ब्लॉग

आजच्या दलित नाटकांचे अंश बौद्ध नाटकात

तथागत गौतम बुद्धांनी भिकखुंना नाच – नाटक पहायला बंदी घातली होती. बौद्ध अति संयमी होते मग बौद्ध रंगभूमी – नाटक याचे अस्तित्व असू शकते काय ? बुद्धाने भिक्खुंना नाटकाची बंदी घातली असली तरी ती विशिष्ट कारणांसाठी होती, अनुयायांना ही बंदी नव्हती. त्यामुळे बौद्ध रंगभूमी असणे शक्य आहे. पहिला भारतीय नाटककार ‘अश्वघोष’ हा बौद्ध भिक्खु होता. त्याने बुद्धाचे चरित्र संस्कृत भाषेत ‘बुद्धचरित’ या नावाने रचले आहे. हे भगवान बुद्धाचे पहिले चरित्र होय.

अश्वघोषाने नाटकेही लिहिली. त्याने ‘सारिपुत्त प्रकरण’ तसेच ‘सुंदरानंद’ नावाची नाटके संस्कृत भाषेतून लिहिली होती. सारीपुत्र आणि मोगलायन हे दोघेही खूप श्रीमंत त्यांचे जीवन आयुष्य आरामात व्यतीत होत होते एकदा ते दोघे एक नाटक पहायला गेले ते नाटक म्हणजे ‘गिरग्ग समज्जा’ नाटक होते त्यात संसारी जीवनाची व्यर्थता दाखवली होती त्या नाटकाचा या दोघांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी प्रव्रज्जा घेतली. याचाच अर्थ असा होतो की बौद्ध नाटक हे अत्यंत प्रभावी होते.

सुंदरानंद हे नाटक भगवान बुद्धाच्या नंद नावाच्या भावाची कथा सांगणारे आहे. कालिदासाने अश्वघोषाकडूनच प्रेरणा घेऊन नाटके लिहिली हे आता सिद्ध झाले आहे. याप्रमाणेच सुबंधु आणि हंसभद्र यांनी ही बौद्ध नाटके लिहिली, परंतु आज ती उपलब्ध नाहीत. ‘सम्राट हर्षवर्धन’ हे बौद्ध धर्मीय राजा होते. त्यांनी बुद्ध धर्माला राजाश्रय देऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांची नागानंद, रत्नावली, प्रियदर्शिका ही नाटके आज उपलब्ध आहेत. ‘नागानंद’ हे नाटक बुद्ध आणि नागवंशी लोक या संबंधी आहे. नागानंद नाटकात नांदी ही बुद्धाला वंदन करणारी आहे. त्याचप्रमाणे या नाटकात अहिंसेचे आणि त्यागाचे महत्त्व विशद केले आहे.

आपल्याकडील लोककला प्रकारासारखा बंगालमध्ये ‘जात्रा’ नावाचा कलाप्रकार आहे. या कला प्रकारचा बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी वापर केला जाई. दक्षिण भारतात महायान पंथाचा प्रचार आचार्य नागार्जुन यांच्यामुळे झाला. आंध्र प्रदेशातील नागार्जुन कोंडा या परिसरात रंगमंदीर- नाट्यगृहाचे अवशेष सापडले आहेत .ग्रीक आणि रोमन नाट्यगृहासारखे हे नाट्यगृह आहेत. येथे नक्कीच नाटके सादर केली जात असणार, परंतु आज त्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. डोमारी ही आंध्र प्रदेशातील गाणारी अस्पृश्य जात. हे डोमारी इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून बुद्धाच्या जीवनावरील प्रसंगाचे नाट्यरूपांतर सादर करीत.तसेच जातक कथांचेही नाट्यरूपांतर सादर केले जाई. यात गीत संगीत याचा अधिक वापर असे. आता या लोकांची कला लोप पावली असून आता ते गाणे म्हणत भीक मागत असतात.

तामिळनाडूमध्येही डोमेकुट अर्थात डोमरी या जातीच्या लोकाकडूनही मनोरंजन करताना बौद्ध विचारांचा प्रसार केला जात असे. केरळमध्ये कुडीयाटम आणि कुट्टकुलम या नाट्य परंपरेतही बौद्ध प्रभाव जाणवतो. यावरून आपण असे म्हणू शकतो की भारतात विशेषतः दक्षिणेत बौद्ध नाटकांची परंपरा महायान संप्रदायाच्या लोकांनी सुरू केली होती आणि ती बरीच वर्ष अस्तित्वातही होती. बौद्ध नाटक आंध्रप्रदेश पर्यंतच सीमित राहिले नाही तर श्रीलंका , नेपाळ, थायलंड, तिबेट, चीनमध्येही प्रचलित होते. जपानचे ‘नोह’ नाटक तर बुद्ध मताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सादर होत असते.

