इतिहास

राजकुमार सिद्धार्थाचा गृहत्याग नंतरचा प्रवास – भाग २

या तरुण शाक्य राजकुमाराचे राजकारभारात मन वळविण्यात बिम्बिसार अपयशी ठरला. मात्र ज्ञान प्राप्त झाल्यानंतर राजगृहाला परत यावे अशी विनंती केली. आलार कालाम आणि उद्दक रामपुत्त यांचा आश्रम उरुवेलाच्या (सध्याचे बुद्धगया) रस्त्यावर आहे म्हणून सिद्धार्थाने तिकडे प्रयाण केले. आधी आलार कालाम आणि नंतर उद्दक रामपुत्त यांच्याकडे राहून त्यांनी शिक्षण घेतले.

इच्छित ध्येय साध्य होत नसल्याचे पाहून कालांतराने त्यांनी स्वतःच मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला आणि उरुवेला येथील सेनानिगाम गावाच्या वनातील जागा ध्यान अभ्यासासाठी योग्य असल्याचे पाहून तेथे थांबले. सेनानि हे सुजाताचे वडील होते व ते एक प्रतिष्ठित असल्याने त्या गावचे नाव सेनानिगाम होते असे आचार्य बुद्धघोष यांनी ‘सारत्थप्पकासिनी’ या अट्ठकथे मधे लिहिले आहे – “सुजाताय वा पितु सेनानिगाम निगमो”. आत्ताचे सुजाता स्तूपाचे जे ठिकाणआहे, त्याचाच जवळ हा सेनानिगाम परिसर असावा.

हे स्तूप व त्याच्या जवळ अशोक स्तंभ हे दोन्ही सम्राट अशोकाने उभारले होते. (नंतर हा स्तंभ जो एका बांधकामासाठी तोडण्यात आला होता. त्यानंतर तो गया येथील चौकात ठेवला होता व त्या चौकाचे आजही नाव ‘गोल पत्थर’ असे आहे. १९५६ साली हा अशोक स्तंभ बुद्धगया येथील मूळ स्थानी पुन्हा ठेवण्यात आला.)

याच सेनानिगाम मध्ये सिद्धार्थाला कौण्डिन्य, भद्दीय, वप्प, महानाम आणि अस्सजी हे पाच परिव्राजक भेटले. जो पर्यंत सिद्धार्थ यांची कठोर तपसाधना चालू होती तोपर्यंत हे सर्वजण त्यांच्या बरोबर होते. मात्र सिद्धार्थाने जेव्हा अन्नग्रहण करायला सुरुवात केली तेव्हा हे सर्वजण इसीपतन मिगदाव वनात निघून गेले.

अतुल भोसेकर (लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)

संदर्भ:
जातक अट्ठकथा
पब्बज्जासुत्त
The Life of Buddha
बुद्धकालीन भारतीय भूगोल
सारत्थप्पकासिनी
युआन चुआंग : ट्रॅव्हल्स इन इंडिया