ब्लॉग

कथा एका अवलियाची…डॉ. हर्षदीप श्रीराम कांबळे IAS

भंडारा जिल्ह्यामध्ये एक चिचाळ नावाचे छोटे गाव आहे. त्या गावामध्ये 1970 साली एका मुलाचा जन्म झाला त्याची ही कथा, चिचाळ हे गाव खूप छोटं गाव, ते गाव महाराष्ट्राच्या नकाशात शोधाल तरी सापडणे कठीण असं छोटंसं गाव आहे.गावामध्ये मोजकीच घरे, एकच प्राथमिक शाळा त्या प्राथमिक शाळेचे शिक्षक रामजी, यांचा मुलगा अभ्यासात हुशार होता.

तो मोठा झाल्यावर एक मोठा डॉक्टर व्हावा हिच त्याचा आईची ईच्छा. आता डॉक्टर का व्हावं? तर गावामध्ये एक साधा दवाखाना नाही. कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर अडीच किलोमीटर चालत जावे लागे. कितीतरी वेळा या मुलांना कडेवर घेऊन ती माय पावसापाण्याची अडीच किलोमीटरची पायपीट करून जात होती. त्यामुळं आपल्या पोरानं डॉक्टर व्हावं आणि आपल्या लोकांची इथेच सेवा करावी अशी त्या माउलीची ईच्छा. म्हणून लहानपणापासून तुझा दादा इंजिनिअर आणि तू डॉक्टर व्हायचं अशी शिकवण त्या मायमाउलीने दिली होती.

प्राथमिक शिक्षण घेत असतांना एक गोष्ट पक्की ठरविली होती की आपण डॉक्टर व्हायचंच…आणि त्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार आहे. बालपणापासूनच वाचनाची अभ्यासाची गोडी निर्माण झाली, वाचनाची इतकी आवड की गावाच्या जवळपास एक छोटीशी लायब्ररी होती, त्यात 300 ते 350 पुस्तके असतील पण ते प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यागोदरच या पठयाने पूर्ण वाचून ठेवले होते इतकी प्रचंड आवड होती वाचनाची…

प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी सातारा सैनिक स्कुल मध्ये प्रवेश केला. सातारा सैनिक स्कुल जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवणार ते स्कुल. सैनिकी स्कुल असल्यामुळे जडणघडण झाली ती अगदी शिस्तबद्ध आणि काटेकोर. सकाळी 5 वाजता उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व गोष्टी अगदी वेळच्या वेळीच. वेळेवर उठने, व्यायाम करणे, शाळेत येणे, वेळेवरच जेवण, वेळेवरच खेळायचं, वेळेवर अभ्यास आणि वेळेवर झोप, यामध्ये कोणताही बदल नाही. आणि वेळ चुकवली किंवा शिस्त मोडली तर शिक्षा सुद्धा सैनिकांना असतात तशाच व्हायच्या. त्यामुळे शिस्त आणि आत्मविश्वास जो मनावर बिंबवला गेला तो याच साताऱ्याच्या सैनिकी शाळेमध्ये. शाळा सैनिकी असल्यामुळे आणि कडक शिस्तीचे पालन करून, अभ्यासात गोडी होतीच आणि प्रचंड आत्मविश्वासही होता, ठरवलं की आपण पायलट व्हायचं. पायलट होऊन सैनिकी विमान चालवायच आणि देशसेवा करायची. आणि पायलट होण्यासाठी जीव तोड मेहनत केली. परीक्षा पास झाली पण उंची कमी असल्यामुळे पायलट होता आलं नाही.

सैनिकी शाळेत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठरल्याप्रमाणे डॉक्टर व्हायचं तर होतच म्हणून नागपूरमध्ये एमबीबीएसला ऍडमिशन घेतलं. एमबीबीएसचा अभ्यास करत असतांना जातीयता अनुभवायला मिळाली, त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर असोसिएशनचा सभासद झाला होता, बालपणी आईकडून बाबासाहेबांचा संघर्ष आणि त्यांना आलेल्या अडचणी आईने सांगितल्या होत्या. त्यामुळे इथे त्याच्याबरोबर काय घडतंय आणि का घडतंय हे त्याला चांगलंच समजत होत. पण डॉक्टर तर व्हायचंच होत.

वडिलांसोबत मोठा भाऊ सुद्धा मेडिकलच शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतः शिक्षण आणि सोबत काम करून याच्यासाठी पैसे पाठवत असे. शिक्षण पूर्ण करून डॉक्टर व्हायचचं हे ही पक्क ठरलं. त्यासोबतच सैनिकी शाळेमधून झालेले कणखर संस्कार, त्या शाळेने मनाने आणि शरीराने शक्तिशाली बनवलं होत. आणि पाहता पाहता या मुलाने एमबीबीएसची परीक्षा पास केली.

