ब्लॉग

जगातील वेगवेगळ्या प्रदेशांतील वेगवेगळ्या शैलींमधील बुद्धमूर्ती निर्मीतीमागचा मूळ इतिहास

तथागत गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे ५०० वर्षांनी कुषाण सम्राट कनिष्क याच्या कारकीर्दीमध्ये महान बौद्ध आचार्य अश्वघोष यांनी बुद्धचरित्र लिहीले. त्यांनी लिहीलेले बुद्धाचे चरित्र हे चमत्कृतीपूर्ण, अलौकीक पातळीवरील असून , इतर सामान्य मानवापासून वेगळे असलेले बुद्धाचे असामान्यत्व दाखविण्यासाठी अश्वघोषाने त्यातील बुद्धवर्णन करतांना या बाबीही अलौकीक पातळीवरच वर्णिल्या….

जसे – बुद्धाचे हात हे त्याच्या गुडघ्यापर्यंत लांब (अजानुबाहू) होते, बुद्धाला खालच्या जबड्यात वीस, व वरच्या जबड्यात वीस- असे चाळीस दात होते, बुद्धाची जीभ लांब असल्याने तीने बुद्धाला आपल्या दोन्हीही कानांच्या पाळ्यांना स्पर्श करता येत असे, बुद्धाचे डोळे कमळाच्या पाकळीप्रमाणे (कमलनयन) होते, बुद्धाचे खांदे रूंद, गोल व भरीव असून, कंबर सिंहासारखी बारीक (सिंहकटी) होती, बुद्धाचे पाय सपाट असून, पायाची बोटे लांब व एकसारखी असून , तळव्यावर चक्रादी निशाणे होती, बुद्धाची कांती तेजस्वी, पीतवर्णी असून तिला धूळ चिकटत नसे व तिच्यावरील प्रत्येक रोमछीद्रात एकच रोम (केस, लव) उगवलेला असे, बुद्धाच्या डोक्यावरील केस (उष्णिश) हे दक्षिणावर्ती असून ते उजवीकडून डावीकडे वळलेले , कुरळे (कपर्दीक) होते, बुद्धाचे लिंग हे कोशात दडलेले असल्याने ते सहज दृष्टीस पडत नसे, बुद्ध दहा हात उंच होते….वगैरे- वगैरे.

खरे पाहता तथागत बुद्ध हे तुमच्या – आमच्या सारखेच हाडामांसाचेच मानव होते. त्यांची उंची सहा फुटांच्या आसपास असून , शरीर सुदृढ, निरोगी होते. भीक्खूसंघासाठी असलेले सर्वच नियम हे तथागतास स्वत:लाही लागू असल्याने दर तीन दिवसांनी बुद्धस्वत: आपले मुंडण करत असत. बुद्धाने गृहत्यागानंतर कधीही आपले केस राखले नाहीत.

परंतु, आचार्य अश्वघोषाने लिहीलेल्या बुद्धचरित्रातील तथागत बुद्धाच्या अलौकीक पातळीवरील वर्णनानुसार ,बौद्ध धम्माचा कट्टर अनुयायी असलेला कुषाण सम्राट कनिष्क याने फक्त बुद्धाचे भिक्षापात्र व ” बुद्धचरितम् ” च्या लिखाणामुळे संपूर्ण जंबुद्वीपात ख्याती पावलेले आचार्य अश्वघोष यांना मिळविण्याकरीताच मगध शी तुंबळ युद्ध करून, त्या युद्धात मगध चा पराभव करून , तेथील अपार संपत्ती व अगणित धन-दौलतीस हात ही न लावता फक्त तथागत बुद्धाचे अत्यंत पवित्र असे ” भिक्षापात्र ” व “बुद्धचरितम् ” चा रचयिता आचार्य अश्वघोष या दोनच गोष्टी आपल्याबरोबर घेऊन तो आपली राजधानी ” पुरुषपूर ” (आताचे पाकिस्तानातील पेशावर ) येथे परतला, व आचार्य अश्वघोषाच्या बुद्धचरित्रातील वर्णनानुसार , आपल्या दरबारात असलेला महान ग्रीक शिल्पकार “अँजेशिलॉस ” याच्याकडून जगातील पहिली बुद्धमूर्ती – ती ही संपूर्ण शुद्ध सोन्याची बनवून घेतली व पुरुषपूर या आपल्या राजधानीत इजिप्त च्या पिरामिडपेक्षाही भव्य असा जगातील सर्वात उंच, असा ४५० फूट उंचीचा भव्य स्तूप बांधून, त्या स्तूपामध्ये या मूर्तीची स्थापना केली.

दररोज सायंकाळी या स्तूपावर शुद्ध तुपाचे एक लाख दिवे प्रज्वलित केले जात असत, व संपूर्ण स्तूप आसमंतातील चांदण्यापेक्षाही तेजाने उजळून निघत असे. या स्तूपामध्ये स्थापिलेली सुवर्ण बुद्धमूर्ती ही ग्रीक देवता ” अपोलो “सारखी भासत असे, कारण तिचा शिल्पकार हा ग्रीक असल्याने, त्याच्यावर ग्रीक मूर्ती शैलीचा प्रभाव होता. कनिष्काची राजधानी असलेले पुरुषपूर हे नगर गांधार प्रदेशात असल्याने याच मूर्तीशैलीतून निर्माण केलेल्या बुद्धमूर्त्यांनाच पुढे ” गांधार शैली ” असे यथार्थ नामाभिधान प्राप्त झाले.

अगदी अफगानिस्थानातील ” बामियान येथील महाकाय बुद्धमूर्तींपासून, तर महाराष्ट्रातील डोंगरांमधील खोदलेल्या शेकडो बौद्ध लेण्यांमधील हजारो लहान- मोठ्या बुद्धमूर्त्यांमध्येही सर्वत्र हेच स्वरुप कायम राहीले.पुढे जसजसा जगातील वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या भू-प्रदेशात जेव्हा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊ लागला, तेव्हा तेथील लोकांनी आपापल्या आवश्यकतेनुसार ज्या बुद्धमूर्ती घडविल्या, त्या त्या ठिकाणी, तेथील वंश-वैशिष्ठ्यानुसार , तेथील लोकांच्या शरीर ठेवणीनुसार त्या बुद्धमूर्तींमध्येही होत गेलेले बदल आपणांस त्या वैशिष्ठ्यांसह दिसून येतात.

लेखक – अशोक नगरे
मोडी लिपी तज्ज्ञ, धम्म लिपी ब्राह्मी तथा बौद्ध लेणी, बौद्ध चित्र-शिल्पकला, बौद्ध स्थापत्यशास्त्र , बौद्ध पुरातत्वशास्त्र व बौद्ध इतिहास अभ्यासक. पारनेर, जि. अहमदनगर.

2 Replies to “जगातील वेगवेगळ्या प्रदेशांतील वेगवेगळ्या शैलींमधील बुद्धमूर्ती निर्मीतीमागचा मूळ इतिहास

Comments are closed.