सम्राट अशोकाने कलिंग जिंकल्यानंतर ओरिसा हे राज्य त्याच्या अधिपत्याखाली आले. तेथे बौद्ध धर्माचा प्रसार झाला. ओरिसा प्रांतात विकसित झालेली ओडिसी नृत्यकला ही बौद्ध परंपरेशी जुडलेली आहे . बुद्धकालीन सहजयान आणि वज्रयान या पंथांच्या साधना प्रकारातून ओडिसी नृत्याचा विकास झाला. ओडिसी नृत्य हे मंदिरातील देवदासी सादर करीत असत. त्यांना महारी असे म्हटले जात होते. महाराष्ट्रातील महार या जातिशी याचा संबंध आहे,असे संशोधनांती सिद्ध होत आहे.

बौद्ध धर्माचा ऱ्हास झाल्यानंतर हे वेगवेगळ्या प्रांतातील कलाकार भिकारी आणि अस्पृश्य झाले.त्यांच्या कला भीक मागण्यासाठीच उरल्या.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या शुद्र पूर्वी कोण होते या ग्रंथात सिद्ध केले आहे की भारतातील शुद्र हे पूर्वी बौद्ध होते.म्हणून असे म्हणता येईल की आजचे शुद्र कलाकार पूर्वीचे बौद्ध कलाकार होत.

महाराष्ट्रात तमाशा हा लोकप्रिय कला प्रकार सादर होत असे. हे सादर करणारे विविध मागास वर्गीय जातीतील कलावंत असत .पैकी त्याकाळी बाबासाहेबांनी सांगितलेला विचार प्रसारित करण्याचे कार्य अस्पृश्य समाजातील महार जातीने आपल्या जलशातून केले , ‘आंबेडकरी जलसा’ हा तमाशा सारखा वाटणारा कला प्रकार होता. यात तमाशातील गण, गवळण, बतावणी, वग नव्या स्वरूपात सादर केले जात. गणा ऐवजी बाबासाहेबांना नमन केले जाई. गवळणी केवळ मनोरंजन न करता प्रबोधन करीत.

वग सुद्धा अन्याय अत्याचार याचे दर्शन घडविणारा आणि त्यातून मुक्तीचा मार्ग दाखविणारा असे. किसन फागोजी बंदसोडे, भीमराव कर्डक, केरूबुवा गायकवाड असे कितीतरी जलसाकार तमाशा सोडून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवीत. यात प्रामुख्याने शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन, संघटनेचे महत्व आदि विषय असत. आंबेडकरी जलसा हाच दलित नाटकाचा आरंभ म्हणता येईल. एकदा बाबासाहेब म्हणाले होते की ‘‘माझ्या दहा सभा आणि कर्डक मंडळीचा जलसा बरोबर आहे’’. याचा अर्थ इतकाच ती की बाबासाहेबांनी जलशांचे महत्त्व ओळखले होते.

बाबासाहेबांनी मोरेश्वर तांबे यांना त्यांच्या नाटकाचे ‘महाराची सून’ हे नामकरण करायला सांगितले होते हे पहिले दलित नाटक होय. पुढे आपल्या लेखकांना आपल्या प्रश्नांवर नाटक लिहायला सांगितली. याच प्रेरणेतून प्राचार्य म.भी.चिटणीस यांनी ‘युगयात्रा’ हे नाटक लिहिले. काही विद्वानांच्या मते या आधी इतर नाटककारांनी काही नाटके लिहिली होती.

