जगभरातील बुद्ध धम्म

‘या’ धरणामुळे जवळजवळ पन्नास हजार पुरातन बौद्धस्थळे बाधित होणार

सर्व जगभर व आपल्या भारतात देखील धरणामुळे हजारो पुरातन धार्मिक स्थळे बाधित झालेली आहेत. त्यातली प्रमुख म्हणजे गुजरातमधील मेश्वोे धरणामुळे ‘देव नी मोरी’ हे बौद्ध स्तुप असलेले पुरातन स्थळ बाधित झाले आहे. तर आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवरील नागार्जुन सागर धरणामुळे नागार्जुनकोंडा हे बौद्धस्थळ बाधित झाले आहे. त्याचप्रमाणे आता होऊ घातलेल्या पाकिस्तान आणि चीन यांच्या डायमेर-भाशा या मोठ्या खर्चिक धरण बांधकामामुळे भविष्यात गिलगीट-बाल्टिस्तान भागातील जवळजवळ पन्नास हजार पुरातन बौद्धस्थळे बाधित होणार आहेत.

डायमेर-भाशा धरण बांधकामाबाबत नुकताच चायना पॉवर आणि पाकिस्तान आर्मीज फ्रंटीयर वर्कस ऑर्गनायझेशन यांच्यात करार झाला. यामुळे काराकोरम हायवेलगतची जवळजवळ शंभर किलोमीटर जागा जलमय होणार असून यामुळे सोघदियन, सिचीयन, तिबेट भागातील बुद्ध प्रतिमा व शिलालेख असलेले अनेक शीळा व खडक बुडणार आहेत. ‘गिलगीट-बल्टिस्तान स्टडिज’ या संस्थेचे वॉशिंग्टन येथील संचालक सेंगे सेरिंग यांनी ही माहिती दिली.

सद्यस्थितीत गिलगीट-बल्टिस्तान हा प्रांत जम्मू-काश्मीरचा भाग आहे असा क्षीण दावा भारत करीत असला तरी तेथील भागात पाकिस्तान सुधारणा करीत आहे. या प्रांतातूनच चीन-पाकिस्तान संयुक्तपणे हायवेचे बांधकाम करीत आहे. त्यातच धरण बांधकामामुळे असंख्य बौद्ध पुरातन स्थळें नष्ट होणार असल्यामुळे तेथील मीडिया त्याची बिलकुल बातमी देत नाही. अन्यथा बौद्ध राष्ट्रांमध्ये रोष निर्माण होईल अशी भीती पाकिस्तानला वाटते. मात्र तेथील एक स्थानिक मीडिया ‘पामिर टाइम्स’ ने सांगितले आहे की या धरणामुळे ९५ पुरातन बौद्ध स्थळे व ७५ शिळेवरील बौद्ध कला नष्ट होणार आहे.

गिलगीट-बल्टिस्तान प्रांत म्हणजे एकेकाळी तेथील सिल्क रोड वरून बौद्ध धर्म संस्कृतीचा प्रसार अनेक देशांत झाला होता. त्या काळी भारतात येण्याचा गिलगिट मार्ग हा महत्त्वाचा भाग होता. पश्‍चिमेकडील देशांत बौद्ध भिक्खू याच मार्गावरून गेले होते. गिलगिट मधील नापूर या गावी १९३१ मध्ये बौद्धस्थळी एक हस्तलिखित स्तुपातील संदुकमध्ये सापडले होते. हे मिळालेले हस्तलिखित भारत खंडातील सर्वात पुरातन हस्तलिखित आहे, हे युनोस्कोने मान्य केले आहे. या हस्तलिखितामुळे संस्कृत, चायनीज, कोरियन, जापनीज, मंगोलियन आणि तिबेटीयन भाषांचा कसा विकास झाला हे दिसून येते असे युनेस्कोने आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हटले आहे. इथे एकेकाळी छोटे बौद्ध विद्यापीठ असावे असे सेरिंग यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तान मध्ये फेसबुक वरील एका ग्रुपने ‘Save the Buddha Relics found in Diamer-Bhasha Dam site’ हे अभियान चालविले आहे व पाकिस्तानी पुरातत्व खात्याने येथे लक्ष द्यावे असेही सुचविले आहे. येथील धरणाच्या साइटवर काम करणारे जर्मन तज्ञ लाहमेयर यांनी सांगितले की येथे मोठे संग्रहालय उभारणे आवश्यक आहे. जेणेकरून हा पुरातन ठेवा हलवून सुरक्षित ठेवता येईल. पाण्यात बुडून या शिळा खराब होऊ नयेत यासाठी मंथल, स्करदू येथील स्थानिकांनी बौद्ध प्रतिमा असलेल्या अनेक शिळेभोवती मोठ्या भिंती उभारल्या आहेत तसेच पाकिस्तान सरकारला हा ठेवा सुरक्षित ठेवणे बाबत सूचना केल्या आहेत. वर्षानुवर्षे तेथील पिढ्यां हा मौल्यवान ठेवा पहात आहेत. त्यामुळे त्यांना हा सांस्कृतिक ठेवा अतिशय मोलाचा आणि अभिमानाचा वाटत आहे.

संदर्भ :– https://epochtimes.today/pakistan-china-dam-threatens-to-d…/

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *