जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानने दिला बुद्ध अस्थींचा करंडक; पवित्र अस्थी करंडकाची हत्तीवरून मिरवणूक

२०१६ मधील बुद्ध पौर्णिमेसाठी पाकिस्तानने धम्मराजिका स्तुपात सापडलेला बुद्धअस्थी करंडक श्रीलंकेला तात्पुरता दिला. श्रीलंकन अध्यक्ष सिरीसेना आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी २१ मे २०१६ रोजी मोठ्या समारंभाद्वारे या पवित्र अस्थींचे पूजन केले आणि हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढली. त्यानंतर हा करंडक जनतेसाठी दर्शनार्थ खुला केला.

तक्षशिला हे प्राचीनकाळी बौध्दधम्माचे मोठे विद्यापीठ होते. येथील धम्मराजिका स्तुपाचे उत्खनन १९१२-१६ मध्ये करण्यात आले होते. या स्तूपाचा व्यास १३२ फूट आणि उंची ४५ फूट असून त्याचे बांधकाम भरीव दगडांचे आहे. सदर स्तुपात सापडलेल्या सुवर्ण करंडकामध्ये बुद्धअस्थी असल्याचे निदर्शनास आले होते. हा करंडक तेथील म्युझियम मध्ये १९१६ पासून दर्शनार्थ होता. व गेली कित्येक वर्षे त्याचे पूजन झाले नव्हते.

यास्तव द्विपक्षीय सहकार्य (bilateral cooperation) करारनाम्यानुसार १९ मे २०१६ रोजी या अस्थी श्रीलंकन मंत्री गामिनी जयविक्रमा परेरा यांनी बुद्ध पोर्णिमा निमित्ताने ताब्यात घेतल्या. अशा या धम्मराजीका स्तुपास माझे त्रिवार वंदन.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)