनी एक रग मला आणून दिला. दिवसभराच्या प्रवासाच्या दगदगीमुळे व आदल्या रात्रीच्या जागरणामुळे मी अतिशय थकलो होतो. बाबासाहेबांनी दिलेला रग घेऊन सलूनमधील एका बाकावर मी झोपलो. मला झोप चांगलीच लागली होती.

सकाळी ५ वाजता मला जाग आली. गाडी सुरूच होती. मनाला वाटणारा शीण पार नाहीसा झाला होता. बाबासाहेब उठलेले आहेत की झोपलेले आहेत हे सहज पाहण्यासाठी म्हणून मी उठून त्यांच्या केबिनच्या दारापाशी गेलो व सहज डोकावून पाहिले. मी आत पाहत असता माझ्या अंतःकरणाला धक्का बसेल अशा प्रकारचे दृश्य दिसले.

बाबासाहेबांनी एका बाकावर टाॅवेल अंथरला होता. उशाला एक उशी होती. अंगातील शर्टासह फक्त तेवढ्यावरच ते झोपलेले दिसले. स्वतःसाठी पांघरायला आणलेला रग त्यांनी मला दिला होता. दिवसभर त्रास झालेला असतानाही तशा त्या कुडकुडत्या थंडीत बाबासाहेब उघड्यावरच झोपले हे पाहून मला फार दुःख झाले. मनाला फार वेदनाही झाल्या.

अजाणपणे मी या महापुरूषाला त्रास दिला. स्वतःला त्रास घेऊन दुसऱ्यांना त्यांनी सुख दिले. स्वतः थंडी सहन केली व मला उबारा दिला. मला दुःख होत होते. काय करावे हे समजत नव्हते. १०-१५ मिनिटे मी तसाच निःस्तब्धपणे केबिनच्या दाराशी उभा होतो. मन भरून आले होते. डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. एवढेच काय ते फक्त माझ्या हातात होते. माझ्याकडून चूक झाली होती. ती दुरूस्त करणे आता शक्य नव्हते. बाण केव्हाचाच सुटला होता. बाबासाहेबांच्या ठिकाणी एखादा सर्वसाधारण मनुष्य असता तर त्याने सांगितले असते, ‘माझ्याकडे पांघरण्यासाठी एकच रग आहे आणि तुला कुठून देऊ?’

सामान्य आणि असामान्य माणसांत जो फरक असतो तो हाच. असामान्य गुणाच्या योगेच असामान्य माणसे महात्मा ठरतात आणि त्यांच्या जीवनामुळे हजारो वर्षे उजळून निघतात. ज्यांच्यापुढे नेहमी नतमस्तक व्हावे अशा विभूतींपैकी बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व होते.

संकलन : सुरज तळवटकर

4 Replies to “माऊलीची माया होता माझा भीमराया…!

    1. ????जय भीम???????? नमो बुद्धाय????

Comments are closed.