नंतर महाराष्ट्रात दलित रंगभूमी जोरात उभी राहिली. मुंबईत प्रेमानंद गज्वी, नांदेड मध्ये प्रा.दत्ता भगत, पुण्यात भि.शी.शिंदे, टेक्सास गायकवाड,नागपुरात प्रभाकर दुपारे, दादाकांत धनविजय, संजय जीवने नाशिक मध्ये भगवान हिरे यांनी नाटके लिहून सादर केली. औरंगाबादमध्ये डॉक्टर गंगाधर पानतावणे, प्रा. त्र्यंबक महाजन,डॉ.रुस्तुम अचलखांब,प्रा.अविनाश डोळस,प्रा.आर .के. क्षीरसागर,प्रा. विजयकुमार गवई, राम दोतोंडे, प्रकाश शिरसाट, डॉ. ऋषिकेश कांबळे आणि प्रकाश त्रिभुवन यांनी नाटके लिहून सादर केली. प्रकाश त्रिभुवन यांनी लिहिलेले ‘थांबा रामराज्य येतय’ हे नाटक अतिशय गाजले. या नाटकाचे दिल्लीसह विविध ठिकाणी पाचशेवर प्रयोग झाले आहेत. या नाटकाला विविध पुरस्कार मिळाले आहेत. या नाटकामुळे खऱ्या अर्थाने दलित रंगभूमी प्रस्थापित झाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या औरंगाबाद येथिल मिलिंद महाविद्यालय च्या परिसरात अनेक राजकारणी, समाजकारणी, साहित्यिक, नाटककार घडले. ‘दलित रंगभूमी’ ही याच परिसराची देण होय.प्रा. साहेबराव गायकवाड मधुसूदन गायकवाड, जगन्नाथ भिंगारे, विलास गवळी, प्रा. प्रभाकर शिरोळे, विजया शिरोळे, अशोक गायकवाड, बाजीराव साळवे, मधुकर काळे,पंढरीनाथ घनघाव या आणि असंख्य इतर कलावंतांनी औरंगाबादचे ‘दलित थियटर’ ही संस्था स्थापन करून नाटकाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे.

दलित रंगभूमी प्रस्थापित झाली खरी परंतु आता दलित या शब्दाला विरोध होताना दिसतो आहे. दलित ऐवजी आंबेडकरी रंगभूमी म्हणावे ,त्याच प्रमाणे बौद्ध रंगभूमी म्हणावे अशी काही लोकांची भूमिका आहे ,तर काही लोक दलित या शब्दा बद्दल आग्रही आहेत. प्रेमानंद गज्वी यांनी ‘बोधी रंगभूमी’ स्थापन करून नाट्यलेखन आणि नाट्यप्रयोग सादर करणाऱ्या कार्यशाळा घेतल्या.

टेक्सास गायकवाड यांनी ‘प्रबुद्ध रंगभूमी’ स्थापन केली. मागील वर्षी आम्ही प्रकाश त्रिभुवन लिखित आणि दिग्दर्शित तीन बौद्ध नाटकांचा महोत्सव औरंगाबाद येथे आयोजित केला होता. या महोत्सवात भन्ते अंगुलीमाल यांच्या जीवनावरील ‘गुरू-दक्षिणा’ हे नाटक, सम्राट हर्षवर्धन यांच्या जीवनावरील ‘दिग्विजय’ हे नाटक ,तसेच ‘गणनायिका आम्रपाली’ ही तीन नाटके सादर केली . तसेच भगवान बुद्धाच्या वृक्ष – वन प्रेमावर आधारित ‘धन नको वन हवे’ या नावाचा बाल-लघु चित्रपट निर्माण केला.

आता बौद्ध रंगभूमी आकार घेत आहे याचे हे ठळक उदाहरण म्हणावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि तथागत भगवान बुद्धांची शिकवण याचा प्रचार आणि प्रसार करून समाजप्रबोधनाची ही नाट्य चळवळ आहे मंग तिला कोणी दलित रंगभूमी, बहुजन रंगभूमी, आंबेडकरी रंगभूमी म्हणो की बौद्ध रंगभूमी म्हणो.

भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी भारतात बौद्ध धर्म स्थापन केला,तो विकसीत झाला भारतात त्याचा ऱ्हास झाला .पुढे बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन करून पुन्हा उर्जित अवस्थेला आणला आहे.त्याचप्रमाणे बौद्ध रंगभूमी बौध्द काळात फुलली,धर्माच्या ऱ्हासा बरोबर लोप पावली. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे आंबेडकरी जलसा,दलित रंगभूमी ते बौद्ध रंगभूमी असा तिचा विकास होईल यात तिळमात्र शंका नाही, कारण की रंगभूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे.

प्रकाश त्रिभुवन,
एफ १,एच १ -४६,एन ४,सिडको,
औरंगाबाद.
मो.९४०३६३७५७६