बातम्या

औरंगाबाद (चौका) येथील ऐतिहासिक ‘जागतिक बौद्ध परिषद २०१९’चे साक्षीदार व्हा!

‘जागतिक बौद्ध परिषद २०१९’ ही एक मोठी धर्मपरिषद असून तिचा उद्देश चित्त एकाग्रता, करुणा आणि शांती ही भगवान बुद्धांची शिकवण जगभर पसरवणे हा आहे. ही परिषद ऐतिहासिक अशा औरंगाबाद शहरात भारतीय भिक्खू संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. तसेच ही परिषद श्रीलंकेचे आदरणीय भन्ते वरकागोडा श्री प्रज्ञानंद गणरत्नभिधान महानायक महाथेर आणि आदरणीय गुरुवर्य दलाई लामा यांच्यासह भारत, थायलंड,व्हिएतनाम, कंबोडिया, बर्मा, श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशातील वरिष्ठ भिक्खूगण यांच्या उपस्थित संपन्न होत आहे.

औरंगाबाद शहर हे प्राचीन बौद्ध लेण्यासाठी प्रसिद्ध असून तेथे जागतिक किर्तीच्या अजिंठा आणि वेरूळ लेण्या आहेत. तसेच येथे बौद्ध नागरिकांची संख्या चार लाख असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५० मध्ये येथे नागसेनवन शैक्षणिक संकुल उभारले असल्याने महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून लोक शिक्षण घेण्यासाठी इथे स्थायिक झालेले आहेत. त्याचबरोबर इथे ठळकपणे नमूद करावेसे वाटते की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी कोट्यावधी समाजबांधवांना घेऊन बौद्ध धम्माची दीक्षा नागपूर येथे घेतली. त्या अनुषंगाने धम्माचे कार्य उत्तरोत्तर वाढावे यासाठी औरंगाबाद येथील नागसेनवन संकुलात ही धम्मपरिषद आयोजित करण्यात आली आहे.

श्रीलंकेचे आदरणीय भन्ते वरकागोडा श्री प्रज्ञानंद गणरत्नभिधान महानायक महाथेर यांच्यासह आयुष्यमती रोजाना व्हॅनिच कांबळे आणि आयएएस अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या भेटीचे छायाचित्र.

भारत देश हा बुद्धांचा देश म्हणून जगात प्रसिद्ध आहे. दोन हजार पाचशे वर्षापूर्वी बुद्धगया येथे सिद्धार्थ गौतमांना ज्ञानप्राप्ती होऊन ते बुद्ध झाले व त्यांनी दुःख मुक्तीचा मार्ग जगाला दिला. ज्ञानप्राप्ती नंतर बुद्धांनी त्यांचे उर्वरित सर्व आयुष्य लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग सांगण्यात व्यतीत केले. त्यांच्यानंतर सम्राट अशोक राजाच्या काळात बुद्धिझम अनेक देशात पसरला. मात्र दुर्दैवाने जेथे बौद्ध धर्माचा उदय झाला तिथेच त्याचा हळूहळू ऱ्हास होत गेला. आता अनेक आदरणीय भिक्खूगण आणि उपासक पुन्हा भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्यात व त्यास बळकटी देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्या अनुषंगाने आयुष्यमती रोजाना व्हॅनिच कांबळे (थायलंड) यांनी दिलेले दान तसेच आयएएस अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे (मुंबई) यांच्या सहकार्याने ‘लोकुत्तरा महाविहार भिक्खू ट्रेनिंग सेंटर’ ही संस्था औरंगाबाद मधील अजिंठा लेणी रस्त्यावरील ‘चौका’ येथे मागील वर्षी स्थापित केली आहे.

आदरणीय गुरुवर्य दलाई लामा यांच्यासह आयुष्यमती रोजाना व्हॅनिच कांबळे आणि आयएएस अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या भेटीचे छायाचित्र.

औरंगाबाद येथे भरत असलेली ‘जागतिक बौद्ध परिषद’ ही भारतामध्ये बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन तसेच बौध्द जीवनमार्ग यांच्या संयुक्त प्रसाराची मोठी पायरी गाठण्यास मदतीची ठरणार आहे. यास्तव सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येते की २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत शारीरिक शिक्षण विद्यालय यांचे स्पोर्ट्स स्टेडियम, नागसेनवन, औरंगाबाद (चौका) येथे होणाऱ्या जागतिक बौद्ध परिषदेस हजर राहून धम्म कार्याच्या अतुलनीय सोहळ्याचा लाभ घ्यावा ही विनंती.

3 Replies to “औरंगाबाद (चौका) येथील ऐतिहासिक ‘जागतिक बौद्ध परिषद २०१९’चे साक्षीदार व्हा!

  1. खूप खूप शुभेच्छा देतो.

Comments are closed.