आईच स्वप्न पूर्ण झालं एक मुलगा इंजिनिअर आणि दुसरा मुलगा डॉक्टर अजून 2 भाऊ आणि एक बहीण यांची जबाबदारी आता ह्या मुलांवर आली होती. ज्या प्रमाणे मोठ्या भावाने याला शिक्षणासाठी मदत केली, त्याप्रमाणे आपल्या छोट्या भावंडांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी यालाही मदत करणे गरजेचेच होते. शिक्षण घेतांना आलेले अनुभव याला माहीतच होते. त्यामुळे आपण या सिस्टीमचा भाग झालो पाहिजे, जी सिस्टीम बदल घडवू शकते. ही ईच्छा मनात आली होती. गोंदिया मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत असताना घरी सांगितलं की मी काम सोडतोय.

सहाजिकच घरच्यांनी सहजासहजी परवानगी दिली नाही, तू काम सोडलं तर तुझ्या भावंडांच शिक्षण कसं होईल? आणि एवढी चांगली नोकरी का सोडतोस. तर घरी सांगितलं की मला IAS अधिकारी व्हायचंय. म्हणजे त्यांना कळावं म्हणून मला कलेक्टर व्हायचंय. असं त्या मुलानं घरी आणि मित्रांना पण सांगितलं. मित्र तर सोप्या भाषेत म्हणाले तू काय स्वतःला खूप शहाणा समजतो का? नको ती गोष्ट कशाला करतोस. आहेस ना डॉक्टर, आणि एवढंच कलेक्टर व्हायचं असेल तर काम करून कलेक्टरची परीक्षा दे. पण यांना सगळ्यांना सांगायच्या अगोदर या मुलाने काम करता करता एकदा परीक्षा दिली होती, काम करून पास होता येत नाही अभ्यासाला वेळ मिळत नाही हे फक्त या मुलालाच माहित होत. त्यावेळी रंगारी नावाच्या फॅमिली डॉक्टरने विश्वास दिला आणि सांगितलं की दे परीक्षा. पैशाचं टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्यासोबत.

रंगारी डॉक्टर दिवसभरच्या कमाई मधून रोज 100 रु ह्या मुलाच्या शिक्षणासाठी बाजूला काढत. आणि महिन्याच्या शेवटी ह्या मुलाला देत असे, त्यातून हा मुलगा आपल्या लहान भावाच्या शिक्षणासाठी, तर काही स्वतःच्या शिक्षणासाठी वापरत असे. रंगारी डॉक्टर न चुकता पैसे पाठवत असे. शिक्षणासाठी पैसे कमी पडू नये म्हणून आईने तिच्या सोन्याच्या बांगड्या विकल्या. आता परीक्षा पास होणं हीच मोठी परीक्षा ह्या मुलावर आली. मुलाची जिद्द चालू 8 तासापासून सुरु केलेला अभ्यास 16 तासांवर गेला. परीक्षा झाली निकाल आला निकाल सर्वांचाच आई, बाबा, भाऊ, बहीण, मित्र, डॉक्टर रंगारी जणू परीक्षा या सर्वांची होती.

निकाल आला तो जिद्दी मुलगा भारतातील उच्च परीक्षा पास होऊन IAS झाला.
IAS डॉ. हर्षदीप श्रीराम कांबळे

डॉ. हर्षदीप कांबळे प्रशासकीय सेवेत रुजू…

हळूहळू घरची परिस्थिती सुधारत गेली. मोठा भाऊ परदेशात काम करू लागला. लहान भाऊ बहीण वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योग करू लागले. जिथे एक एक पैसा जोडून आपलं घर व्यवस्तीत बांधता आलं नाही बापाला, पण शिक्षणाची गरिबी कधी मुलांना होऊ दिली नाही. सर्व मुलांना बाबासाहेबांचे तथागत बुद्धांचे विचार लहानपणीच आईने इतक्या कुशलतेने संगोपन केले की सर्व मुले मोठं मोठ्या हुद्यावर पोहचून सुद्धा आपल्या परिस्थितीची जाण ठेवून होते. पंचशिलेचे आचरण त्यांच्या अंगवळणी बसले. 10 बाय 10 च्या छोट्याश्या घरात 7 व्यक्ती राहत होते तिथे एक छान बंगला या मुलांनी आई वडिलांना अर्पण केला. आई वाडीलांच्या छत्रछायेखाली गुण्यागोविंदाने राहू लागले.

धम्मसेवक डॉ. हर्षदीप कांबळे त्यांच्या पत्नी धम्मसेवीका रोजना व्हॅनिच कांबळे (थायलंड) ह्यांच्यासोबत लोकुत्तरा भिक्खु ट्रेनींग सेन्टर, औरंगाबाद इथे.

