जगभरातील बुद्ध धम्म

२००० हजार वर्षांपूर्वीचा ‘व्हाईट हॉर्स विहार’ ; हा इतिहास प्रत्येक भारतीयाला माहिती असणे गरजेचे

व्हाईट हॉर्स विहार चीनच्या हेनान प्रांतातील लुओयांग शहरात आहे. चीनमधील हे एक सरकारी बौद्ध विहार असून चिनी आणि भारतीय संस्कृतींचे संगमस्थळ अशी या विहाराची ओळख आहे. दोन देशाच्या मैत्रीपूर्ण संस्कृतीचे प्रतीक असून भारताचे अनेक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या विहाराला भेट दिली आहे. व्हाईट हॉर्स विहाराचा इतिहास २००० हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्याचा थेट संबंध भारताशी येतो. हा इतिहास प्रत्येक भारतीयाला माहिती असणे गरजेचे आहे.

भारत ही भगवान बुद्धाची भूमी म्हणून जगभरात ओळखली जाते. आपल्या शेजारील चीन देशातील ८० टक्याहून अधिक लोक बुद्धधम्माचे आचरण करतात. चीन मध्ये इसवीसनापूर्वी २१७ साली बौद्ध धम्माचा प्रवेश झाल्याचे म्हटले जाते. सम्राट अशोकाने धम्म प्रचारासाठी भारताशेजारील देशात धम्मदूत पाठवले होते. त्यासोबतच इसवीसना पूर्वी अनेकदा बौद्ध धम्म चीन मध्ये गेला आणि नष्ट सुद्धा झाला होता.

चीनमध्ये बौद्ध धम्माच्या प्रवेशासंबंधी माहितीनुसार चीनचा सम्राट हान वंशाचा सम्राट मिंग हान ( इसवीसन ५७ ते ७५) याच्या स्वप्नात एक दिव्य तेज असलेला मनुष्य पाहिला होता. दुसऱ्या दिवशी सम्राटाने आपल्या दरबारातील लोकांना स्वप्नाचा अर्थ लावण्यास सांगितला होता. दरबारातील लोकांनी सम्राटाच्या स्वप्नाचा अर्थ लावून तो दिव्य तेज असलेला मनुष्य भारतातील बुद्ध असल्याचे सांगितले.

सम्राट मिंग हान याने इसवीसन ६५ साली १२ चिनी प्रतिनिधी पश्चिमेकडे भारतात जाऊन बौद्ध प्रचारकांना चीनमध्ये आणण्यास पाठविले. ते १२ चिनी प्रतिनिधी दोन वर्षांनी भारतातून दोन बौद्ध भिक्खू घेऊन आले. ते दोन भिक्खू म्हणजे धर्मरक्ष आणि काश्यप मातंग होते. त्यांनी सोबत येताना आपल्याबरोबर बौद्ध धम्माची पुस्तके आणि काही पवित्र वस्तू पांढऱ्या घोड्यावर लादून आणले होते.

धर्मरक्ष आणि काश्यप मातंग या दोन्ही बौद्ध भिक्खूचे सम्राट मिंग हान याने जोरदार स्वागत केले. त्यांची व्यवस्था लोयांग या राजधानीच्या शहरात एका इमारतीत केली. नंतर ही जागा ‘व्हाईट हॉर्स विहार’ म्हणून प्रसिद्ध झाली. धर्मरक्ष आणि काश्यप मातंग यांनी याच इमारतीत बौद्ध धम्माची सर्वसाधारण माहिती देणारे ग्रंथ चिनी भाषेत अनुवादित केले होते. आज जे ‘व्हाईट हॉर्स विहार’ आहे ते जुन्या पडलेल्या इमारतीवर बांधलेले आहे.

धर्मरक्ष आणि काश्यप मातंग यांनी अनुवादित केलेल्या ग्रंथात भगवान बुद्धांच्या जन्माविषयी आणि त्यांच्या आणि त्यांच्या जन्माविषयी माहिती त्याचप्रमाणे बौद्ध धर्माची मुख्य तत्वे होती. भिक्खू जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा एका ग्रंथसुद्धा त्यात होता. त्यासोबतच ‘बेचाळीस प्रकरणे असलेले सूत्र” नावाचा एक ग्रंथ अनुवादित केला होता. तो ग्रंथ आजही अस्तित्वात आहे. विशेष म्हणजे धर्मरक्ष आणि काश्यप मातंग यांनी चिनी लोकांना आकर्षित व्हावेत अशा तऱ्हेने ग्रंथ अनुवाद केले होते. या ग्रंथांमुळे चीनमध्ये बौद्ध धम्म राजमान्य आणि राजाश्रित झाला होता.

चीनमध्ये बौद्ध धम्माचा पाया घालणाऱ्या धर्मरक्ष आणि काश्यप मातंग बौद्ध भिक्खुंणी पांढऱ्या घोड्यावरून आणलेले ग्रंथ आणि साहित्य यांचा मोठा वाटा होता. म्हणून लोयांग येथील त्या इमारतीला पांढऱ्या घोड्यावरून ‘व्हाईट हॉर्स विहार’ असे नाव देण्यात आले. चीन मधील ते पहिले बौद्ध विहार होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *