इतिहास

नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ३ : बावरीचे १६ शिष्य आणि तथागत बुद्धांची भेट

दुसऱ्या भागात आपण बावरी ब्राह्मण आणि त्याचे सोळा शिष्य या विषयी जाणून घेतले आहे. बावरीचे १६ शिष्य आपल्या आचार्याला एका असंतुष्ट ब्राह्मणाने ”डोके फुटणे आणि डोक्याचे सात तुकडे होतील” असा शाप दिला होता. त्या शापाचा अर्थ जाणून घेण्यासाठी तथागत बुद्धांकडे जाण्यासाठी निघाले. त्यांनी सर्व प्रथम मुल्ल्कची राजधानी म्हणजेच प्रतिष्ठान (पैठण) येथे पोहचले.

“दक्षिण भारतात गोदावरी नदीच्या खोऱ्यात अस्मक आणि मुल्लक ही राज्य होती. अस्मकची राजधानी पोदन (बोधन) होती. सांचीच्या स्तूपावरील दानलेखात नांदेडसह पोदनचा सुद्धा उल्लेख आहे. पोदन म्हणजेच तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातील ‘बोधन’ होय. बोधन हे नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर आहे. तर मुल्लकची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) होते. तर या दोन्ही राज्याच्या सीमेवर असलेलले मोठे शहर म्हणजे नांदेड होय.”

हे पण वाचा : नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग २ : बावरी ब्राह्मण आणि त्याचे सोळा शिष्य

बावरीचे शिष्य तेथून चारिका करीत माहिसत्ती नगरला गेले. (मध्यप्रदेशातील महीस्मती) तेथून उज्जेनी (उज्जैन), विदिशा, कोसम्बी, साकेत (अयोध्या उत्तरप्रदेश), कपिलवत्थु, कुशीनारा इथे गेले. त्यानंतर पावा, वैशाली करत ते मगध राज्यातील नगर राजगृहच्या (राजगीर बिहार) रमणीय पाषाणक चैत्य (गिर्यक पर्वत) येथे पोहचले. (राजगिरी पासून सहा मेल)

तथागत बुद्ध आणि बावरीच्या १६ शिष्यांची भेट

तहानलेला जसा पाण्याकडे जातो, वाणी जसा मोठ्या फायद्याकडे जातो व उन्हाने सन्तप्त झालेला छायेकडे जातो, तसे बावरीचे सोळा शिष्य गिर्यक पर्वतावर चढले. तिथे तथागत भिक्षूंना धर्मोपदेश करीत होते. सर्वप्रथम (शांतपणे प्रकाशणाऱ्या) वीत रश्मी सूर्यासारख्या आणि पौर्णिमेला पूर्णतेला गेलेल्या चंद्रासारख्या त्या संबुद्धाला बावरीच्या १६ शिष्यापैकी असलेल्या अजितने पाहिले. तथागत बुद्धाने तिथे दिलेला उपदेश ऐकून सर्वजण प्रभावित झाले आणि तथागतांच्या पायांवर डोके ठेवले.

तथागतांची प्रत्यक्ष भेट झाल्याने बावरीच्या १६ शिष्यांनी आपापले प्रश्न/शंका तथागतांना विचारावी अशी इच्छा प्रकट झाली. तथागतांनी बावरीच्या सोळा शिष्यांच्या मनातील इच्छा ओळखली आणि म्हणाले बावरीचे, किंवा तुम्हा सर्वाना ज्या शंका असतील त्या सर्व विचारण्यास मी मोकळीक देतो; तुमच्या मनात जे असेल ते तुम्ही निसंकोचपणे विचारा. संबुद्धाने मोकळीक दिली असता सर्वप्रथम अजिताने तेथे खाली बसून व हात जोडून तथागताना प्रश्न विचारू लागला. बुद्धांचे उपदेश आणि उत्तर ऐकून अजित प्रभावित झाला तेथेच प्रवज्जीत झाला. धम्म आणि विनयचा त्याने चांगला अभ्यास केला आणि एके दिवशी अर्हत झाला.

तथागत बुद्धाने, बावरीचे १६ शिष्यांची विचारलेल्या सर्वच प्रश्नांची यथायोग्य उत्तरे देऊन सर्वांना संतुष्ट आणि समाधानी केले. तसेच बावरीला एका असंतुष्ट ब्राह्मणाकडून डोके फुटणे आणि सातव्या दिवशी डोक्याचे सात तुकडे होतील असा शाप दिला होता. ह्या शापाचा अर्थ तथागताने बावरीच्या १६ शिष्यांना सांगितले.

डोके फुटणे आणि डोक्याचे सात तुकडे होणे म्हणजे?

सीर म्हणजे मुंडके, डोक्याचा भाग, डोके, डोक्यातील विचार मेंदूशी संबंधित आहेत. शरीरातील अंतरंगात होणारी प्रत्येक घटनेची नोंद असते. अज्ञानी माणसाचे विचार म्हणजे अविद्या होय. प्रयत्न करून मनावर नियंत्रण व अविद्धेला निराकरण करणे म्हणे भेदणे (डोके फुटणे) होय. प्रज्ञा जागृत ठेवून सर्वांगीण सत्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी लागते. प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. यातून साधनेची उंची गाठता यावी म्हणून तथागतांनी बोध्यन्ग पर्व सांगितले आहे. बोध आणि अंग म्हणजे बोध्यन्ग म्हणता येईल.

सातव्या दिवशी डोक्याचे सात तुकडे होतील, म्हणजेच मृत्यू येईल असा बावरीला शाप दिला गेला होता. सातव्या दिवशी म्हणजेच आठवड्याचे सात वार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या सात वारीच कोणालाही मृत्यू येतो.

१६ शिष्यांनी धम्म स्वीकारला

हे सर्व बौद्धिक विवेचन, उपदेश ऐकल्यावर बावरीच्या शिष्यांची सुटकेचा निःश्वास सोडला. ते सर्व आनंदाने, कुतूहलाने परस्परांकडे पाहत होते. तथागत बुद्धांकडून धम्माचे ज्ञान प्राशन करून ते तृप्त झाले. त्यानंतर त्या १६ शिष्यांनी गंभीरतापुर्वक निर्णय घेऊन तेथेच धम्म स्वीकारला. हर्षित होऊन ते सर्व पुन्हा दक्षिणेत बावरीकडे परत आले. त्यानंतर बावरीला सातव्या दिवशी डोक्याचे सात तुकडे होतील ह्याचा अर्थ सांगितला. बावरी आनंदित होऊन त्याने सुद्धा धम्म स्वीकारला.

अश्मक आणि मुल्लक या राज्यांत गोदावरीच्या खोऱ्यात बावरी आणि त्याचे १६ शिष्य आणि त्या सोळा शिष्यांचे प्रत्येकी एकेक हजार असे १६ हजार शिष्य मिळून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करू लागले. बुद्ध काळातच बावरीच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यात धम्माचा प्रसार झाला होता. त्या दृष्टीने बावरीच्या धम्म प्रचाराचे ऐतिहासिक महत्व आहे.

जातक कथांमध्ये ह्या शापाचा उल्लेख

दहा पारमितामधील ‘शील’ पारमिता मध्ये ‘मातंग चरिया’ ही जातक कथेतील मातंग जातक (४६७) यात डोके फाटणे म्हणजेच डोक्याचे तुकडे होणे या शापाचा उल्लेख आला आहे.

सुत्तनिपात ग्रंथ आणि पारायण वग्ग

पाली त्रिपिटकातील जागतिक वाङ्ममयात देखील अंतर्भूत करता येतील असे जर कोणते दोन ग्रंथ असतील तर ते धम्मपद आणि सुत्तनिपात होत. सुत्तनिपात हा ग्रंथ फार प्राचीन आहे, याबद्दल विद्वानांत दुमत नाही. अशोकाच्या काळात भरलेल्या तिसऱ्या धम्म संगीतीच्या बऱ्याच अगोदर हे लिखाण आहे, याबद्दलही दुमत नाही.

हे पण वाचा : नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग १ : बौद्ध इतिहासात नांदेडचा शोध

या ग्रंथातील सात सुत्तापैकी तीन सुत्त भाब्रु शिलालेखात कोरलेले आहेत. सुत्तनिपात हे नाव संगितकार भिक्खू द्वारा ठेवण्यात आलेले आहे. सुत्त हा धम्मातील पारिभाषिक शब्द आहे. सुत्त म्हणजे ”सुना है” ज्याचा उपदेश तथागतांनी दिलेला आहे. सुत्तनिपात ग्रंथामध्ये एकूण पाच वग्ग आहेत. त्यात उरग-वग्ग, चूळवग्ग, महावग्ग, अठ्ठकवग्ग आणि पारायण वग्ग असे पाच वग्ग असून यातील ‘पारायण वग्ग’ मधील वत्थुगाथेत ‘बुद्धकालीन बावरी ब्राह्मण आणि त्याच्या १६ शिष्यांचे’ वर्णन आले आहे.

बावरीनगर येथे दरवर्षी धम्म परिषदेचे आयोजन

गोदावरीच्या खोऱ्यात तसेच नांदेड परिसरात बावरी आणि त्याच्या १६ शिष्यांनी बुद्धकाळातच बुधम्माचा प्रचार आणि प्रसार केला. नांदेडला हा बावरीचा प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. ह्या इतिहासाची नोंद घेऊन नांदेड पासून जवळच दाभाड येथे बावरी नगरची स्थापना करण्यात आली असून त्या ठिकाणी महावीराची बांधकाम सुरु आहे. त्यासोबत मागील ३२ वर्षांपासून दरवर्षी जानेवारी महिन्यात पौष पौर्णिमेला दोन दिवशीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येते.

संदर्भ : १) सुत्तनिपात ; धर्मानंद कोसंबी (अनुवाद : पु वि.बापट)
२) बुद्धचर्या (हिंदी) : महापंडित राहुल सांकृत्यायन)
३)बुद्धकालीन बावरी ब्राह्मण आणि बावरीनगरच्या ऐतिहासिक धम्म परिषदा : (डॉ व्ही के भालेराव)
४)महाराष्ट्र बुद्ध धम्माचा इतिहास : (मा.श. मोरे)

जयपाल गायकवाड, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *