इतिहास

महाराष्ट्राची पहिली धम्मयात्रा- १९६० मधील सोपारा स्तुप यात्रा

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसह बौद्ध धर्माची दिक्षा घेतली आणि भारतातील असंख्य पिडीतांची आयडेंटिटी चेंज झाली. त्यांच्या आयुष्यातील नव्या मार्गावरील वाटचालीला सुरवात झाली. हा बदल अपेक्षित होताच आणि तो उस्फूर्तपणे स्वीकारला जाऊन घरातील काल्पनिक देवांना विसर्जित करण्यात आले. परंतु त्यावेळी तळागाळात बुद्धधम्माबद्दल काहीच माहिती नव्हती. वंदना माहीत नव्हती. मात्र धर्मांतर झाल्यानंतर दोन-तीन वर्षातच बौद्ध धर्माची माहिती असणारी अनेक पुस्तके, पक्षिके बाजारात येऊ लागली. भगवान बुद्ध यांचे चरित्र, त्यांचा उपदेश यावरील पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली. मग हळूहळू बुद्ध धम्म म्हणजे काय हे समजू लागले. यामुळे आजूबाजूस असलेल्या बौद्ध लेण्यां, स्तुप पाहून हे सर्व आपलेच आहे ही जाणीव जागृत झाली.

१९६० साली भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष यशवंतराव आंबेडकर यांनी सोपारा स्तुपाला भेट दिली. त्याच वर्षी मुंबईचे पहिले बौद्ध महापौर पी. टी. बोराळे यांनी महाराष्ट्रातील पहिली धम्मयात्रा दिनांक २३ मार्च १९६० रोजी सोपारा स्तूपाची आयोजित केली. साठ वर्षांपूर्वी नालासोपाऱ्याला जाणे म्हणजे मोठे दिव्य होते. जोगेश्वरी पासून पुढे मनुष्यवस्ती विरळ होती. मुंबईच्या बाहेर प्रवास करत जाणे म्हणजे आडगावात गेल्यासारखे होते. बोराळे साहेबांनी तेथे दिप प्रज्वलित केला आणि आलेल्या यात्रेकरूंसोबत पंचशिल ग्रहण केले. अशा तऱ्हेने हळूहळू सार्वजनिक बौद्ध कार्यक्रमास सोपरा स्तुपापासून सुरुवात होत गेली. त्यानंतर सोपारा येथे बुद्ध जयंती निमित्ताने पहिले धार्मिक प्रवचन १९६२ साली झाले. त्याच वर्षी सिलोनच्या संसदीय प्रतिनिधी मंडळाने सुद्धा सोपाऱ्याला भेट दिली.

त्यानंतर सोपारा बुद्धजयंती चॅरिटी सोसायटी स्थापन करण्यात येऊन त्यामध्ये श्रीमती के कॉन्ट्रॅक्टर मॅडम, सोफिया वाडिया मॅडम, त्रिवेदी, रेव्ह.धर्मानंद, पी.टी. बोराळे, परमार गुरुजी, कापडिया व केळशीकर या सभासदांचा समावेश झाला. त्यावेळेला मोठा समारंभ होऊन सोपारा येथे भगवान बुद्धांची छोटीमूर्ती स्थापित करण्यात आली. तसेच पंडित भगवानलाल इंद्रजी यांनी सोपारा येथे केलेल्या उत्खननास ८० वर्षे झाल्या निमित्त स्मृतिदिन साजरा करण्यात आला. दि.२२ एप्रिल १९६२ रोजी सयाम,सिलोन आणि भारतातील बौद्ध भिक्खूंची नालासोपारा येथे मोठी यात्रा आयोजित करण्यात आली. त्यांचे स्तुपाजवळ घेतलेले छायाचित्र येथे सादर करण्यात येत आहे. त्यामधे दिसत असलेली लहान मुले आज सत्तर-ऐंशीच्या घरात असतील.

१५ नोव्हेंबर १९८१ रोजी जेव्हा जपानी भिक्खूबरोबर नालासोपाऱ्याचा स्तुप प्रथम पाहिला तेंव्हा नालासोपारा सुंदर आणि शांत होते. ट्रेनने जेंव्हा नालासोपारा स्टेशनवर उतरलो तेव्हा फक्त वीस-पंचवीस माणसे उतरली होती. आता मात्र नालासोपारा पार बदलले असून स्तूप परिसराच्या आजूबाजूस वस्ती वाढल्याने शांतता धोक्यात आली आहे. मात्र एक प्रश्न अजूनही पडतो की जे सोपारा बंदर प्राचीनकाळी व्यापारासाठी प्रसिद्ध होते आणि ज्या बंदरातून सम्राट अशोकपुत्र महास्थाविर महेंद्र सिरिलंकेस गेले ते बंदर नेमके आहे तरी कुठे ? पोर्तुगीज येण्यापूर्वीचा वसईचा भाग येथे सोपारा बंदर होते काय ? हजारो वर्षापासून गाळ साठल्याने बंदर कदाचित नष्ट झाले असावे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)