बातम्या

UNESCO ला सारनाथचा प्रस्ताव सादर; जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होणार?

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या सारनाथ मंडळाने सारनाथ या महत्त्वाच्या बौद्ध ठिकाणाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा याबाबतचा प्रस्ताव नुकताच युनेस्कोला सादर केला. तो जर मान्य झाला तर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सारनाथचे नाव येईल.

वाराणसी पासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर असलेले हे स्थळ बौद्ध जगतात अत्यंत पवित्र मानले गेले आहे. ज्ञानप्राप्ती नंतर भगवान बुद्ध येथे गयेपासून चालत आले.आणि पंचवर्गीय भिक्खूंना प्रथम उपदेश दिला. दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला. धम्मचक्र गतिमान केले.

येथेच सम्राट अशोकाने (इ.स. पूर्व ३०२-२३२) ‘धम्मेक’ स्तुप उभारला असून धम्म आणि संघ इथेच प्रथम स्थापन झाला म्हणून ‘धम्मराजिका’ स्तुपही उभारला आहे. तसेच या पवित्रस्थळी स्तंभ आणि धम्मचक्र उभारून त्याचे महत्व दर्शविले आहे. भगवान बुद्ध यांचा पहिल्या वर्षावासाचा निवास देखील येथील ‘मुलगंधकुटी’ मध्ये झाला होता.

‘धम्मेक’ स्तूपाच्या आजूबाजूस ३०० छोटेमोठे स्तुप असल्याने सारनाथच्या स्तुपाचे वेगळेपण लक्षात येते.सारनाथच्या चारही बाजूस १० कि. मी. परिसरात आढळलेल्या ( वाराणशी धरून) अनेक पुरातन स्तुपांच्या जागी असलेले अवशेष, शिल्पं, विविध मुर्त्या, शिलालेख यांचा संग्रह येथील म्युझियममध्ये बघण्यास मिळतो.

चिनी प्रवासी भिक्खू फाहीयान आणि हुएनत्संग यांनी सुद्धा अनुक्रमे तिसऱ्या व सहाव्या शतकात येथे भेट दिली होती तेव्हा काशीपर्यंत धम्म पसरला असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. बौद्ध जगतामध्ये या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळाबाबत अत्यंत अतूट भावना आहेत. म्हणूनच थायलंड, म्यानमार, चीन, जपान, कोरिया, श्रीलंका, भूतान, व्हिएतनाम इथून असंख्य पर्यटक येथे येतात. महाराष्ट्रातूनही असंख्य बौद्ध बांधव येथे येतात.

पुरातत्व विभागाचे अधीक्षक नीरज कुमार सिन्हा म्हणाले की ‘युनेस्कोच्या नियमावलीनुसार सहा सांस्कृतिक आणि चार नैसर्गिक अटींची पूर्तता झाली पाहिजे. त्यानुसार सारनाथस्थळ या सर्व अटींची पूर्तता करीत आहे. फक्त या स्थळाच्या आजुबाजूस काँक्रीट जंगल उभे झाले असल्याने तो एक मोठा अडथळा तयार झाला आहे’

उत्तर प्रदेशातील ताजमहाल, फत्तेपूर सिक्री, आग्रा किल्ला यांचे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाव आहे. सारनाथ तर त्यांच्याही पूर्वीचे असून अडीच हजार वर्षांपासून बौद्धांचे पवित्र स्थळ आहे. मग इतकी वर्षे उत्तर प्रदेश राज्याच्या ASI ला त्याची जाण नव्हती काय? तरी सारनाथचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर कुशीनगरचाही प्रस्ताव ASI ने UNESCO ला सादर केला पाहिजे. तूर्तास जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सारनाथचा समावेश होवो अशी आपण प्रार्थना करूया. जेणेकरून या स्थळाचे पावित्र्य कायम टिकून राहिल.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास आणि अभ्यासक)