आता हर्षदीप कांबळे IAS असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांची प्रशासकीय सेवा देत होते. त्या सेवेत रुजू झाल्यापासून त्यांना जितके जास्त बाबासाहेबांच्या विचारांचे काम करता येईल, बुद्धांच्या विचारांचे काम करता येईल तितके अधिक काम करण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. ज्यावेळी कांबळे सर दिल्ली मध्ये समाजकल्याण मंत्रीचे खाजगी सचिव होते त्यावेळी त्यांनी एससी, एसटीच्या बांधवांसाठी प्रिमॅट्रिक स्कॉलरशिप योजना तयार केली. त्या योजनेचा देशातील 50 लाख विद्यार्थाना लाभ घेता आला. तसेच 26 अली रोड जिथे बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला तिथे बाबासाहेबांचं इंटरनॅशनल स्मारक तयार करण्यासाठी समिती नेमली.

ज्यावेळी सरांची औरंगाबाद महानगर पालिकेमध्ये आयुक्त म्हणून नेमणूक झाली. त्यावेळी त्यांनी औरंगाबाद शहराचा विकास तर केलाच. परंतु औरंगाबाद मध्ये आल्यावर बाबासाहेबांनी तयार केलेल्या मिलिंद कॉलेजला भेट दिली आणि 250 ते 300 एकर परिसरात रस्ते आणि सुशोभिकारणाचे काम केले. तसेच औरंगाबाद मधील विद्यार्थाना प्रेरणा मिळावी म्हणून सावित्रीमाई फुले गुणवत्ता विकास योजना राबविली. ज्यामध्ये रुपये 20 हजारांपासून ते रुपये 1 लाखांपर्यंत विद्यार्थाना स्कॉलरशिप देण्यात आली .

त्यानंतर यवतमाळ मध्ये डॉ कांबळे सरांची कलेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली. यवतमाळ मध्ये असताना प्रशासकीय कामात उत्कृष्ट कामगिरी करीत शेतकऱ्यांसाठी पॅकेज मिळवून देणारा, प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांनी कौतुक केलेला अधिकारी, तिथल्या आदिवासी नाथजोगी, बंजारा यांच्या पाड्यावर जाऊन राहणारा, त्यांना मदत करणारा, ज्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेणारा, कधीही यवतमाळने असा अधिकारी पाहिला नव्हता. म्हणूनच त्यांच्या निरोप समारंभाला १० हजाराच्यावर लोक हजर होते.  त्यावेळी सरांनी तिथे 11 एप्रिल ते 14 एप्रिल महात्मा फुले व डॉ . बाबासाहेबांची सयुंक्त जयंती साजरी करण्याबरोबर समतापर्व कार्यक्रम 2004 साली सुरु केला तो आजही चालू आहे.

धम्मसेवक डॉ. हर्षदीप कांबळे त्यांच्या पत्नी धम्मसेवीका रोजना व्हॅनिच कांबळे (थायलंड) ह्यांच्यासोबत लोकुत्तरा भिक्खु ट्रेनींग सेन्टर, औरंगाबाद इथे.

यवतमाळ नंतर डॉ कांबळे सर FDA कमिशनर महाराष्ट्र राज्य मुंबई येथे नियुक्त झाले. तेंव्हा सरांनी लाखरु खर्च असणारी स्टेन जी हार्टच्या पेशन्टसाठी वापरतात ती काही 20 ते 30 हजारावर आणली. तसेच मुंबई मध्ये प्रामाणिक, निष्ठावान तरुणांचा समूह निर्माण करून जगाला हेवा वाटावा अशी बाबासाहेबांची 125 वी आंतराष्ट्रीय जयंती bkc मैदानावर साजरी केली. तसेच कल्याण शहरामध्ये आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आयोजित केली. त्यानंतर भिमांजली, महाकरुणा दिन असे कार्यक्रम केले. त्याचप्रमाणे विद्यार्थाना एमपीएससी, यूपीएससी चे मोफत क्लासेस उपलब्ध केले. दरवर्षी गरजू विद्यार्थाना शालेय आणि महाविद्यालयीन पुस्तके देण्याचे काम सर करतात.

नुकतीच डॉ.कांबळे सरांची लघु व मध्य्म उद्योग सचिव तथा विकास आयुक्त (उद्योग) म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर let us grow together.. म्हणत तरुणांना उद्योग क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तयारी सुरु केली. त्याचप्रमाणे अजूनही खूप योजना आहेत ज्या सरांनी निर्माण केल्या परंतु त्या माझ्या रिसर्च मध्ये आल्या नाहीत, एक महत्वाची योजना आठवते की सरकारचे कोणतेही टेंडर मधील 5 टक्के टेंडर हे एससी, एसटीसाठी रिजर्व्ह राहतील. उद्योग आयुक्त म्हणून काम करताना महाराष्ट्रासाठी नवीन उद्योग धोरण बनविणारा, मुख्यमंत्री रोजगार योजना इथल्या बेरोजगार युवकांसाठी बनविणारा, आदिवासींना स्वतःचा रोजगार सुरु व्हावा म्हणून झटणारा असा प्रशासकीय अधिकारी म्हणून सरांनी लौकिक मिळवला आहे.

त्यासोबतच डॉ कांबळे सरांनी औरंगाबाद येथे ‘लोकूत्तरा’ बौद्ध भिक्खूंसाठी प्रशिक्षण केंद्र बांधून देऊन पूर्णपणे दान करणारे ‘धम्मसेवक’ म्हणूनही नावारुपाला आले आहेत. आता कोरोना मध्ये जवळपास दहा हजार गरीब मजुरांना धान्य वाटणारा मायाळू माणूस म्हणून पुढे आले आहेत. एक उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी तथा एक उत्कृष्ट समाजसेवक असा माणूस विरळाच आहे. वेगवेगळ्या पदावर असताना सरांनी त्यांच्या कामामध्ये कुठेही थोडासही दुर्लक्ष केले नाही. समाजासाठी जितके जास्त करता येईल तितके करण्याचा प्रयत्न केला आणि करत आहेत.

डॉ.कांबळे सर नेहमी म्हणतात.. DEVELOPMENT OF SELF & DEVELOPMENT OF SOCIETY…And DEVELOPMENT OF NATION हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे. आपल्या समाजाचे प्रोटेक्शन करणे आणि प्रोजेक्शन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे समाजाचे कोणतेही कार्यक्रम सर अगदी उच्च प्रतीचेच घेतात. कारण त्यातून आपले प्रोजेक्शन होत असते.
इतर लोक आपल्यावर नजर ठेवूनच असतात. त्यांना काही बोलण्याची संधीच मिळाली नाही पाहिजे असा कार्यक्रम असला पाहिजे. आपण जसं दाखवु तसं मत समाजाच्या बाबतीत बनवतात त्यामुळे आपण आपले वर्तन अधिकाधिक सुंदरच दाखवायचे.

प्रशासन सेवेत असताना कांबळे सर कोणतेही कार्य विचारपूर्वकच करतात, कारण त्यांना माहित आहे जर इतर लोकं त्यांच्याबद्दल चांगला विचार करतील तर इतर लोक त्यांच्या समाजाबद्दलही चांगलाच विचार करतील.

चळवळीला पुढे नेण्यासाठी टाईम, ट्रेजरी आणि टेलेन्ट या सर्व गोष्टी तन, मन आणि धनाने देणारा हा अवलिया…सरांचं एक साधं गणित आहे सर म्हणतात एक माणूस साधारण सुदृडपणे 60 वर्ष जगतो, त्यातले 15 ते 20 वर्ष झोपण्यात गेले, उरले किती 35 ते 40 वर्ष त्यात आपलं घरच्या जबाबदाऱ्या, इतर गोष्टी पहिल्या असता आपल्याकडे 10-15 वर्ष असतील जेमतेम. त्यामुळे बाबासाहेबांचा रथ पुढे नेण्यासाठी तरुणांची पुढची पिढी तयार करण्यासाठी सर नेहमी आग्रही असतात, नुसते आग्रहीच नाही तर त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन सर पुढची फळी तयार करण्याचेही काम सातत्याने करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण सरांबरोबर राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या माध्यमातून जोडला गेला आहे.

आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, कुशल कम्म करण्यासाठी, चळवळीला पुढे नेण्यासाठी. त्यामुळे जितके जास्त धम्मकार्य करता येईल, जितके जास्त चळवळीला योगदान देता येईल, जितके जास्त कुशल कम्म करता येईल तितके जास्त करावे. कारण कुशल कम्म करणे ही एक संधी आहे, ही संधी सर्वांना मिळत नाही. त्यामुळे ही संधी कधीच सोडायची नाही. आपल्याकडे कमी वेळ आहे, हाच संदेश सर देतात आणि स्वतः सुध्दा याचेच अनुकरण करतात. हे सर्व कुशल कम्म करण्याची ऊर्जा कुठे मिळते तर दीक्षाभूमी नागपूरला WE ARE BECAUSE HE WAS ह्या कृतज्ञ भावनेने उत्साहाने बाबासाहेबांना अभिवादन करण्याची पद्धत सरांनी आम्हाला शिकविली…

असा हा अवलिया…IAS डॉ. हर्षदीप कांबळे सर
इथेच अल्पविराम घेतो .
भेटू पुन्हा…

आपलाच
पवन भिसे
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती .
कॉर्डिनेटर, डोंबिवली.