इतिहास

1968 साली सापडलेला महार टेकडीवरील प्रचंड मोठा चक्राकार बौद्ध स्तुप कुठे गेला?

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले तेर गाव ऐतिहासिक प्राचीन अवशेषांमुळे इतिहासकार आणि पुराणवस्तू संशोधकांना परिचित आहे. तेरचा सध्याचा विस्तार फारसा मोठा नसला तरी प्राचीन काळी खूप मोठा होता.

तेरची प्राचीनता ही इसवीसनपूर्व दुसऱ्या ते तिसऱ्या शतकापर्यंत कालदृष्ट्या प्राचीन ठरलेली आहे. सध्या तेर येथे पुरातन असलेली चैत्यगृह/मंदिरे इसवीसन ५ व्या शतकापासून ते सतरावे शतक या काळातील आहेत.

तेर येथील उत्खननात बौद्ध, जैन आणि हिंदूंचे पुरातन अवशेष सापडले आहेत. इ.स.1968 साली तेर येथील महार टेकडीवर व आसपासच्या भागात महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ.मोरेश्वर दिक्षीत यांनी उत्खनन केले होते. या उत्खननात प्रचंड मोठ्या बौद्ध स्तुपाचे अवशेष सापडले आहेत. हा बौद्ध स्तुप सध्या अस्तीत्वात नाही. परंतू त्याच्या अवशेषावरुन स्तुपाची रचना समजुन येते. हा स्तुप चक्राकार व पक्क्या विटांचा बांधलेला होता.

चक्राकार स्तूपाची वैशिष्टे या प्रमाणे आढळुन आली

१) स्तुपाचे बांधकाम विटांचे व व्यास 26 मीटर होता. २) स्तुपाची बांधणी मोठया चक्रात लहान चक अशी असून मोठया चक्राला 16 व आतील लहान चक्राला 8 आरे होते. आतील चक्राच्या मध्यभागी नाभिस्वरुप चौरस रचना असून ती विटांच्या 34 थरांनी उभारलेली होती.

३) वर्तृळाचा परिघ व केलेले आरे या मधील जागा माती टाकून भरलेली होती. ४) स्तुपाचे बाहेरील वर्तृळाच्या पुर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या चार दिशांना अनुसरुन 5 मीटर लांबीचे व दिड मीटर रुंदीचे चबुतरे विटांनी बांधलेले होते. या प्रत्येक चबुतऱ्यावर अयाक स्तंभ उभारण्याची पद्धत होती.

५) स्तुपाचे बाहेरील वर्तुळ 5.30 मीटर रुंदीचे असून त्या बाहेरील बांधकाम विटांचे आहे. ६) स्तुपाच्या घुमटाचा बाहय किंवा दर्शनी भाग शिल्पांनी अलंकृत केलेल्या फरशांनी मढवलेला असावा. ७) स्तुपाच्या बाहयभागा प्रमाणेच स्तुपाभोवतालच्या प्रदक्षिणेच्या मार्गावर फरशा बसवलेल्या होत्या. ८) स्तुपाच्या घुमटाचे 29 थर शाबुत अवस्थेत उत्खननात आढळले.

स्तुप उध्वस्त झालेला असल्याने धातु किंवा पवित्र अवशेष ठेवलेला करंडक सापडला नाही. मात्र इतरत्र स्फटीक, पुष्पराग, इत्यादी दगडाचे मणी आढळले ते मंजूषेत इतर अवशेषा सोबत ठेवलेले असावेत स्तुपाभोवती असलेल्या प्रदक्षिणापथात पुळुमावी या राजाचे नाणे सापडले या स्तुप बांधणीचा काळ इ.स.120 ते इ.स.140 असा ठरतो. इतर सातवाहन राजांप्रमाणेच पुळुमावीने या स्तुप उभारणीत सक्रीय सहाय्य केले असावे.

दुर्दैवाने या विटकरी शेतातुन अनेकांनी विटा नेल्यामुळे अवशेषांचा ठावठिकाणा राहिला नाही. असे असूनही हा स्तुप महत्वाचा मानावा लागतो. या स्तुपाची रचना शैली आंध्र शैली समान होती.

महार टेकडीवर सापडलेल्या बौद्ध चक्राकार स्तूपाचे अवशेष नामशेष झाले असले तरी १९६७-६८ साली उत्खनन करताना काढण्यात आलेले चक्राकार स्तूपाचे छायाचित्र उपलब्ध आहे. तेर येथे असलेल्या लामतुरे संग्रहालयात हे छायाचित्र उपलब्ध आहे.

तेर येथील पुरातत्व विभागाचे संशोधन आणि तेरचा इतिहास यावर प्रा.शा.भा. देव यांनी ‘तेर’ नावाचे पुस्तक लिहले असून महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तू संग्रहालय विभागाने हे पुस्तक प्रकशित केले आहे.

पुरातन विभागाने वेळीच या प्राचीन स्तूपाकडे लक्ष दिले असते तर आज महारष्ट्रातील सर्वात मोठे स्तूप म्हणून नावारूपाला आले असते. तेर येथील प्राचीन बौद्ध अवशेषांवरून तेर (तगर) बौद्ध धम्माचे मोठे केंद्र असल्याचे दिसून येते. आजही भारतीय पुरातन विभागाचे या भागाकडे दुर्लक्ष दिसून येते.

मोर्यपूर्वकाळापासूनचे पुरावे :

महार टेकडीवर आणि परिसरात केलेल्या उत्खननात मोर्यपूर्वकाळापासून म्हणजेच इसवीसन चौथ्या शतकाच्या आधी ते सातवाहन काळाच्या अखेरपर्यंत (इसवीसन तिसऱ्या शतका पर्यंत) एकूण चार वस्त्यांचा पुरावा हाती आला. मात्र हे पुरावे संपूर्ण वस्तीचे स्वरूप दर्शविण्याइतका विस्तृत नव्हता. ही संपूर्ण वस्ती तेरणा नदीच्या पुरात नष्ट झाली असावी

छायाचित्र : चक्राकार स्तूपाचे छायाचित्र तेर येथील लामतुरे संग्रहालयातील आहे.

– जयपाल गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *