ब्लॉग

२३०० वर्षे जुनी अतिभव्य बुद्धलेणी – थोटलाकोंडा, विसाखापट्टनम – प्रा.हरी नरके

देशातील प्रमुख आणि प्राचीन बुद्धलेणी म्हणून आंध्रप्रदेशातील थोटलाकोंडा, विसाखापट्टणम महत्वाचे आहे. ते विसाखापट्टणमपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. भीमूनिपट्टनम जवळच्या टेकडीवर हे लेणे आहे. थोटलकोंडा हे नालंदासारखेच एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ होते. ते श्रीलंका आणि आग्नेय आशियातील विविध देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार करण्याचे केंद्र होते. या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर अशी दहा ज्ञानकेंद्रे [लेणी] सापडली आहेत. त्यात एकावेळी किमान १००० बौद्ध भिक्खू प्रशिक्षण घेत असत. यावरून आंध्रप्रदेशातील बौद्ध धर्माचे प्राबल्य आणि सार्थकता पुरेशी स्पष्ट होते.

थोटलकोंडा टेकडीवरील भव्य सभागृह, विविध स्तूप, चैत्यगृहं आणि अतिभव्य बुद्ध विहार असलेले हे २३०० वर्ष जुने केंद्र भव्य आणि विशालकाय आहे. इथे शिकण्यासाठी श्रीलंका, चीन, ब्रह्मदेश[म्यानमार] आणि इतर अनेक देशांमधून बौद्ध भिक्षू येत असत. हे निवासी केंद्र असून एकावेळी किमान दीडशे भिक्खुंची स्वतंत्र निवासव्यवस्था इथे आहे.

समोर स्वच्छ, सुंदर, निळाभोर समुद्र पसरलेला आहे. त्याच्या लाटा आणि त्यातून येणारी गाज प्रसन्नतेची ग्वाही देत असते.

विसाखापट्टनम हे जहाजांसाठी सर्वाधिक सुरक्षित आणि मोक्याचे बंदर असल्याने जगभरातून इथे व्यापार चाले. याठिकाणी झालेल्या उत्खननात अनेक देशांची प्राचीन नाणी सापडलेली आहेत. उत्खननात सापडलेली सातवाहन काळातील शिसे आणि रोमन देशांची चांदीची असंख्य नाणी हेच सिद्ध करतात.

भारतीय नौदलाच्या हवाई सर्वेक्षणाच्या वेळी थोटलकोंडा लेणी आढळली. हा शोध लागल्यानंतर आंध्रप्रदेश राज्य पुरातत्व खात्याने 1988 ते 1993 दरम्यान याठिकाणी उत्खनन केले.

त्यात ह्या थेरवाद बौद्ध संकुलाचे अस्तित्व आढळून आले. संकुलाच्या दक्षिण दिशेला खडकात कोरलेली पाण्याची एक भव्य टाकी आहे. इथे आधुनिक पद्धतीचे वाटावेत असे दगडी बाथ टब तयार केलेले असून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी छोट्यामोठ्या आकाराची पंधरा दगडी तळी कोरलेली आहेत. एकाच आकाराच्या ७२ निवासी खोल्या, दीडशे लोकांना एकत्र भोजन करता येईल असा भव्य डायनिंग हॉल, एकत्र प्रार्थना करता याव्यात यासाठी भव्य सभागृह, प्रशिक्षण केंद्र यावरून थोटलकोंडा हे भारतातले महत्वाचे बौद्ध विद्यापीठ असावे असे वाटते.

उत्खननात टेराकोटाच्या फरशा, स्टुको सजावटीचे तुकडे, मूर्तिकला फलक, दगडात सूक्ष्म स्तूप मॉडेल आणि बुद्धाच्या पायाचे ठसेदेखील सापडले आहेत. ब्राह्मी लिपीतील बारा शिलालेखही मिळाले. पॉलीग्राफिक अभ्यासानुसार असे दिसून येते की ही टेकडी सेनागिरी म्हणून ओळखला जात असावी; पालीतील सेनेचा अर्थ “वडीलधारी, श्रेष्ठ” असा होय.

शेजारच्या बावीकोंडा आणि पावरुलाकोंडासारख्या जवळपासच्या लेण्याही महत्वाच्या आहेत.

थोटलकोंडाच्या या उत्खननात प्रत्यक्ष काम केलेले आंध्र विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाचे प्रा. सत्यपाल यांनी आम्हाला प्रत्यक्ष जागेवर नेऊन प्रत्येक इमारतीचे महत्व आणि बौद्ध धर्मानुसार असलेले मोल समजाऊन सांगितले. यावेळी कॅनडाचे पूज्य भंतेजी चंद्र बोधी आणि भिक्खू शांतीदूत सोबत होते. आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे मिडल इस्टचे प्रमुख काशी कृष्णा आणि नागपूरचे रवींद्र कांबळे यांच्यासोबत केलेला अभ्यासदौरा अविस्मरणीय ठरला.

(प्रा.हरी नरके यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)