इतिहास

पेशावर मधील बोधीवृक्ष; सम्राट कनिष्कने रुजविलेला बोधिवृक्ष अद्याप तग धरून

पाकिस्तानमध्ये पेशावर हे मोठे शहर आहे. या शहराचे पूर्वीचे नाव पुष्पापूर/पुरुषपूर होते. चिनी प्रवासी भिक्खूं फाहियान(३ रे शतक) आणि हुएनत्संग (७वे शतक)यांनी जेव्हा पेशावरला भेट दिली तेव्हाचा प्रवास वृत्तांत लिहून ठेवला आहे.

सम्राट कनिष्क राजाच्या काळापासून पेशावर हे मध्य आशिया आणि दक्षिण आशिया भागाचे व्यापारी, राजकीय आणि धार्मिक केंद्र होते. इथूनच बौद्ध धर्माची महायान शाखा स्वातच्या खोऱ्यातून गिलगिट, तिबेट, चीन, अफगाणिस्तान, मध्य आशिया, मंगोलिया आणि पूर्वेकडील देशात गेली. काशप्य मातंग हा पेशावर इथूनच पहिल्या शतकात चीनमध्ये प्रसारासाठी गेला. महायान पंथातील काही संस्कृत साहित्य इथेच लिहिले गेले.

सम्राट कनिष्काच्या काळात जी धम्मसंगति भरविली होती त्या संगतित झालेल्या निर्णयांचा ताम्रपटात उल्लेख करून तो पेशावर येथील कनिष्काच्या स्तूपात ठेवला गेला. त्याच सुमारास सम्राट कनिष्क राजाने बोधगया वरून बोधिवृक्षाची फांदी आणून पेशावर येथे रुजविली.

शेकडो वर्षांनीं चिनी प्रवासी भिक्खू हुएनत्संग हे दुसरे चिनी यात्रेकरू सुनगून यांचे सोबत इथे आले होते, तेव्हा सुनगून याने लिहिले आहे की तो बोधिवृक्ष एवढा मोठा आहे की त्या खाली उभे राहिले असता आकाश दिसत नाही, एवढा तो झाकोळलेला आहे. पसरलेला आहे. तसेच वृक्षाखाली १७ फूट उंचीच्या ध्यानमुद्रा अवस्थेतील चार बुद्धमूर्त्या आहेत. सम्राट कनिष्कने रुजविलेला बोधिवृक्ष हजारो वर्षे तग धरून होता असे दिसते.

कारण मुघल बादशहा बाबर जेव्हा पेशावर येथे सन १५०४ मध्ये आला होता तेव्हा त्याने हा प्रचंड वृक्ष बघितल्याचे नमूद केले आहे. तसेच संन्यासी, जोगी आणि हिंदू लोक येथे येऊन मुंडण करतात अशी प्रथा पाहिल्याचे नमूद केले गेले आहे. अशी ही पवित्र जागा सद्यस्थितीत पेशावर शहरात ‘पिपल मंडी’ म्हणून प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने हा पुरातन वृक्ष आता नष्ट झाला असून सद्यस्थितीत तेथेच वृक्षाच्या फुटलेल्या फांद्या आहेत. व आजूबाजूस व्यापारी लोकांचे गाळे झाले आहेत. आणि तेथील कोणालाही याचे गम्य नाही.

तसेच चिनी प्रवासी फाइयान जेव्हा येथे आला होता तेव्हा त्यांनी पेशावर येथे बोधिवृक्षाच्या बाजूला असलेल्या विहारात बुद्धांचे भिक्षापात्र बघितल्याचा उल्लेख केला आहे. खरेतर याचसाठी सम्राट कनिष्काने तेथे स्तूप आणि विहार बांधले होते. कारण त्याचा एक गजराज तेथे असलेल्या भिक्षापात्रास नजरेआड होऊ देत नव्हता. त्यावेळी जवळजवळ ७०० भिक्खू भगवान बुद्धांच्या भिक्षापात्राची काळजी घेत असत. व फुले वाहून पूजा-अर्चा करीत असत.

सम्राट कनिष्क राजाने बांधलेला स्तुप, विहार आणि बोधिवृक्ष ही पेशावर शहरामधील धम्माची मोठी सांस्कृतिक खूण होती. मुघल राजवटीत पेशावर शहर पसरू लागले. तेव्हा हा स्तूप जुन्या पेशावर किल्ल्याजवळील गुंजगेटपाशी होता. येथील नक्षीकाम केलेले अनेक दगड, सुंदर मुर्त्या, शिल्पे आजूबाजूच्या लोकांनी बांधकामासाठी पळवून नेल्या. ब्रिटिश राजवट येईपर्यंत एवढ्या मोठ्या प्रचंड स्तुपाची छोटी टेकडी झाली होती. ब्रिटिश अधिकारी स्पूनरने हा स्तुप खोदून अस्थि करंडक शोधून काढला. आज हा करंडक पेशावर म्युझियममध्ये असून त्यातील बुद्धधातू म्यानमार देशात मंडाले शहरात आहेत.

तर अशी ही पाकिस्तानातील पेशावर शहरातील बौद्ध संस्कृतीच्या अवशेषांची कथा. आज तेथे स्तुप नाही. विहार नाही. तसेच भगवान बुद्धांच्या भिक्षापात्राचे काय झाले याची माहिती नाही. मात्र बोधिवृक्ष अद्याप तेथे तग धरून आहे. आणि त्याचे ममत्व तेथील कोणालाच नाही या बद्दल वाईट वाटते.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *