बातम्या

‘नव नालंदा महाविहार’ विद्यापीठाचे कार्य; बिहार मधील बौद्ध अवशेषांचा शोध आणि लोकांमध्ये जागृती!

बिहारमध्ये अनेक गावात अजूनही ठळकपणे बौद्ध अवशेष प्राप्त होत आहेत. यातील असंख्य अवशेषांची अद्यापही परिपूर्ण नोंद घेतलेली नाही आणि जगालाही याची माहिती नाही. यासाठी ‘नवं नालंदा महाविहार’ विद्यापीठाने पुढाकार घेऊन गावोगावी पडून असलेल्या बौद्ध अवशेषांची नोंद करून, त्यांचे फोटो काढून रेकॉर्ड तयार करणे चालू केले आहे.

अलीकडेच बुद्धगया येथून पूर्वेकडे वीस किलोमीटर अंतरावरील एका खेड्यात त्यांना बुद्धविहाराचे अवशेष मिळाले. तेथील माहेर टेकडीच्या आजूबाजूस विहाराचे अवशेष विखुरलेले आहेत. तेथील ढिगारा खणल्यावर बुद्ध विहाराचे अवशेष आणि मैत्रेय बुद्धाच्या दोन मूर्ती मिळाल्या. या दोन्ही मूर्ती पाल राजवटीतील आहेत. माहेर टेकडीच्या पश्चिमेस सुद्धा एक विहार मिळाला. तेथे उत्खनन केले असता पाच फूट × तीन फूट आकाराची महापरिनिर्वाण अवस्थेतील मोठी मूर्ती मिळाली. हे शिल्प प्राप्त झाले याचा अर्थ तेथे मोठे महापरिनिर्वाण विहार एकेकाळी असावे हे स्पष्ट होते.

यास्तव ‘नव नालंदा महाविहार’ विद्यापीठाने ( Deemed University ) बिहार मधील स्थानिक लोकांशी संपर्क साधून गावोगावी पडून असलेल्या बौद्ध अवशेषांबाबत आढावा घेत आहे. तसेच त्याबाबत लोकांमध्ये जागृती करीत आहे. हे लाख मोलाचे कार्य असून त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी एखाद्या मोठ्या बौद्ध संस्थेने पाठबळ द्यावे, एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

2 Replies to “‘नव नालंदा महाविहार’ विद्यापीठाचे कार्य; बिहार मधील बौद्ध अवशेषांचा शोध आणि लोकांमध्ये जागृती!

  1. सर मला डायरेक्ट पोस्ट पाहिजे धम्मचक्र चे

Comments are closed.